स्‍कॅन करा अन्‌ मोबाईलमध्ये मेन्‍यू बघा! हॉटेल व्‍यावसायिक-ग्राहकांसाठी अनोखी सुविधा 

hotel basement.jpg
hotel basement.jpg

नाशिक : अनलॉकच्‍या प्रक्रियेंतर्गत हॉटेल्सदेखील खुली होऊ लागली असून, खवय्ये आपल्‍या आवडीच्‍या हॉटेलमध्ये हजेरी लावत आहेत. पण हॉटेलमध्ये ऑर्डर करताना मेन्‍यूला हात लावावा लागत असल्‍याने सध्याच्‍या काळात अनेकांना ते असुरक्षित वाटते. यावर तंत्रज्ञानाने तोडगा काढत चक्‍क डिजिटल मेन्‍यूकार्डचा पर्याय नाशिकच्‍या स्‍प्राउट मीडिया या स्‍टार्टअपने उपलब्‍ध करून दिलाय. टेबलवर ठेवलेला क्‍यूआरकोड स्‍कॅन करत स्‍वतःच्‍या मोबाईलमध्ये ग्राहकांना मेन्‍यूकार्ड दिसेल अशी सुविधा केलेली आहे. 

स्‍कॅन करा अन्‌ मोबाईलमध्ये मेन्‍यू बघा 
कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे व्‍यवसायांवर अनेक निर्बंध असून, नागरिकांनाही काळजी घेण्याचे आवाहन केलेले आहे. सार्वजनिक ठिकाणांवरील वस्‍तू, भागांना स्‍पर्श करणे अनेकांकडून टाळले जात आहे; परंतु हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यावर मागणी नोंदविण्यासाठी मेन्‍यूकार्ड मागविणे आलेच. या मेन्‍यूकार्डला चाळून आपल्‍या आवडीच्‍या पदार्थांची ऑर्डर दिली जाते. पण हे मेन्‍यूकार्ड यापूर्वी कुठल्‍या हातांमध्ये गेले, कुणाचा त्‍यास स्‍पर्श झालाय. काहींकडून जेवणादरम्‍यान स्‍पर्श होत असल्‍याने तेलाचे ओघळदेखील काही वेळा मेन्‍यूकार्डवर उमटल्‍याशिवाय राहत नाहीत. या समस्‍येची दखल घेत स्‍प्राउट मीडियाचे संस्‍थापक अपूर्व मुठे, सहसंस्‍थापक निकिता सोनार, सदस्‍य दर्शन शिंदे व संदीप शिनगन यांची डिजिटल मेन्‍यूकार्डची संकल्‍पना उपलब्‍ध केली आहे. नाशिकमधील विविध नामांकित हॉटेल व्‍यावसायिकांकडून या तंत्रज्ञानाचा अवलंबदेखील करण्यात आलाय. 

असे काम करते तंत्रज्ञान 
बऱ्याच वेळा ऑनलाइन पेमेंट करताना आपण संबंधित ॲपचे क्‍यूआर कोड स्‍कॅन करतो. अशाच तंत्रज्ञानाचा यात वापर करण्यात आला असला, तरी कुठल्‍याही स्‍वरूपाचे ॲप इन्‍स्‍टॉल करण्याची आवश्‍यकता नाही. हॉटेलमधील टेबलावर ठेवलेला क्‍यूआरकोड आयफोन कॅमेरा किंवा ॲन्ड्रॉइड फोन कॅमेरा किंवा गुगल लेन्‍सद्वारे स्‍कॅन करायचा. यानंतर स्‍टार्टअपच्‍या संकेतस्‍थळाच्‍या यूआरएलशी जोडले जात सर्व्हरवर असलेले हॉटेलचे मेन्‍यूकार्ड मोबाईल स्‍क्रीनवर उपलब्‍ध होते. यानंतर उपस्‍थित कर्मचाऱ्याकडे आपली ऑर्डर नोंदविता येते. तसेच आपली ऑर्डर संकेतस्‍थळाद्वारेच नोंदविण्याची सुविधादेखील उपलब्‍ध केली आहे. 

सध्याच्‍या परिस्थितीत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्‍यानंतरचा अनुभव अधिक सुरक्षित करण्यासाठी आम्‍ही तंत्रज्ञानाचा वापर केला. कोड स्‍कॅन करून मेन्‍यूकार्ड डिजिटल माध्यमातून उपलब्‍ध करून दिले असून, त्‍यास चांगला प्रतिसाद मिळतो आहे. -अपूर्व मुठे, संस्‍थापक, स्‍प्राउट मीडिया  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com