PHOTOS : बागलाण तालुक्यात अवकाळीचा तडाखा; कोट्यवधींच्या शेतमालाचे नुकसान

रोशन खैरनार
Sunday, 18 October 2020

गेल्या चार दिवसांपासून शहर व तालुक्यातील तापमानात कमालीची वाढ झाल्याने दररोज अचानक ढगाळ वातावरणही तयार होत होते. मात्र काल शनिवारी (ता. १७) रोजी रात्री ९ वाजता तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. 

नाशिक : (सटाणा) शहर व बागलाण तालुक्याला शनिवारी (ता. १७) रोजी रात्री परतीच्या पावसाचा तडाखा बसला. सटाणा शहर व आजूबाजूच्या परिसरात १७९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसात रस्त्यावर पडलेल्या विजेच्या तारांचा झटका बसल्याने शहरातील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. शहरालगत असलेल्या नवी शेमळी व खमताने या गावांमध्ये सात जनावरांचा मृत्यु झाला आहे. 

कोट्यवधींच्या शेतमालाचे नुकसान

शेतकर्‍यांनी विक्रीसाठी चाळीतून बाहेर काढून ठेवलेला हजारो क्विंटल उन्हाळ कांदा आणि मका या बेमोसमी पावसात पूर्ण भिजला तर नुकतेच टाकलेले उन्हाळी कांद्याचे महागडे उळे सडल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. पावसामुळे गहू, हरभरा, हिरवी मिरची, टोमॅटो आदी पिकांचेही नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण. भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज, काकडीवरही अवकाळी पावसाचा विपरित परिणाम होणार आहे. सर्व संबंधित तलाठ्यांना कृषी सहाय्यकांना सोबत घेऊन शेतीच्या उभ्या पिकांच्या तेहतीस टक्के पेक्षा जास्त झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती तहसिलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी दिले आहेत. गेल्या चार दिवसांपासून शहर व तालुक्यातील तापमानात कमालीची वाढ झाल्याने दररोज अचानक ढगाळ वातावरणही तयार होत होते. मात्र काल शनिवारी (ता. १७) रोजी रात्री ९ वाजता तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. 

पुलही पावसामुळे गायब

सटाणा-मालेगाव रस्त्यालगत प्रमोद सोनवणे यांचा १५० क्विंटल कांदा, राकेश आहिरे यांचा २०० क्विंटल मका तर १०० क्विंटल कांदा तसेच सुभाष पाटील यांचा ५० क्विंटल मका पावसाच्या पाण्यात भिजल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नवी शेमळी येथील परशराम वाघ आणि संजय वाघ यांच्या शेतातील चाळीतून एक ट्रॉली कांदा वाहून गेला व घराची भिंतही कोसळली. सटाणा-मालेगाव रस्त्यावर शेमळीजवळ सुकड नदीवरील पुलाचे काम चालु असल्याने मातीचा भराव टाकुन तयार केलेला पुलही पावसाच्या पाण्यात वाहुन गेला. त्यामुळे सध्या जुन्या पूलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. 

उन्हाळी कांदारोप वाचविण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान 

तालुक्यातील आरम खोर्‍यातील डांगसौंदाणे, निकवेल, मुंजवाड, चौंधाणे, कंधाणे, खमताने, आराई, तळवाडे दिगर, ठेंगोडा, वटार, विंचुरे, डोंगरेज, आव्हाटी, विरगाव, वनोली, औंदाणे, कपालेश्वर, जोरण, तरसाळी, केरसाणे, दसाणे, पिंगळवाडे, मुंगसे, करंजाडसह अंतापुर, लखमापूर, ब्राह्मणगाव, मुल्हेर, ताहराबाद यांसह मोसम खोर्‍यातील अनेक गावांमध्ये वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. तर गहू, हरभरा, हिरवी मिरची, टोमॅटो आदी पिके बेमोसमी पावसाने बाधित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची लगबग सुरू होती. दिवसभर ढगाळ हवामानानंतर अवकाळी पावसामुळे उन्हाळी कांदा रोप (उळे) वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!

हवामान विभागाने पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने उद्या सोमवार (ता.१९) ते बुधवार (ता.२१) पर्यंत सटाणा बाजार समिती मधील मका लिलावाचे कामकाज बंद राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे यांनी दिली आहे.

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Untimely rain in Baglan taluka nashik marathi news