अवकाळीने काढणीला आलेल्या द्राक्षांवर ‘संक्रांत'; कांदा अन् भाजीपाल्याची दाणादाण 

Untimely rains damaged crops in Nashik district nashik marathi news
Untimely rains damaged crops in Nashik district nashik marathi news

नाशिक : युरोपमध्ये पाठवण्यासाठी काढणीला आलेल्या १० ते १५ टक्के क्षेत्रावरील द्राक्ष बागांवर गुरूवारी (ता. ७) झालेल्या अवकाळी पावसाने ‘संक्रांत' आली आहे. घडांना गुंडाळलेल्या कागदांमध्ये पावसाचे पाणी तुंबून राहिल्यास मणी तडकण्याची भीती उत्पादकांना वाटते आहे.

अशातच, शुक्रवारी (ता. ८) पावसाची तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज द्राक्ष उत्पादकांपर्यंत धडकला आहे. त्यामुळे नुकसानीचे प्रमाण वाढणार काय? या प्रश्‍नाने शेतकरी धास्तावले आहेत. आजच्या पावसाने कांदा आणि भाजीपाल्याची दाणादाण उडवली आहे. 

तर द्राक्षांचे मणी तडकणार

द्राक्षांमध्ये साखर उतरण्यास सुरुवात झालेली असताना नवीन लाल कांद्याची काढणी अन उन्हाळ कांद्याची लागवड अशा टप्प्यात अवकाळी पाऊस झाला आहे. नाशिकमध्ये सायंकाळपर्यंत ५.७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. आत्ताच्या पावसासोबत तापमान घसरले आणि गारठा वाढल्यास द्राक्षांचे मणी तडकण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे द्राक्ष उत्पादक कैलास भोसले यांनी सांगितले. द्राक्षांवर बुरशीजन्य रोगाचे प्रमाण वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यातून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी शेतकऱ्यांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे. दरम्यान, हवामान अभ्यासकांनी पावसाचा अंदाज सोशल मीडियातून वर्तवला होता. तरीही शेतकऱ्यांना नवीन लाल कांद्याची काढणी सुरू ठेवली होती. अशातच, पावसाने दणका दिल्याने कांद्याचे नुकसान झाले आहे. याशिवाय भाजीपाला, गहू, हरभरा, आंबा उत्पादकांना नुकसानीचा फटका बसला आहे. पावसाने झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज जिल्हा कृषी विभागातर्फे तालुका कार्यालयाकडून मागवण्यात आला आहे. 


कांद्याच्या रोपांचे पुन्हा नुकसान 

उन्हाळ कांद्याच्या लागवडीसाठी काही शेतकऱ्यांनी यापूर्वीच्या पावसात नुकसान झाल्याने दोनदा रोपे टाकली होती. आता काही जणांनी तिसऱ्यांदा रोपे टाकली होती. या रोपांचे अवकाळीने नुकसान केले आहे. त्याचबरोबर कांद्याची लागवड पुन्हा थांबली आहे. त्यामुळे उन्हाळ कांदा लागवडीचा कालावधी आणखी वाढण्याची चिन्हे दिसताहेत. देवळा तालुक्यात कांदा लागवडीला ‘ब्रेक' लागला आहे. रोपांचे नुकसान झाले आहे. नांदगाव, बागलाण तालुक्यात कांद्याच्या लागवडीवर विपरीत परिणाम झाला आहे. निफाडमध्ये द्राक्षे, कांद्याप्रमाणे गहू, हरभऱ्याचे नुकसान झाले असून सिन्नर तालुक्यात कांदा, टोमॅटो, गहू, भाजीपाल्याला दणका बसला आहे. आदिवासी भागातील खळ्यात असलेल्या भात, तूर, उडिदाच्या नुकसानीला पाऊस कारणीभूत ठरला आहे. त्याचवेळी आंब्याचा मोहर गळाल्याने यंदा आंब्याच्या उत्पादनात घट होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com