नियमांचे उल्लंघन! येवल्यात प्रशासनाकडून दुकानांना टाळे; पालिकेकडून ६० हजारांचा दंड वसूल

yeola action against shop.jpg
yeola action against shop.jpg

नाशिक : (येवला) वारंवार सूचना देऊनही दुकानदार नियमांचे उल्लंघन करत असल्याने पालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांनी सोमवारी (ता. २१) रात्री येथील ममता स्वीट दुकानाला टाळे ठोकले. याशिवाय मागील दोन दिवसांत मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्यांवर पालिकेसह प्रांताधिकारी सोपान कासार यांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. शहरात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाकडून तीन दुकानांना सील ठोकण्यात आले आहे. 

पालिकेकडून ६० हजारांचा दंड वसूल 

तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढली आहे. सद्यःस्थितीत हा आकडा ६४२ वर पोचला आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत नियम पाळले जात नसल्यास रुग्णसंख्या वाढू नये यासाठी कारवाई करा, अशा सूचना केल्या होत्या. त्याअनुषंगाने शहराच्या विविध भागात पालिकेच्या पथकांसह मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांनी कारवाई करण्यात सुरवात करत पहिले विंचूर चौफुलीवरील फळविक्रेत्यांवर मास्क न वापरल्याने दंडात्मक कारवाई केली. तसेच परिसरात गर्दी करणाऱ्या गाड्या हटविल्या. विंचूर रोडवरील ममता स्वीट या दुकानात नियम डावलून रोजच गर्दी होत असल्याच्या तक्रारी झाल्याने सोमवारी (ता. २१) दुकान रात्री आठनंतरही उघडे ठेवत गर्दी केल्यामुळे मुख्याधिकारी नांदुरकर यांनी दोन हजार रुपये दंड करून दुकान सील करण्याची कार्यवाही केली. प्रांताधिकारी सोपान कासार यांनी स्वतः कारवाई पथकात सहभागी होत दंडात्मक कारवाई केली. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये जरब निर्माण होत असल्याने सर्वसामान्यांकडून या कारवाईचे स्वागत होत आहे. 

तीन दुकाने सील 

मुख्याधिकारी श्रीमती नांदुरकर यांच्या आदेशानुसार पालिका प्रशासनाकडून शहरात तीन दुकानांवर सील लावण्याची, तर चार जणांवर सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने दंडात्मक कारवाई झाली आहे. पालिकेच्या कारवाईमध्ये आतापर्यंत मास्क न लावलेल्यांवर ५७ हजार ७०० रुपये, सम-विषम नियमांचे पालन न केल्याबद्दल दुकानदारांना सहा हजार रुपये, तर सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांना चार हजार रुपये असे २५१ जणांवर कारवाई करून ६४ हजार रुपये दंडही पालिकेने वसूल केला आहे. 
 
घरोघरी सर्वेक्षण
 
‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत तालुक्यातील प्रत्येक घरी दोनदा जाऊन मधुमेह, हृदयविकार, किडनी यांसह संशयितांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण १२४ गावांसाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यापैकी एक जबाबदार कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रांताधिकारी सोपान कासार यांनी केली असून, बैठक घेऊन याबाबत त्यांनी सूचना केल्या. 

मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण निघत असूनही नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे कारवाई केली जात आहे. नागरिकांनी नियम पाळून स्वतःचा व इतरांचाही बचाव करावा. यापुढे पालिकेकडून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. - संगीता नांदुरकर, मुख्याधिकारी, येवला

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com