गावपुढारी अन् नेत्यांना निवडणुकीचे वेध! गावगुंडीचा पुन्हा उडणार धुराळा

दीपक अहिरे
Wednesday, 4 November 2020

स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. बिहारची विधानसभा, महाराष्ट्रातील पदवीधर निवडणुकाच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोग जानेवारीच्या अखेरीस ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजवू शकतो, असा अंदाज आहे.

पिंपळगाव बसवंत(जि.नाशिक) : कोरोनामुळे प्रशासकाची नियुक्ती करून पुढे ढकललेल्या निफाड तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. बिहारची विधानसभा, महाराष्ट्रातील पदवीधर निवडणुकाच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोग जानेवारीच्या अखेरीस ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजवू शकतो, असा अंदाज आहे. त्यामुळे निफाडमध्ये गावगुंडीचा पुन्हा धुराळा उडणार आहे. 

गावपुढारी अन् नेत्यांना निवडणुकीचे वेध 
निफाड तालुक्यात ६४ ग्रामपंचायतींची मुदत सप्टेंबरमध्ये संपली आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचा कारभार शासकीय अधिकारी असलेल्या प्रशासकांच्या हाती दिला गेला. त्यामुळे स्थानिक नेत्यांचा प्रशासक होण्याचा हिरमोड झाला. प्रशासनातील अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्ती झाली असली तरी तोंडावर असलेल्या निवडणुकांच्या पाश्‍‍र्वभूमीवर गावागावांत तयारी सुरू आहे. नेते व कार्यकर्त्यांनी कोरोनात सामाजिक भावना जपण्याचा प्रयत्न केला. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या शासनाच्या मोहिमेतही इच्छुकांनी सक्रिय सहभाग घेतला. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! अखेरच्या क्षणीही मैत्रीचा घट्ट हात कायम; जीवलग मित्रांच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा

निफाड तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींसाठी हालचाली गतिमान 
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका तातडीने घेण्याबाबत शासनाच्या हालचाली सुरू झाल्याने राजकारणाची पंढरी असलेल्या निवडणुकाचा ज्वर चढू लागला आहे. जानेवारीत निवडणुका होण्याची अधिक शक्यता आहे. त्यात ओझर, लासलगाव, उगाव, सायखेडा, विंचूर, शिवडी, शिरवाडेवणी आदी महत्त्वाच्या ६४ ग्रामपंचायतींचा रणसंग्राम रंगणार आहे. विधानसभा निवडणुकीची पेरणी ग्रामपंचायत निवडणुकीत होत असल्याने आपल्या समर्थकांकडे जास्त ग्रामपंचायती याव्यात, असा प्रयत्न आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम यांचा असेल. टोकाचा संघर्ष असलेल्या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या लढती होणार असल्याने निफाडला ‘थंडी मे गरमी का ऐहेसास’, असे वातावरण असेल. 

हेही वाचा > धक्कादायक! रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा; पोलिस पतीसह पाच जणांकडून पत्नीचा छळ

सरपंच आरक्षणाकडेही लक्ष 
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा इतर निवडणुकांवरही होणारा परिणाम लक्षात घेता सर्वच पक्ष आणि संघटनांनी ग्रामपंचायतीवर वर्चस्वासाठी तयारी चालविली आहे. निवडणुकीत कोण कोणाशी जमवून घेईल, याचा अंदाज बांधणे सध्या कठीण असले तरी गावपातळीवरील राजकारण लक्षात घेऊनच जमवाजमव होऊ शकते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यात बिहार व पदवीधरच्या निवडणुका सुरू झाल्याने गावचा कारभारी होण्यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे. सरपंच आरक्षणाकडेही इच्छुकांचे लक्ष लागले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: village leaders waiting for Election nashik marathi news