
खरं तर टच स्क्रीनच्या दुनियेत मनाला 'टच' करून प्रबोधीत करणारी तर कधी व्यथा मांडून दिशा देणाऱ्या जात्यावरील ओव्या, शेवटी कधी ऐकल्या हे आपल्यालाही आठवणार नाही. ही संस्कृती पुढील पिढीकडे हस्तांतरित होईल का? हा प्रश्नच आहे. जात्यावरील ओव्या संकलित करून 'रावसाहेब' या संस्कृतीची जपणूक करतायत. कशी ते बघा...
नाशिक : 'डिजिटल क्रांती' पुढे गेलीय. जेव्हा सगळं ऑफलाइन होतं तेव्हा मनोरंजन, प्रबोधनात्मक काय होतं.? नाटक, संगीत मैफिल, तमाशा, काव्यमैफिल, पुस्तक. याचा परिपाक म्हणजे 'लोकवाङ्मय. बडबडगीते, जात्यावरच्या ओव्या, शेतावरील कष्टाची गाणी सगळं कसं तोंडपाठ होतं पूर्वी. यातला अनमोल ठेवा म्हणजे जात्यावरील ओव्या, ज्या लुप्त होतायत. त्या संकलित करण्याचे काम सोग्रस येथील माध्यमिक शाळेतील शिक्षक रावसाहेब जाधव करताहेत.
टच स्क्रीनच्या दुनियेत कशी होतेय संस्कृतीची जपणूक...
खरं तर टच स्क्रीनच्या दुनियेत मनाला 'टच' करून प्रबोधीत करणारी तर कधी व्यथा मांडून दिशा देणाऱ्या जात्यावरील ओव्या, शेवटी कधी ऐकल्या हे आपल्यालाही आठवणार नाही. ही संस्कृती पुढील पिढीकडे हस्तांतरित होईल का? हा प्रश्नच आहे. जात्यावरील ओव्या संकलित करून 'रावसाहेब' या संस्कृतीची जपणूक करतायत. नव्याचा ध्यास असलेल्या रावसाहेब जाधव यांनी सुरुवातीला ग्रंथमित्र रवींद्र देवरें मातोश्रींच्या गोड आवाजात ओव्या रेकॉर्ड करून युट्युब चॅनेलवर अपलोड केल्या. जोरदार प्रतिक्रिया मिळाल्या. हा व्हिडीओ व्हायरल झाला. Raosaheb Jadhav या नावाने सुरू झालेल्या यु ट्यूब चॅनेलवर सबस्क्रॅयबर वाढले, व्हयुज वाढले. जात्यावरच्या ओव्या लुप्त होण्याच्या या मार्गावर त्यांनी केलेलं कार्य मोलाचं ठरत आहे. रोज नव्या नव्या आजीबाईला भेटायचं. त्यांना कन्सेप्ट सांगायची, ओवीचा प्रकार सांगायचा, आवाजाचा चढउतार, चेहऱ्यावरील फोकस अशा सगळ्या गोष्टी दमछाक करणाऱ्या असल्या तरी रावसाहेब जाधव यांना उत्साह देणाऱ्या आहेत. जात्यावरच्या ओव्या संकलित करताना मराठी भाषेतील विविध पैलू या निमित्ताने उलगडलेत, ग्रामीण बोली, कसमादे भागातील अहिराणी बोली, खान्देशी बोली, हिंदी संमिश्र शब्द, अपभ्रंश, बोलीभाषेची लय अशा बाबी यानिमित्ताने अभ्यासू रसिकांच्या लक्षात येत आहे.
ऑस्ट्रेलियातील कुटुंबं ओव्या आवडल्या म्हणून फोन करतात..
धार्मिक रूढी, परंपरा, सण-उत्सव, नाते संबंध, विरगाथा, मुलाचं-पतीचं गोड कौतुक, स्वतःसोबत केलेलं स्वगत अशी वेगवेगळ्या रुपात भेटणारी ओवी, रसिकांची अभिरुची समृद्ध करतेय. रावसाहेब जाधव यांचा चॅनेल परदेशात देखील बघितला जातो, परदेशी गेलेल्या मराठी माणसाला आपली आई आठवते, कुणाला आजी, कुणाला माहेर, कुणाला आजोळ आठवतं. ऑस्ट्रेलियातील कुटुंबाने ओव्या आवडल्या म्हणून फोन करते.
समूहाची खंबीर साथ
रावसाहेब जाधव यांच्या सोबत बोलताना अचानक आठवणीचा गहिवर येतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंथरूणावर खिळलेल्या म्हाताऱ्या आजींनी उत्साहाने दुसऱ्यांदा फोन केला अजून एक व्हिडिओ काढण्याची विनंती केली, तेव्हा कामाची पोचपावती मिळाली असे ते सांगतात.ओव्या जपण्याच्या या धडपडीत त्यांना पत्नी प्रियभारती, मुली रुपा व मीरा, मित्र सागर जाधव, बालकलाकार अक्षता देवरे तसेच राहुल केदारे, रोहन कापडणे, अजित जाधव, रिमा चंदन, देव हिरे, भागवत मांदळे आदींसह चांदवडी रुपय्या या समूहाची खंबीर साथ लाभत आहे.
हेही बघा > धरणावर वनभोजन करताना दोन विद्यार्थी गायब...शोध घेतल्यास धक्काच!..
बाई नियमित काम करणारं एक चक्र
जात्यावरची ओवी बाईच्या जगण्याचा चालता फिरता आलेख आहे. बाई नियमित काम करणारं एक चक्र आहे. हे चक्र जात्याच्या चाकाला आपलं जगणं सांगत असते. हे जगणं रावसाहेब जाधव यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात छानसं टिपत आहे.- रेशमाबाई केदा देवरे (चांदवड)
नक्की बघा > PHOTOS : अकराव्या वर्षी समजले किन्नर झाल्याचे...अन् थेट झाली लोकांची आयडॉल!