लासलगावचे मनमाड तर होणार नाही ना? ग्रामस्थांपुढे भीषण प्रश्न

अरुण खंगाळ
Thursday, 24 September 2020

लासलगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सोळागाव पाणीपुरवठा योजनेला सध्या ग्रहण लागले आहे. एकदा पाणी येऊन गेल्यावर पाइपलाइन फुटणे, एक्स्प्रेस फीडर असूनदेखील वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, मोटारी जळणे या कारणामुळे वारंवार पाणीपुरवठा विस्कळित होत असल्याने या कृत्रिम पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांवर पाणीकरीता भटकण्याची वेळ आली आहे. ​

नाशिक/लासलगाव : लासलगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सोळा गाव पाणीपुरवठा योजनेची पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटणे हे जणू पाचवीला पुजले आहे. मागील १० ते १२ दिवसांपासून विविध कारणांमुळे गावाला पाणीपुरवठा होत नसल्याने ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी महिलांवर वणवण फिरण्याची वेळ आली आहे. 

लासलगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सोळागाव पाणीपुरवठा योजनेला सध्या ग्रहण लागले आहे. एकदा पाणी येऊन गेल्यावर पाइपलाइन फुटणे, एक्स्प्रेस फीडर असूनदेखील वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, मोटारी जळणे या कारणामुळे वारंवार पाणीपुरवठा विस्कळित होत असल्याने या कृत्रिम पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांवर पाणीकरीता भटकण्याची वेळ आली आहे. यातच लासलगाव ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकांना दिल्याने त्यांच्याकडे चार ग्रामपंचायतींचा अतिरिक्त कारभार यामुळे पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष झाले आहे. 

हेही वाचा > जिल्ह्यात पुन्हा रेमडेसिव्हिरच्या टंचाईसह काळा बाजार; रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप 

लासलगावचे होणार मनमाड? 

आशिया खंडातील सर्वांत मोठी बाजारपेठ, भाभा अणुसंशोधन केंद्र, एनएचआरडीएफ नाफेड यासारख्या अग्रगण्य संस्था असताना मोठी वर्दळ लासलगावमध्ये असते, पाणी विकत घेण्याची वेळ लासलगावकरांवर आली आहे. त्यामुळे लासलगावचे मनमाड तर होणार नाही ना, असा यक्षप्रश्न लासलगावकरांना पडत आहे. 

प्रशासक नॉट रिचेबल 

पाणी प्रश्‍नाचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते दिवसभर नॉट रिचेबल होते. अनेक वेळा संपर्क करूनही त्यांचा संपर्क न झाल्याने प्रशासक याप्रश्‍नी किती गंभीर आहेत हे दिसून आले. 
 
सोळागाव पाणीयोजना १९९५ ची आहे. त्या वेळचे कास्टिंग पाइप जीर्ण झालेले आहेत. त्यामुळे नवीन पीव्हीसी पाइपलाइन बदलल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. केंद्रीय शुद्ध पेयजल योजना राबविण्यासाठी खासदार भारती पवार यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. 
-संतोष पलोड, ग्रामपंचायत सदस्य, लासलगाव 
 
लासलगावला महिन्यातून चार ते पाच वेळा पाणी येते, मग आम्ही का म्हणून महिन्याचे पाणी बिल भरावयाचे, पाइपलाइन फुटते तेव्हा ग्रामपंचायतीने वॉर्डानुसार पुरवठा करण्याची जबाबदारी आहे, नवीन पाइपलाइनसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहेत. 
-स्मिता कुलकर्णी, गृहिणी, लासलगाव 

हेही वाचा > सराईत गुंड पम्याची दहशत झाली फुस्स! भर बाजारात जेव्हा पोलिसांनी काढली वरात

सोळागाव पाणीपुरवठा योजनेचे खापर सतत वीज वितरण विभागावर फोडले जाते, पण वस्तुस्थिती तशी नाही तर रानवड, नैताळे, नांदूरमध्यमेश्वर येथे काही तांत्रिक अडचणींमुळे बिघाड झाल्यावर हा प्रश्न येतो, यामुळे जीर्ण झालेली पाइपलाइन फुटते हीच मोठी डोकेदुखी आहे. 
- सुरवसे, उपकार्यकारी अभियंता, निफाड 

 

संपादन- रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water shortage in lasalgaon nashik marathi news