बाजार समितीत आजपासून पुढील बुधवारपर्यंत लिलावाला सुट्टी

संतोष विंचू
Wednesday, 11 November 2020

अंदरसूल उपबाजार आवारात मंगळवारी २४५ रिक्षा पिकअप आणि १८७ ट्रॅक्टर मधून सुमारे १५०० क्विंटल उन्हाळ कांदयाची आवक झाली. येथे उन्हाळ कांदयास प्रतिक्विंटल किमान ९०० ते कमाल ४४६१ (सरासरी ३६००) रुपये असा बाजारभाव दिला गेला. 

येवला (नाशिक) : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांदा दरात सोमवारी (ता. 9) ५५० रुपयांनी वाढ झाल्याने काहीसा दिलासा मिळाला. तर मंगळवारी कांदा दरात पुन्हा घसरण झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. बुधवारी (ता. 11) कमाल बाजारभावात ६८९ तर सरासरी भावात २५० रुपयांनी घसरण झाली. दरम्यान दिवाळीच्या निमित्ताने येथील बाजार समितीत तब्बल आठवडाभर म्हणजे बुधवारपासून ते बुधवारपर्यंत (ता.१८) लिलाव बंद ठेवण्यात आले आहे. 

सरासरीत २५० रुपयांनी घसरण

मागील आठवड्यात उन्हाळ कांद्याचे भावात घसरण होत राहिल्याने चिंता वाढत होती. मात्र नवा आठवडा सुरु होताच कृषी उत्पन्न बाजार समितीत दरात वाढ झाल्याने शेतकरी सुखावला. गेल्या आठवड्यातील शनिवारच्या (ता.३१) तुलनेत सोमवारी (ता.९) उन्हाळ कांदा बाजारभावात प्रतिक्विंटल सरासरी ६५० रुपयांनी वाढ झाली. तर आवकही शनिवारच्या तुलनेत दुप्पट झाली होती. सोमवारी (ता. ९) उन्हाळ कांदा आवकेत वाढ होतानाच किमान, कमाल व सरासरी बाजारभावात देखील वाढ झाल्याने कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचे चेहरे उजळले गेले. सोमवारी (ता. ९) झालेल्या लिलावात मुख्य बाजार आवार आणि अंदरसूल उपबाजार आवारात किमान १ हजार ते कमाल ५ हजार ३५० (सरासरी ३८५०) रुपये असा बाजारभाव मिळाला. 

मंगळवारी पुन्हा भावात घसरण

सोमवारी उन्हाळ कांदयाचे किमान बाजारभाव हे १०० रुपयांनी, कमाल बाजारभाव ६०० रुपयांनी तर सरासरी बाजारभाव हे ६५० रुपयांनी वधारले गेल्याचे चित्र समोर आले. मात्र एक रात्र आड जाताच मंगळवारी पुन्हा भावात घसरण झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे येथील लिलाव मंगळवारच्या आठवडे बाजारामुळे बंद होते. मात्र अंदरसूल उपबाजार आवारात मंगळवारी २४५ रिक्षा पिकअप आणि १८७ ट्रॅक्टर मधून सुमारे १५०० क्विंटल उन्हाळ कांदयाची आवक झाली. येथे उन्हाळ कांदयास प्रतिक्विंटल किमान ९०० ते कमाल ४४६१ (सरासरी ३६००) रुपये असा बाजारभाव दिला गेला. 

गुरुवार (ता.१९) पासुन लिलाव सुरु होणार

सोमवारच्या तुलनेत मंगळवारी येथे उन्हाळ कांदा किमान बाजारभावात १०० रुपये, कमाल बाजारभावात ६८९ रुपये तर सरासरी बाजारभावात २५० रुपयांनी घसरण झाली. परिणामी कांदा घेवून आलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा निराशेच्या छटा उमटल्या अन् संतापही व्यक्त झाला. 
दरम्यान येथील बाजार समितीला आज बुधवार (ता.११) ते शुक्रवार (ता.१३) पर्यंत व्यापारी अर्जावरुन, शनिवार (ता.१४) ते सोमवार (ता.१६) पर्यंत दिपावली व भाऊबीजनिमित्त तसेच बुधवारी व्यापारी अर्जावरुन बाजार समितीचे मुख्य आवारात कांदा, मका व भुसारधान्य लिलाव बंद राहणार आहे. तर गुरुवार (ता.१९) पासुन लिलाव सुरु होणार आहे.

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..

असे मिळाले आठवडाभरात भाव...
वार – कमाल भाव – सरासरी 

सोमवार - ६५४१ - ५२००

मंगळवार - ५२०० - ३९००

बुधवार - ४९५१ - ३३००

शुक्रवार - ४६०१ - ३२००

शनिवार - ४७५१ - ३२००

सोमवार - ५३५० - ३८५०

मंगळवार – ४६६१ – ३६००

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yeola Agricultural Produce Market Committee auction closed till next Wednesday nashik marathi news