नाशिकच्या अक्षयचा भन्नाट अविष्कार! वाहन न्‍यूट्रल करताच इंजिन होणार बंद; क्‍लच दाबताच गाडी सुरू

अरुण मलाणी
Sunday, 17 January 2021

अक्षयचे वडील एकनाथ बोडके हे इलेक्ट्रिकल सिस्टिम क्षेत्रातील व्‍यावसायिक असून, त्‍यांच्‍यासह नरेंद्र धांडे यांचे त्‍यांना मार्गदर्शन लाभले. दरम्‍यान, संशोधन करत असताना अक्षय सध्या बहुराष्ट्रीय कंपनीत नवीन उत्‍पादन विकसित करण्यासंदर्भातील शाखेत अभियंता म्‍हणून कार्यरत आहेत. 

नाशिक : सिग्‍नलवर किंवा अन्‍य ठिकाणी काही मिनिटांसाठी वाहन उभे केल्‍यावर अनेक चालक वाहन सुरूच ठेवतात. अशात ध्वनी व वायुप्रदूषण होतेच, सोबत इंधनाचीही नासाडी होते. पण यावर तोडगा म्‍हणून नाशिकच्‍या युवा अभियंता असलेल्‍या अक्षय एकनाथ बोडके याने २०१२ पासून संशोधन सुरू केले होते. त्‍याच्‍या संशोधनाला यश आले असून, या तंत्रज्ञानासाठी नुकतेच त्‍याला राष्ट्रीय स्‍तरावरील पेटंटदेखील मिळाले आहे. याद्वारे कुठल्‍याही वाहनास अक्षयने बनविलेले किट बसविल्‍यास संबंधित वाहन न्‍यूट्रल करताच पाच सेकंदांनी इंजिन बंद होते व क्‍लच दाबताच वाहन पुन्‍हा सुरू होते. 

तंत्रज्ञानासाठी पेटंट प्राप्त 

नाशिकच्‍या अक्षय बोडके यांचे शालेय शिक्षण रचना विद्यालयातून झाले असून, दहावीनंतर संगमनेर येथील अमृतवाहिनी पॉलिटेक्निक येथून पदविका शिक्षण घेतले. चिपळूणच्‍या जीआयटी अभियांत्रिकीतून पदवी शिक्षण पूर्ण केले. पदवी शिक्षण सुरू असतानाच त्‍याने संशोधन कार्याला सुरवात केली होती. वाहने उभी असताना, त्‍यांचे इंजिन आपोआप बंद व्‍हावे, क्‍लच दाबताच सुरू व्‍हावे, असे तंत्र विकसित करण्यासंदर्भात त्‍याने संशोधन हाती घेतले. या संदर्भात तेव्‍हाच पेटंटदेखील दाखल केले होते. तब्‍बल आठ वर्षांच्‍या परिश्रमांनंतर त्‍याला नुकतेच पेटंट प्राप्त झालेले आहे. अक्षयचे वडील एकनाथ बोडके हे इलेक्ट्रिकल सिस्टिम क्षेत्रातील व्‍यावसायिक असून, त्‍यांच्‍यासह नरेंद्र धांडे यांचे त्‍यांना मार्गदर्शन लाभले. दरम्‍यान, संशोधन करत असताना अक्षय सध्या बहुराष्ट्रीय कंपनीत नवीन उत्‍पादन विकसित करण्यासंदर्भातील शाखेत अभियंता म्‍हणून कार्यरत आहेत. 

महत्त्वपूर्ण बाब 

सध्या काही कंपन्‍यांच्‍या दुचाकी व चारचाकी वाहनांना असे तंत्रज्ञान उपलब्‍ध झाले आहे. परंतु अक्षयने २०१२ मध्ये ही संकल्‍पना मांडली होती. तेव्‍हा दुचाकी क्षेत्रात ही संकल्‍पना अस्‍तित्‍वात नव्‍हती. चारचाकी वाहनांमध्येही मर्यादित कंपन्‍यांकडे तंत्रज्ञान होते. पण अक्षयच्‍या या तंत्रज्ञानामुळे सध्या रस्‍त्‍यावर धावत असलेल्‍या वाहनांनादेखील उपकरण बसविल्‍यास तंत्रज्ञानाचा फायदा होऊ शकतो. दुचाकी, चारचाकी, ट्रक अशा सर्व प्रकारच्‍या वाहनांना उपकरण बसविता येऊ शकते. 

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

...असे आहे तंत्रज्ञान 

अक्षयने विकसित केलेल्‍या उपकरणात आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. विविध प्रकारचे सेंसर, मायक्रो प्रोसेसर, सॉफ्टवेअरचा यात वापर केला आहे. उपकरण वाहनात बसविता येऊ शकते. 

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

पेटंटप्राप्त उपकरण हे रेट्राफिट सिस्टिटीमवर आधारित आहे म्‍हणून सध्या रस्‍त्‍यावर धावणाऱ्या प्रत्‍येक वाहनाला उपकरण बसवून इंधनाची बचत करताना प्रदूषण टाळता येऊ शकते. देशातील सर्व वाहनांना उपकरण बसविल्‍यास रोज लाखो लिटर इंधनाची बचत होईल. शासनस्तरावर संशोधन पोचवत घेतलेल्‍या मेहनतीचा देशाला फायदा होण्यासाठी प्रयत्‍न करेल. 
- अक्षय बोडके, युवा संशोधक  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young engineer from Nashik discovers new fuel saving research nashik marathi news