
जिल्ह्यातील बहुतांश भागात गुरुवारी (ता. ७) सायंकाळी अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. द्राक्ष, टोमॅटो, गहू, हरभरा, कांद्यासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
सिन्नर / निफाड (जि.नाशिक) ः जिल्ह्यातील बहुतांश भागात गुरुवारी (ता. ७) सायंकाळी अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. द्राक्ष, टोमॅटो, गहू, हरभरा, कांद्यासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
सिन्नरला पिकांमध्ये पाणी
गुरुवारी दुपारी तीनपासून नायगाव खोऱ्यात जोरदार पावसाला सुरवात झाली. जायगाव, जोगलटेंभी, सुळेवाडी या भागास झोडपून काढत पाऊस पूर्व भागाकडे सरकला. पश्चिमेकडून मार्गक्रमण करत सायंकाळपर्यंत पावसाने अवघा तालुका व्यापला. मुसळगाव, गुळवंच, बारागावपिंप्री, खोपडी, देवपूर, पांगरी, वावी, शहा आदी सर्वच भागात उशिरापर्यंत जोरदार पाऊस सुरू होता. पावसाने शेतात उघड्यावर पडलेला कांदा, मका आदी पिके झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ झाली. तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड सुरू असून, लागवड झालेल्या पिकामध्ये पाणी साचून नुकसान होण्याची भीती आहे. निफाड, सिन्नर तालुक्यांत तासाभराहून अधिक काळ जोरदार पाऊस पडल्याने सर्व शेतकऱ्यांची झोप उडविली आहे. नायगाव, जायगाव परिसरात सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत संपूर्ण तालुक्यात बरसत असल्याने रब्बीच्या हंगामावर पाणी फिरल्याने पिकांच्या मोठ्या नुकसानीची शक्यता आहे.
खेडलेझुंगेत द्राक्ष, डाळिंब संकटात
खेडलेझुंगे परिसरात दीड तासपेक्षा जास्त वेळ पावसाच्या सरी कोसळल्या. परिसरातील द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या हंगामातच अवकाळीने शेतकऱ्यांची स्वप्नं वाहून गेली आहेत. पाणी तोडलेल्या आणि ताणावर सोडलेल्या डाळिंबबागा पावसाने तुडुंब भरल्यामुळे फळधारणा होणार नाही. परिणामी वर्षाचे पीक पाण्यात गेले आहे. कांदा लागवडीस मजुरांच्या तुटवड्यामुळे आधीच उशीर झाला होता. त्यात पावसामुळे शेती मशागतीची कामे सात ते आठ दिवस पुढे ढकलावी लागणार आहेत. ऊस मळ्यामध्ये पाणी साचून राहिल्याने तोडणीसाठी आणखी वाट पाहावी लागेल. बाजारभाव नसल्यामुळे खरीप मका शेतकऱ्यांच्या खळ्यात ठेवलेले आहे. त्या झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
चांदवडला कांद्याचे नुकसान
चांदवड तालुक्याच्या दक्षिण भागात दीड ते दोन तास पाऊस झाला. यामुळे काढलेला कांदा शेतातच भिजला. पाऊस उघडल्यानंतर आठवडाभर धुके पडण्याची शक्यता असल्याने कांदा पिकावर करपा, पिळ मारणे आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोळ कांद्याचीच पुनरावृत्ती रांगडा तसेच गावरान कांद्याची होणार आहे. लहरी हवामानाचा फटका बसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
हेही वाचा > डोळ्यासमोर काळ अन् गळ्याभोवती बांधलेल्या स्टोलमुळे वाचली तरुणी; अंगावर काटा आणणारी घटना
नांदगावला तासभर पाऊस
नांदगाव - नांदगाव सायंकाळी जवळपास तासभर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. त्यातच वीजपुरवठा खंडित झाला. कांद्याच्या लागवडीवर या पावसाचा विपरित परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. रेल्वे फाटक बंद झाल्यावर तयार करण्यात आलेल्या भुयारी मार्गात काही प्रमाणात पावसाच्या पाण्याचा संचय झाला. त्याचा लगेचच निचरा झाल्याने पादचारी व वाहनधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
देवळ्यात शेतकरी चिंतेत
देवळा : तालुक्यातील विठेवाडी, लोहोणेर, सावकी, सरस्वतीवाडी शिवारात गुरुवारी अवकाळी पाऊस पडल्याने कांदा पिकाचे नुकसान झाले. याशिवाय कांदा लागवडीला ब्रेक बसल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. उन्हाळ कांद्याची लागवड अंतिम टप्प्यात असतानाच पावसाने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. कांदा पिकात पाणी साचले आहे. नवीन लागवड केलेल्या कांदारोपांची हानी झाली आहे. काही शेतकऱ्यांची मका कणसे पाण्यात भिजली. वसाका कार्यस्थळावर ऊसतोड कामगारांच्या झोपड्यात पाणी शिरल्याने त्यांचे हाल झाले.
हेही वाचा > मैत्रीत मोठा घात! मित्राच्याच डोक्यात घातला मोठा दगड; नशेत सांगितली धक्कादायक आपबिती
शेतकऱ्यांना कायमच अस्मानी व सुलतानी संकटांना सामोरे जावे लागत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची कांदालागवड संकटात सापडली असून, कांदा पिकांवर आता रोगांचे आक्रमण होणार असल्याने शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळायला हवी.
- कुबेर जाधव, संपर्कप्रमुख, राज्य कांदा उत्पादक संघटना
खामखेडा परिसरात नुकसान
खामखेडा - लोहोणेर, विठेवाडी, वसाका साखर कारखाना परिसरात जोरदार पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पिकांचे लाल, उन्हाळ कांदा, गहू, हरभरा मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. सावकी, विठेवाडी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले होते. या भागात मोठ्या प्रमाणावर अजून उन्हाळ कांद्याची लागवड सुरू आहे. त्याचबरोबर लागवड झालेल्या लाल कांद्याच्या पिकाला देखील या पावसामुळे फटका बसणार आहे.