नाशिकमध्ये वडाळागाव ठरतेय 'कोरोना हॉटस्पॉट'...दिवसभरात 'इतक्या' रुग्णांची भर!

corona-covid19.jpg
corona-covid19.jpg

नाशिक : शहरातील वडाळागावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने कोरोना विषाणूचे हॉटस्पॉट होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. रविवारी (ता.24) जिल्ह्यात नवीन 14 रुग्ण वाढले. यात वडाळागावातील पाच, लेखानगरमध्ये तीन, कॉलेज रोडला दोन, पंचवटीत एक, तर सिडकोतील महाराणाप्रताप चौकात दोन आणि मुखेड (ता. येवला) व मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या एका संशयित गुन्हेगारा चाही समावेश आहे. 

जिल्ह्यात मृतांची संख्या आता 51

दरम्यान, 24 तासांमध्ये जिल्हा रुग्णालयात निमोण (ता. संगमनेर) येथील रुग्ण, पंचवटीतील रामनगरमधील रुग्णाचा झाकिर हुसेन रुग्णालयात, तर रावळगावच्या महिलेसह अन्य एकाचा मालेगाव रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात मृतांची संख्या आता 51 वर पोचली आहे. पंचवटीतील रुग्ण दिंडोरी रोडवरील बाजार समिती येथील हॉटेल व्यावसायिक आहे. वडाळागावातील मुमताजनगर येथील पाच रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि दोन युवती आहेत. तसेच संजीवनगर येथील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून, यात आठ आणि दोनवर्षीय बालकांसह एका दहावर्षीय चिमुकलीचाही समावेश आहे, तर कॉलेज रोड परिसरात पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील दोघे पॉझिटिव्ह आले आहेत. सिडकोतील महाराणा प्रताप चौकातील एकाच कुटुंबातील दोन महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी याच कुटुंबातील दोघे बाधित आहेत. तसेच, गोविंदनगर येथील रहिवासी डॉक्‍टर मालेगाव येथे कार्यरत होते. त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर जिल्ह्यातील मुखेड (ता. येवला) येथेही कोरोनाने शिरकाव केला असून, तेथील एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

नाशिक शहरातील रुग्णसंख्या 88 वर

मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका संशयित गुन्हेगाराचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आहे. हा रुग्ण मुळचा सायगाव (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी असून, वाहन सोडून द्यावे, यासाठी त्याने आमोदे फाटा येथील चेकपोस्टवर पोलिसांवर हल्ला झाल्याच्या प्रकरणातील संशयितांपैकी एक आहे. अटकेत असताना वैद्यकीय तपासणीदरम्यान स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 950 झाली असून, नाशिक शहरातील रुग्णसंख्या 88 वर पोचली आहे. 

चौघांचा मृत्यू 

रविवारी जिल्ह्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी रावळगाव येथील बाधित महिलेचा मालेगाव सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला, तर मालेगावातील आणखी एका रुग्णाचाही मृत्यू झाला. दुसरीकडे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात निमोण (ता. संगमनेर) येथील 63 वर्षीय रुग्णास मधुमेह व हृदयरोगाचा त्रास असल्याने त्यास दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोना रिपोर्टदेखील पॉझिटिव्ह होता. रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच, दोन दिवसांपूर्वी पंचवटीतील रामनगर येथील रुग्ण डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दाखल असताना त्यांचाही सायंकाळी मृत्यू झाला असून, तेही कोरोनाबाधित होते. यामुळे जिल्ह्यात आता मृतांची संख्या 51 झाली आहे. 

वडाळागावात दाट वस्तीमुळे धोका

वडाळागावात सहा दिवसांत नऊ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गावात दाट लोकवस्ती असल्याने कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होण्याची भीती व्यक्त होत आहे. रविवारी वडाळागावातील मुमताजनगर परिसरात पाच नवीन रुग्ण आढळल्याने याठिकाणी वेळीच उपाययोजना करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली असून, दाट लोकवस्तीमुळे वडाळागाव शहरातील हॉटस्पॉट ठरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com