जागतिक आदिवासी दिन : आदिवासींचा विकास अन् शिक्षण एकमेकांशी तादात्म्य

महेंद्र महाजन
Sunday, 9 August 2020

आदिवासी तरुण वैद्यकीय, सुरक्षा, पोलिस, शिक्षण क्षेत्रात यशाची पताका फडकावत आहेत. हे कमी काय म्हणून निसर्गदत्त वातावरणात वाढलेल्या हेमलता अंबादास गायकवाडने एव्हरेस्ट शिखरावर तिरंगा फडकावला. तिने बारावी परीक्षेत ६५.७ टक्के गुण मिळवलेत. आदिवासींच्या अशा आयडॉलबद्दल... 

नाशिक : आदिवासींचा विकास अन् शिक्षण हे एकमेकांशी तादात्म्य पावलेलं आहे. आश्रमशाळेत शिकून आदिवासी तरुणांनी सनदी अधिकारीपदाला गवसणी घातली. याच शृंखलेतील डॉ. योगेश भरसट हे आहेत. एम.बी.बी.एस. व एम.डी.पर्यंतचे वैद्यकीय शिक्षण घेतले. प्रशासकीय सेवारूपी व्‍यासपीठाचा प्रभावीपणे उपयोग कशाप्रकारे करता येतो, याचे आदर्श उदाहरण निर्माण करण्यासाठी त्‍यांनी स्‍पर्धा परीक्षेतून प्रशासकीय सेवेत करिअर करण्यास सुरवात केली. सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत हिने ऑलिंपिकपर्यंत मजल मारली. तिच्यापासून प्रेरणा घेत तरुण-तरुणी ट्रॅकवरून धावताहेत. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये अनेक आदिवासी तरुणांनी यश मिळविले. वैद्यकीय, सुरक्षा, पोलिस, शिक्षण क्षेत्रात यशाची पताका फडकावत आहेत. हे कमी काय म्हणून निसर्गदत्त वातावरणात वाढलेल्या हेमलता अंबादास गायकवाडने एव्हरेस्ट शिखरावर तिरंगा फडकावला. तिने बारावी परीक्षेत ६५.७ टक्के गुण मिळवलेत. आदिवासींच्या अशा आयडॉलबद्दल... 
 

जनतेच्या उत्थानासाठी सेवाव्रती

अत्‍यंत सामान्‍य परिस्थितीतून वाटचाल करत, आश्रमशाळेतून शिक्षण घेत पुढे एम.बी.बी.एस. व एम.डी. असे वैद्यकीयचे पदवी अन् पदव्युत्तर शिक्षण घेतले. ठरवले असते तर मोठ्या रुग्णालयात प्रॅक्टिस करत सुबत्ता मिळवता आली असती. तळागाळातील जनतेचे उत्थान करायचे या ध्येयामुळे प्रशासकीय सेवेचा मार्ग अवलंबला. प्रशासकीय सेवेचा जनतेच्‍या हितासाठी कशा प्रकारे उपयोग करता येऊ शकतो, याचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे. सनदी अधिकारीपदाला गवसणी घालूनही आदिवासी पाड्यावरील युवक, नागरिकांच्या हितांसाठी झटणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचे नाव आहे डॉ. योगेश भरसट. सध्या ते उज्जैन येथील बडनगरमध्ये उपजिल्‍हाधिकारीपदाची धुरा सांभाळत आहेत. आपल्‍या वैद्यकीय ज्ञानाच्‍या जोरावर तेथील कोरोनाच्‍या परिस्‍थितीत त्यांनी आशादायक बदल घडवलाय. 
खडतर परिस्‍थितीचा सामना करताना डॉ. भरसट यांनी निरगुडे (ता. पेठ) येथील आश्रमशाळेतून शालेय शिक्षण घेतले. केंद्रात अव्वल क्रमांकासह यश मिळविले. ध्येयात स्‍पष्टता असली तर कुठलीही गोष्ट गतिरोधक ठरू शकत नाही, याची झलक त्‍यांनी या वेळी दिली. के.टी.एच.एम. महाविद्यालयातून विज्ञान शाखेत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्‍यानंतर वैद्यकीय शिक्षण घेतले. त्‍यांनी स्‍पर्धा परीक्षांच्‍या तयारीला सुरवात केली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षेत प्रारंभी इंडियन रेव्‍हेन्‍यू सर्व्हिसेस केडर मिळत असताना, यात उद्योगविश्र्वाशी संबंध येणार होता. आपल्‍याला तळागाळातील जनतेसाठी काम करायचे, या भावनेतून त्‍यांनी पुन्‍हा स्‍पर्धा परीक्षांतील प्रयत्‍न सुरू ठेवले. यातून त्‍यांनी सनदी अधिकारी होण्याचे आपले स्‍वप्‍न पूर्ण केले. यानंतर लगेचच मिळेल त्‍या नियुक्‍तीत त्‍यांनी आपली छाप सोडायला सुरवात केली. 

यशोदीप मंडळाच्‍या माध्यमातून सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग 

मातीची नाळ जोडून ठेवत डॉ. भरसट यांनी पेठ तालुक्‍यात विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. सुपर टेन व यांसारख्या अन्‍य उपक्रमांतून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्‍पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणे, तसेच आदिवासी पाड्यांवर शिबिरांच्‍या माध्यमातून आरोग्‍य सेवा पोचविली जात आहे.

उज्जैनमध्ये प्रभावी कामगिरी 

सध्या डॉ. भरसट मध्य प्रदेश, उज्‍जैन येथील बडनगरमध्ये उपजिल्‍हाधिकारीपदाची धुरा सांभाळताय. या भागात मेअखेरीस एका घरातील कोरोनामुळे सात मृत्‍यू झालेले असताना प्रादुर्भाव रोखण्याचे आव्‍हान होते. वैद्यकीय क्षेत्राची पार्श्वभूमी असल्‍याने डॉ. भरसट यांची परिसरात नियुक्‍ती करण्यात आली. तपासणी मोहिमेत सहभागी होत प्रसंगी स्‍वतः तपासणी करत डॉ. भरसट त्‍यांनी वैद्यकीय ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घेतला. ज्‍येष्ठ नागरिक, गरोदर महिला, बालकांशी दैनंदिन संवाद साधत समस्‍या जाणून घेतल्‍या. सार्वजनिक ध्वनिक्षेपक यंत्रणेद्वारे जनजागृती केली. परिणामी, या भागात गेल्‍या अडीच महिन्‍यांत कोरोनामुळे एकही मृत्‍यू झालेला नाही. 

एव्हरेस्टवीर हेमलताला व्हायचंय सनदी अधिकारी 

हस्ते (ता. सुरगाणा) येथील आदिवासी कुटुंबातील हेमलता. आठवतंय ना तुम्हाला २४ मे २०१९ ला पहाटे पाचला एव्हरेस्ट शिखरावर तिरंगा फडकावणाऱ्या नऊ आदिवासी विद्यार्थ्यांपैकी एक होती हेमलता. तिने खो-खो आणि ॲथलेटिक्समध्ये प्रावीण्य मिळवले आहे. निसर्गदत्त काटक शरीरयष्टी असताना खेळामुळे फिटनेस तयार झाल्याने अनेक संकटांच्या मानगुटीवर पाय रोवून उभ्या राहिलेल्या हेमलताला जगातील सर्वांत उंच शिखरावर पाऊल टाकता आलंय. तिने बारावीत मिळालेल्या चांगल्या गुणामुळे बी. ए. पूर्ण करून सनदी अधिकारी व्हायचंय ठरवलंय. 

हेही वाचा - थरारक! नांदगाव हत्याकांडाने जाग्या केल्या सुपडू पाटील हत्याकांडच्या स्मृती..आजही ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना

आदिवासी विकास विभागातर्फे ‘मिशन शौर्य हा उपक्रम राबविण्यात येत आहे. २००८ मध्ये चार आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकावण्यात यश मिळवले होते. हेमलताची दुसरी बॅच. धुळ्याची चंद्रकला गावित, चंद्रपूरचा सूरज आडे, नाशिकचा अनिल कुंदे आणि मनोहर हिलींगसह हेमलता, अमरावतीचा मुन्ना धिकार, चंद्रपूरची अंतू कोटनाके, बीडचा सुग्रीव मंदे, पालघरचा केतन जाधव अशा नऊ जणांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. खो-खो आणि ॲथलेटिक्स खेळाने जिद्द आणि धाडस दिले. त्याच्या जोरावर एव्हरेस्टवर पाऊल ठेवल्याचे हेमलताने सांगितले. हेमलताचे वडील पारंपरिक पद्धतीने शेती कसतात. तिचा थोरला बंधू वडिलांना शेतीत मदत करतो. रोहिदास या बंधूचे वेल्डिंगचे दुकान आहे. हेमलताचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण भेगू-सावरपाडा आश्रमशाळेत झाले. तिने अकरावी आणि बारावीचे शिक्षण अलंगुणच्या आदर्श संस्कार शिक्षण प्रसारक मंडळाच्या आश्रमशाळेत घेतले. शालेय जीवनात तिने पाचवेळा राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत नाशिकचे प्रतिनिधित्व करत एकदा महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषवले आहे. चारशे आणि पंधराशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत ती सहभागी झाली होती. 

भीती? छे..! 

एव्हरेस्ट शिखरावर पाय ठेवल्यावर भीती नाही का वाटली? हा सामान्यांना भेडसावणारा प्रश्‍न. हेमलताने भीती? छे..! असे उत्तर देऊन एव्हरेस्ट मोहिमेच्या तयारीची माहिती दिली. ती म्हणाली, की सहा महिने आम्ही प्रशिक्षण घेतले. वर्धामध्ये शिबिराला सुरवात झाली. दुसऱ्या टप्प्यात हैदराबादमध्ये दगडांवर रॅपलिंग केले. दार्जिलिंगमध्ये तंबू ठोकून बर्फात कसे राहायचे, हे शिकवले गेले. सिक्कीममध्ये बेसिक कोर्स घेण्यात आला. पाठीवर पंचवीस किलो वजन घेऊन जंगलातून चालण्याचा सराव केला. नागपूरला दोनवेळा प्रशिक्षण झाले. लेह-लडाखमध्ये पंधरा दिवस ऑक्सिजन कमी असलेल्या भागात कसे राहायचे, हे पंधरा दिवस शिकलो. बर्फाच्या भेगातून पुढे कसे जायचे याचेही धडे गिरवले. वर्धामध्ये वजन वाढविण्यात आले. मग एव्हरेस्ट शिखराच्या भागात आम्ही दीड महिने होतो. छोटे पर्वत चढ-उताराचा सराव केला. १९ मेस एव्हरेस्ट शिखर चढायला सुरवात केली. २४ मेस पहाटे पोचल्यावर ऑक्सिजन नसलेल्या उंचीवर तिरंगा फडकावल्याचा अभिमान वाटला. 

हेही वाचा > नांदगाव हादरले...एकाच कुटुंबातील सर्वांची निघृण हत्या; मोठी खळबळ

 
ऑक्सिजन संपले आणि बरेच काही 

एव्हरेस्ट शिखरावर चढाई करत असताना विपरीत परिस्थितीला सामोरे जात असताना उद्‍भवलेल्या प्रश्‍नांची माहिती हेमलताने दिली. ऑक्सिजन संपला, धुक्याच्या वाऱ्यात उडून गेले होते. सिलिंडर मानेवर येत राहिल्याने मानेला सूज आली होती. ही सारी आव्हाने सरावामुळे प्रभावी वाटले नाहीत आणि यश मिळाल्याने जगण्यासाठी आत्मविश्‍वास मिळाला आहे, असे तिने सांगितले.  

 

संपादन - रोहित कणसे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Tribal Day: Tribal Development and Education are correlated to each other nashik marathi news