'व्हिक्टोरिया' १२६ वर्षांनंंतरही दिमाखात! अनेक महापुरांचा साक्षीदार पुलावर आजही सर्वाधिक वर्दळ

दत्ता जाधव 
Sunday, 17 January 2021

कधीकाळी नाशिक शहरातून पंचवटीत जाण्यासाठी किंवा पंचवटीतून नाशिक शहरात येण्यासाठी गोदापात्रातील होडीचा आधार घ्यावा लागत असे. अशा काळात तत्कालिन पालिका अधिकाऱ्यांनी थेट इंग्रज प्रशासनाला साकडे घालत नाशिकातून पंचवटीत जाण्यासाठी व्हिक्टोरिया पुलाची बांधणी केली.

पंचवटी (नाशिक) : कधीकाळी नाशिक शहरातून पंचवटीत जाण्यासाठी किंवा पंचवटीतून नाशिक शहरात येण्यासाठी गोदापात्रातील होडीचा आधार घ्यावा लागत असे. अशा काळात तत्कालिन पालिका अधिकाऱ्यांनी थेट इंग्रज प्रशासनाला साकडे घालत नाशिकातून पंचवटीत जाण्यासाठी व्हिक्टोरिया पुलाची बांधणी केली. या पुलाला गुरुवारी (ता. १४) तब्बल १२६ वर्षे पूर्ण झाल्याने नाशिककरांच्या जुन्या स्मृती परत एकवार चाळविल्या. 

इतिहास सांगतो की..

नाशिक महापालिका हद्दीत गोदावरीवर आज तब्बल डझनभर पूल अस्तित्वात असले, तरी कधीकाळी नदी ओलांडण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असे. हिच गरज हेरत पालिकेच्या तत्कालीन प्रशासकीय अधिकारी काशिनाथ महादेव ऊर्फ रावसाहेब थत्ते यांनी इंग्रज सरकारकडे आग्रह धरला. मात्र, त्यांनी थत्ते यांच्याकडे प्रथम लोकवर्गणीतून २५ हजार रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्यास सांगितले. नाशिककरांनी लोकवर्गणीतून हा निधी सरकारी तिजोरीत जमा केला. १४ जानेवारी १८९५ ला पुलाची कोनशिला बसविण्यात आली. दोन वर्षांत पुलाचे काम झाल्यावर खऱ्या अर्थाने नाशिकचा पंचवटीशी सेतू जोडला गेला. पुलाच्या निर्मितीसाठी दहा लाख खर्च झाला. तो भरून काढण्यासाठी वापरकर्त्यांकडून कराची वसुली सुरू झाली. विशेष म्हणजे पुलाच्या निर्मितीनंतर पुढे ती तब्बल ५० वर्षे सुरू होती. शहरातून पंचवटीकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने सहाजिकच मुंबई- आग्रा महामार्गावरील वाहतूकही कन्नमवार पुलाची निर्मिती होईपर्यंत म्हणजे ५५ वर्षे सुरू होती. यावरून या पुलाचे महत्त्व अधोरेखित होते. कालांतराने म्हणजे नाशिक महापालिकेच्या स्थापनेनंतर म्हणजे १९९३ ला या पुलाला समांतर असा अहिल्यादेवी होळकर पुलाची निर्मिती करण्यात आली. सहाजिकच या पुलालाही भक्कम आधार प्राप्त झाला. शहरातील सर्व छोट्या मोठ्या पुरांबरोबरच १९६९, २००८, २००६ अन्‌ २०१९ चा महापूर या पुलाने अनुभवला. 

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

तत्कालीन ब्राह्मणवृंदाचा विरोध 

या पुलाच्या निर्मितीला पूजाविधी करणाऱ्या तत्कालिन ब्राह्मणवृंदाचा प्रखर विरोध होता. गोदावरीवर पाय देऊन पलीकडे जाणे म्हणजे पाप असल्याची या वर्गाची धारणा होती. मात्र, याच पुलावरून पंचवटीत धार्मिक विधींसाठी जाणे सोपे असल्याचे तत्कालीन समाजधुरिणांनी पटविल्यानंतर हा विरोध शिथिल झाला व पुलाचे काम दोन वर्षांत पूर्ण झाले. 

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

दृष्टिक्षेपात... 

-पुलाचा एकूण खर्च : १० लाख रुपये 
-कालावधी : दोन वर्षे (१४ जानेवारी १८९५ ते १८९७) 
-तत्कालिन इंग्रज गव्हर्नर लॉर्ड हॅरीस यांच्या हस्ते कोनशिला 
-पुलाच्या निर्मितीनंतर पुढील ५० वर्षे वापरासाठी कर 
-१९९३ मध्ये या पुलाला समांतर अहिल्यादेवी होळकर पुलाची निर्मिती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Victoria Bridge on Godavari River completes 126 years nashik marathi news