बोनस तर सोडाच, किमान वेतनही मिळेना; कंत्राटी कामगार चिंतेत

नीलेश छाजेड 
Tuesday, 10 November 2020

एकलहरे वीज केंद्रात सुमारे हजार ते दीड हजार कंत्राटी कामगार काम करत असून यातील काही कंत्राटदारांनी कामगारांचे PF, ESI भरले नाहीत तसेच जानेवारी 2020 पासून किमान वेतनाचे दर वाढूनही अद्यापही कामगारांना पैसे मिळाले नाहीत.

नाशिक/एकलहरे : नाशिक जिल्ह्यात HAL, कर्षण मशीन कारखाना, चलार्थ मुद्रणालय, एकलहरे वीज केंद्र असे सरकारी प्रकल्प तसेच अंबड, सातपूर, सिन्नर येथील MIDC मिळून लाखो कामगार कंत्राटी पध्दतीने काम करत आहेत. पण या लोकांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अद्याप बोनस नाही की किमान वेतन ही कंत्राटदार देत नाही असे दिसून येते. काहींना बोनस मिळाला पण तो तूटपुंज्या स्वरूपाचा असल्याने या महागाईच्या काळात सण कसा साजरा करावा असा प्रश्न या कंत्राटी कामगारांना पडला आहे.

केंद्र सरकारने नुकताच संसदेत कामगार कायदा संमत केला असून यात 44 कायद्याचं रूपांतर 4 विधेयकात केले असून यात कंत्राटी कामगार यांचा फायद्याचे आहे असे केंद्रीय कामगार मंत्र्यांना वाटते. परंतु वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. जागतिक उदारीकरण व आउटसोर्सिंग केल्याने कंत्राटं वाढली तसेच कंत्राटदारांचा राजकीय वावर व वजन वापरून कंत्राटी कामगारांची गरज आहे की नाही याचा विचार न करता वारेमाप कंत्राटं दिले जातात, कामाचा दर्जा, अनुभव याचाही विचार होत नाही.

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..

नाशिक औष्णिक वीज केंद्रात कामगारांचे हाल 

एकलहरे वीज केंद्रात सुमारे हजार ते दीड हजार कंत्राटी कामगार काम करत असून यातील काही कंत्राटदारांनी कामगारांचे PF, ESI भरले नाहीत तसेच जानेवारी 2020 पासून किमान वेतनाचे दर वाढूनही अद्यापही कामगारांना पैसे मिळाले नाही. कोविड 19 च्या काळात सरकारने PF कंत्राटदारांना परत केला असून कंत्राटदारांनी PF कर्मचाऱ्यांना अदा केला नाही.त्याचप्रमाणे निम्म्याहून अधिक लोकांचे PF त्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही. नाशिक औष्णिक वीज केंद्रातील एका मोठ्या कंत्राटदारांने त्याच्या कामगारांचे 20 टक्के वेतनवाढ, PF, वैद्यकीय सुविधाही गेल्या तीन वर्षांपासून कामगारांना मिळत नाही सदर ठेकेदार हा असोसिएशनचा पदाधिकारी असल्याने व्यवस्थापन ही त्यांच्याबाबतीत कारवाई करत नाही. त्यामुळे अन्यायाची भावना कामगारांच्या मनात असून कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे समजते.

आम्हा कामगारांना जानेवारी पासून आक्टोबर महिना भरला आता पर्यत आम्हाला शासकीय नियमानुसार 20% आलेली वाढ आम्हा कामगाराना महानिर्मिती कंपनीने दिली नाही व शासनाच्या परिपत्रक प्रमाणे किमान वेतन व भत्ते वाढ पेमेंट व स्लिप मिळत नाही. आतापर्यत दिवाळी गोड व्हावी म्हणून कामगाराना बोनस लवकर जाहीर करून मिळावा ही कामगार वाट पाहत आहे लवकर दिवाळीची खरेदी करता येईल प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन आमची आलेली 20% वाढ किमान वेतन वाढ देऊन दिवाळी गोड करावी ही प्रशासनाला कामगाराच्या वतीने कळकळीची विनंती.
- किशोर बागुल , कामगार

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...

कामगारांची आर्थिक पिळवणूक वर्षानुवर्षे सुरू असून आता 20 टक्के वाढ व बोनस वेळेवर नाही मिळाला तर आंदोलन केले जाईल 
-नानाजी लोंढे, जिल्हाउपाध्यक्ष रिपब्लिकन एम्प्लॉयज फेडरेशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workers do not get the minimum wage nashik marathi news