#MondayMotivation : ऊब देणारी गोधडी वैशालीताईंनी नेली सातासमुद्रापार!

vaishali tai.jpg
vaishali tai.jpg

नाशिक : वैशाली देवेंद्र देसाई... माहेर न्हावी (ता. यावल, जि. जळगाव), तर सासर झोडगे (ता. मालेगाव)... शिक्षण बीए, आयटीआय... वडील प्रल्हाद सीताराम पाटील यांना चार मुली आणि एक मुलगा... प्रल्हाद पाटील यांनी कुटुंबाला पुढे नेताना सर्व मुलांना शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. यातूनच वैशालीताई घडत गेल्या. केवळ पदवी किंवा तांत्रिक शिक्षण न घेता ब्यूटिपार्लरसारखे अन्यही हॉबी क्‍लासेसचे शिक्षण पूर्ण करत वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. 2000 मध्ये विवाहानंतर झोडगे येथे आल्या. पती देवेंद्र देसाई यांचेही उच्चशिक्षित कुटुंब. नेहमीच परोपकारी वृत्ती जोपासलेल्या देसाई कुटुंबात वैशालीताई यांना मोठे पाठबळ मिळाले. 

ऑस्ट्रेलियात पोचल्या वैशालीताई 
आयुष्यातील आधार भक्कम करत असतानाच ग्रामीण भागातील महिलांसाठी गोधडीच्या निमित्ताने रोजगाराच्या माध्यमातून वैशालीताई यांनी आदर्श निर्माण केला आहे. वैशालीताई यांना सातासमुद्रापार ऑस्ट्रेलियापर्यंत गोधडीने दिलेली ओळख मोठी आहे. ऑस्ट्रेलियातील ऍनी गॉडफ्रे यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे आणि कष्ट, इच्छाशक्तीच्या जोरावर वैशालीताई यांनी झोडगेसारख्या छोट्या गावातील महिलांनी तयार केलेल्या गोधडीला थेट ऑस्ट्रेलियातील बाजारपेठेत पोचवले होते. झोडगेसारख्या ग्रामीण भागातील छोट्या गावातील सुविधा, साधन अथवा भांडवलाची कमतरता असताना वैशालीताई यांच्या गटाने मिळविलेले यश नक्कीच नाशिक जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. सोलापुरी चादरी, दुलई, रग, ब्लॅंकेटच्या मागणीसोबतच गोधडीची ऊब देश-विदेशात नेहमीच टिकून राहणार आहे, असेही त्या सांगतात. 

महिलांसाठी ठरल्या आधार 
2001 मध्ये तत्कालीन शासनातर्फे ग्रामीण भागातील युवतींसाठी मोफत ब्यूटिपार्लरचे प्रशिक्षण दिले जात होते. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून वैशालीताई यांनी जबाबदारी स्वीकारली. विद्यार्थिप्रिय प्रशिक्षक अशी अल्पावधीतच वैशालीताई यांची ओळख निर्माण झाली. सुमारे चार वर्षे प्रशिक्षणाच्या माध्यमातून मोठा आधार त्यांनी मुलींसाठी उभा केला होता. मात्र केवळ एकाच प्रशिक्षणातून महिलांना आपण उभे करू शकत नाही, याची त्यांना कल्पना आली होती. वैशालीताई यांनी झोडगे गावात बचतगटाची स्थापना केली. बचतगटाच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देण्याबरोबरच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यापासून दैनंदिन अडीअडचणी सोडविण्यासाठी त्या प्रयत्न करू लागल्या. 

कुटुंबाचे प्रोत्साहन

2009 मध्ये बचतगटांच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देतानाच आपल्या भागाची ओळख पुढे नेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. त्यांच्या या धडपडीला पती देवेंद्र, सासरे वसंतराव, सासूबाई यांनी प्रोत्साहन दिले. सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच गरजू घटकांना मदत करण्यासाठी कुटुंब वैशालीताई यांच्या पाठीशी उभे राहिले. बचतगटाच्या माध्यमातून विविध प्रदर्शनांमध्ये सहभाग नोंदविण्याबरोबरच पारंपरिक वस्तूंना विक्रीसाठी ठेवले. प्रारंभी लोणचे, पापड यांचे स्टॉल लावले. मात्र हंगामी व्यवसायामुळे फारसा मोबदला मिळत नव्हता. 

गोधडीने दिली ओळख 
बचतगटाच्या निमित्ताने वैशालीताईंनी विविध प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभाग नोंदवत आपले प्रयत्न सुरू ठेवले होते. याच काळात मॅगसेसे पुरस्कारविजेत्या नीलिमा मिश्रा यांच्याशी त्यांची ओळख झाली. नीलिमाताई यांच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियातील डॉ. फारूक फोल्ड पाथ मिशनचे संचालक गॉडफ्रे, ऍनी गॉडफ्रे यांच्या माध्यमातून गोधडीचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. ग्रामीण भागातील आधार बनलेल्या गोधडीच्या निमित्ताने वैशालीताई यांना वाटचाल करण्याची जणू संधीच चालून आली. 

महिलांसाठी ठरल्या आधार 
वैशालीताईंच्या गटाने तयार केलेल्या गोधड्यांनी आज परदेशासह भारतातील विविध राज्यांत ओळख निर्माण केली आहे. कधी काळी माहेरच्या मायेची ऊब देणारी गोधडी वैशालीताई यांच्यासाठी मैलाचा दगड ठरली. गोधडी व्यवसायाच्या माध्यमातून आज वैशालीताई यांनी 25 महिलांना कायमस्वरूपी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. गोधडी तयार करण्याच्या व्यवसायात भरपूर संधी असल्याचेही त्या सांगतात. याशिवाय वैशालीताई यांनी ब्यूटिपार्लरचे प्रशिक्षण दिलेल्या सुमारे 100 युवती ब्यूटिपार्लर व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. 

तनिष्कांना मोफत प्रशिक्षण 
वैशालीताई "सकाळ' माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठाच्या स्थापनेपासून जोडल्या गेल्या आहेत. स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि आत्मविश्‍वास निर्माण करण्यात तनिष्का व्यासपीठाचे मोठे योगदान असल्याचे ते आवर्जून सांगतात. गोधडी तयार करण्याबरोबरच वैशालीताई यांच्या गटातर्फे सिरॅमिक वस्तूंपासून ते विविध हॉबी क्‍लासेसचे प्रशिक्षण देत महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तनिष्का व्यासपीठाच्या सदस्या असलेल्या महिलांना गोधडी तयार करण्यापासून ते बाजारपेठ कशी उपलब्ध करावी, यासाठी मोफत प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. वैशालीताईंच्या महिला सक्षमीकरणाच्या योगदानाची विविध संस्थांनी दखल घेत त्यांना सन्मान्नित केले आहे. या सन्मानांनी माझी अधिक जबाबदारी वाढली असल्याचे वैशालीताई सांगतात. 

खचून जाऊ नका... 
खानदेशातील गोधडीने वैशालीताईंना ऑस्ट्रेलियासह दुबईपर्यंत पोचवले आहे. पारंपरिक कला जोपासतानाच त्यांचे व्यवसायात रूपांतर केल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार मिळण्यासाठी मदत होते. यासाठी महिलांनी प्रयत्न केले पाहिजेत. प्रसंग कुठलाही असला तरी महिलांनी खचून न जाता येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जात स्वतःला सिद्ध केले पाहिजे, असा सकारात्मक आधारही वैशालीताई देतात. सासू, सासरे, पती देवेंद्र आणि तनिष्का व्यासपीठाने दिलेल्या पाठबळामुळे यश खेचून आणलेल्या वैशालीताईंनी मुलगा ओम यानेही शिक्षण पूर्ण झाल्यावर ग्रामीण भागात रोजगाराभिमुख व्यवसाय सुरू करावा, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे वैशालीताई सांगतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com