अखेर ‘वॉटरग्रेस’ काळ्या यादीत; मनपा स्थायी समिती सभेत ठराव मंजूर

प्रमोद सावंत
Friday, 9 October 2020

उर्वरित आठ सदस्यांनी स्थायी समितीची सभा बोलावण्याची मागणी केली होती. गुरुवारी श्री. आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत या दोन प्रमुख प्रस्तावांसह हद्दवाढ भागातील विकास आराखडा तयार करण्यासाठी ॲपेक्स कन्सलटंट यांची निविदा मंजूर करण्यात आली.

नाशिक : (मालेगाव) महापालिका क्षेत्रात कचरा संकलन करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा ठराव महापालिका स्थायी समितीच्या गुरुवारी (ता.८) झालेल्या सभेत मंजूर करण्यात आला. सभेत महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी शहरासह हद्दवाढ भागातील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण व मालमत्तांना क्रमांक टाकून त्याच्या नोंदी करण्याची कोल्बो ग्रुप नागपूरची निविदा मंजूर करण्यात आली. 

ठराव बहुमताने मंजूर

प्रभारी सभापती तथा उपमहापौर नीलेश आहेर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी झालेल्या ऑनलाइन सभेत हे निर्णय घेण्यात आले. स्थायी समिती सभापती डॉ. खालीद परवेज यांच्यासह आठ सदस्यांची मुदत गेल्या महिन्यात संपुष्टात आली. उर्वरित आठ सदस्यांनी स्थायी समितीची सभा बोलावण्याची मागणी केली होती. गुरुवारी श्री. आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत या दोन प्रमुख प्रस्तावांसह हद्दवाढ भागातील विकास आराखडा तयार करण्यासाठी ॲपेक्स कन्सलटंट यांची निविदा मंजूर करण्यात आली. वॉटरग्रेसला काळ्या यादीत टाकण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. 

अस्लम अन्सारी ठरावावर तटस्थ

या ठरावावर काँग्रेसचे शेख फकीर मोहंमद तटस्थ होते. याशिवाय नवीन निविदा मंजूर होईपर्यंत महापालिकेला स्टेशनरी पुरविण्यासाठी रोशनी ट्रेडिंगला २० दिवसांची मुदतवाढ देण्याचा ठराव मंजूर झाला. अस्लम अन्सारी या ठरावावर तटस्थ होते. सभेला श्री. आहेर, अस्लम अन्सारी, हमिदाबी शेख जब्बार, निहाल सुलेमान, फकीर शेख मोहंमद, मदन गायकवाड, भरत बागूल आदी सात सदस्य, उपायुक्त नितीन कापडणीस, रोहिदास दोरकुळकर, नगरसचिव राजेश धसे आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते. 

हेही वाचा > कैद्याची मास्कच्या नाडीने गळफास लावून आत्महत्या; नाशिक मध्यवर्ती कारागृहातील घटना

शहरातील कचरा संकलन ठेकेदार वॉटरग्रेसविषयी गेली काही वर्षे नगरसेवकांसह सामान्य नागरिकांच्या सातत्याने तक्रारी सुरू आहेत. मी स्वत: केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये वजन वाढविण्यासाठी कचऱ्यात दगड, माती आढळून आली होती. आयुक्तांनी ठेका रद्दसाठी ५ ऑक्टोबरला वॉटरग्रेसला नोटीस बजावली आहे. हीच प्रक्रिया पुढे सुरू ठेवायची असल्याने वॉटरग्रेसला काळ्या यादीत टाकण्यात आले. - नीलेश आहेर, प्रभारी स्थायी समिती सभापती  

हेही वाचा > विनानोंदणी ऑक्सिजन पुरवठ्यातून नाशिकच्या सात कंपन्याचे पितळ उघड; कंपन्यांवर नियंत्रण कुणाचे? 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Watergress finally blacklisted in malegaon nashik marathi news