'हा' परिसर हॉटस्पॉटवरुन 'कोरोनामुक्ती'च्या उंबरठ्यावर...वाचा काय आहे सिक्रेट..?

विक्रांत मते
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

वडाळागावाच्या रस्त्यापासून जायचे म्हटले तरी नागरिक घाबरत होते. महापालिका प्रशासनाने या भागात तातडीने तपासण्या वाढवरून कोरोनाची साखळी खंडित करण्याचा प्रयत्न केल्याने त्याचा परिणाम दिसत आहे.

नाशिक : कोरोनाने हॉटस्पॉटचा शिक्का मारलेला नाशिकचा हा परिसर कोरोनामुक्तीच्या वाटेवर...जिल्ह्यात जसजशी कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली तसतशी या परिसरातून रुग्ण सापडत गेले. काही दिवसांतच हे दोन परिसर कोरोना हॉटस्पॉट झाले. परंतू आता येथील रुग्णसंख्या आटोक्यात येत असून त्याचे एक सिक्रेट आहे. वाचा काय आहे ते...

कोरोनाची साखळी खंडित करण्याचा प्रयत्न

पूर्व विभागातील वडाळागाव व पंचवटी विभागातील फुलेनगर परिसर आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असून दोन्ही हॉटस्पॉट आता ग्रीन झोनमध्ये आले आहेत. महापालिका प्रशासनाने या भागात तातडीने तपासण्या वाढवरून कोरोनाची साखळी खंडित करण्याचा प्रयत्न केल्याने त्याचा परिणाम दिसत आहे. शहरात सहा एप्रिलला कोरोना रुग्ण आढळला. त्यानंतर गंगापूर रोड, आनंदवली, सातपूर मार्गे कोरोनाने वडाळागावात शिरकाव केला. प्रथम एक महिला व बाजार समितीच्या माध्यमातून एका कांद्याची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीद्वारे कोरोनाने वडाळागावाला वेढले. एक, दोन करत एप्रिल ते मेअखेरपर्यंत ६८ हून अधिक कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. बहुतांश झोपडपट्टी भाग असलेल्या वडाळागावाची दयनीय अवस्था झाल्याने संपूर्ण भागाच प्रतिबंधित करण्यात आला. वडाळागावाच्या रस्त्यापासून जायचे म्हटले तरी नागरिक घाबरत होते. महापालिका प्रशासनाने या भागात तातडीने तपासण्या वाढवरून कोरोनाची साखळी खंडित करण्याचा प्रयत्न केल्याने त्याचा परिणाम दिसत आहे. चार दिवसापूर्वी वडाळागावात दोन कोरोनाबाधित आढळले, त्यानंतर एकही रुग्ण आढळून आला नाही. 

फुलेनगर आटोक्यात 

फुलेनगर भागात कालिकानगर, सम्राटनगर, राजदूतनगर, हौसिंग बोर्ड, भराडवाडी, राहुलवाडी, तेलंगवाडी, वडारवाडी, गौंडवाडी आदी भागात कोरोनाने तब्बल ६७ नागरिकांना बाधित केल्याने सर्वाधिक मोठा हॉटस्पॉट ठरले. महापालिका प्रशासन, नगरसेवकांसह राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने या भागात मोठ्या प्रमाणात तपासण्या केल्या. संघाकडून साडेसहा हजार तर प्रशासनातर्फे नगरसेवकांनी राबविलेल्या तपासणी मोहिमेंतर्गत तब्बल बारा हजारांहून अधिक तपासण्या करण्यात आल्याने कोरोनाची साखळी तुटण्यास मदत झाली आहे. दररोज आठ ते दहा नागरिक कोरोनाबाधित आढळत होते. आता तेच प्रमाण एक, दोनच्या घरात आले आहे. 

असा वाढला कोरोना आलेख 

शहरात २१ मेस ५१ कोरोनाबाधित आढळले. २१ जूनपर्यंत १ हजार २०९, ३० जूनला २ हजार ०८०, अकरा जुलैला ३ हजार ९२७, २० जुलैला ५ हजार ९१८ तर ३० जुलैला ८ हजार ८३७ कोरोनाबाधित आढळले. त्यात सर्वाधिक रुग्ण वडाळागाव व फुलेनगरामध्ये आढळले. पूर्व विभागात १ हजार ६६९ पैकी एकट्या वडाळागावात ६८ जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. फुलेनगर व परिसरात ८० अधिक पॉझिटिव्ह आढळले. दोन्ही भागात कोरोनाची साखळी खंडित झाली आहे. 

हेही वाचा > रात्री दोघांचीही खड्ड्यात मरणाशी झुंज...मदतीची वाट बघतच तळमळत सोडला प्राण

कोरोना नियंत्रणासाठी ठरली ही महत्त्वाची कारणे 

- प्रतिबंधित क्षेत्रात वाढ 
- स्वॅबबरोबरच रॅपिड अॅन्टिजेन तपासणी 
- कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची हिस्ट्री शोधून तातडीने उपाय 
- प्रशासनाबरोबरच, नगरसेवक, सामाजिक संस्थांकडून तपासणी 

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wadala, phule nagar way to free from corona in nashik nashik marathi news