"जड अंतकरणाने नाशिकला निरोप...पण ऋणानुबंध कायम" विश्वास नांगरेंची ऑडिओ क्लिप व्हायरल; काय म्हणाले?

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 4 September 2020

कोरोनाच्या काळात अनेक प्रयत्न केले. पोलिसांच्या आरोग्यासाठी मुंबईतील संस्थांच्या मदतीतून घड्याळ, विविध काढे, सी व्हिटॅमिन, च्यवनप्राश यांसह मानसिक उभारी देण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र अशाही स्थितीत तीन सहकारी कोरोनापासून वाचवू शकलो नाही, याचा खेद आहे.

नाशिक : नाशिकचे मावळते पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांची मुंबईला बदली झाली. नाशिकमधील दीड वर्षाच्या कामकाजाबाबत त्यांनी (ता.३) पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांची ऑडिओक्लिप व्हायरल झाली. त्यात त्यांनी नाशिककरांशी असेलेले नाते व नाशिक शहर याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नांगरे पाटलांची ऑडिओ क्लिप व्हायरल..काय म्हणाले?

नाशिककर नमस्कार! गेले दिड वर्ष आपली सेवा करण्याची मला संधी मिळाली. आज मी माझ्या पोलीस आयुक्तपदाचा चार्ज नुतन cp दिपक पांडे यांच्याकडे सोपवत असून मुंबईला सहआयुक्तपदाचा चार्ज घेण्यासाठी रवाना होत आहे..गेली दिड वर्ष मला या शहराची सेवा करण्याची संधी मिळाली. या शहराला प्रगत, पौराणिकवादी असा ठेवा आहे. शिक्षण, शेती, उद्योग, टुरिझम, अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये नाशिकची घौडदौड अगदी जोमाने सुरु आहे. या शहरात काम करताना इथली माती, इथली माणसं, पाणी, निसर्ग याच्या प्रेमातच माणूस पडतो. या आल्हाददायक, अतिशय गोड अशा शहराला सोडून जाताना निश्चितच अंतकरण जड झालयं. पण हा ऋणानुबंध निश्चितच कायम राहिल. आपण माझ्या सदैव संपर्कात राहाल. आपलं प्रेम, आपला आशिर्वाद सदैव आपल्या पाठिशी राहिल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कोरोनाच्या काळात असो, सण-उत्सवाच्या काळात असो या अशा परिस्थितीत आपण नेहमी माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलात. नाशिकची जनताच मुळात प्रगल्भ आहे. कायद्याचे पालन करणारी आहे. सदैव प्रशासनाच्या उपक्रमात सहभाग नोंदविणारी आहे. त्यामुळेच या शहराची प्रगती अतिशय वेगाने होत आहे. या शहराच्या प्रगतीसाठी, आपल्या सगळ्यांच्या सुरक्षितेसाठी, आरोग्यासाठी सुयश चिंतितो. धन्यवाद! जय हिंद - विश्वास नांगरे पाटील

हेही वाचा > "वर्दी अंगावरच ठेवली, ती डोक्यात जाऊ दिली नाही!; नाशिकमधील कामकाजाबाबत विश्वास नांगरेंनी सांगितला अनुभव

तीन सहकारी गेल्याचे दुःख 

कोरोनाच्या काळात अनेक प्रयत्न केले. पोलिसांच्या आरोग्यासाठी मुंबईतील संस्थांच्या मदतीतून घड्याळ, विविध काढे, सी व्हिटॅमिन, च्यवनप्राश यांसह मानसिक उभारी देण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र अशाही स्थितीत तीन सहकारी कोरोनापासून वाचवू शकलो नाही, याचा खेद आहे. कुटुंबातील विवाहात नृत्य केल्याचा बाला डान्स व्हिडिओ खूप व्हायरल झाला. त्याचा थोडा त्रास झाला. याशिवाय अभिनेता अक्षयकुमार याचे हेलिकॉप्टर उतरले, लोक जमले त्याचा अक्षयकुमारला त्रास झाल्याचा मला त्रास झाला. वास्तविक तो नाशिकला पोलिसांच्या काही उपक्रमांसाठी येणार होता. पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थीसमोर त्याचे प्रात्यक्षिक होणार होते, त्याचा त्रास झाला अशी प्रांजल कबुलीही त्यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

हेही वाचा > किरकोळ वादाने घेतले भयानक वळण! पिता-पुत्राच्या खुनाने शहरात खळबळ

संपादन - ज्योती देवरे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vishwas nangre patil audio clip viral about nashik marathi news