पूल ओलांडताना देवनदीच्या पुरात तरुण गेला वाहून!

अजित देसाई 
Wednesday, 23 September 2020

मदतीसाठी त्याने आरडाओरड केल्यावर आवाज ऐकून बाजारातील अनेकजण नदीपात्राकडे धावले. पोहता येणाऱ्यांनी त्याला वाचवण्यासाठी नदीपात्रात उडया मारल्या. तर काहीजण प्रवाहाच्या दिशेने धावले. पाण्याचा वेग अधिक असल्याने बुडणारा तरुण वाहून गेला.

नाशिक/सिन्नर : वडांगळी व खंडांगळी या गावांदरम्यान असणाऱ्या पुलारून रस्ता ओलांडणारा 22 ते 25 वयोगटातील तरुण पुरात वाहून गेल्याची घटना आज (दि.23) दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. देवनदीला आलेल्या पुराचे पाणी या पुलावरून वाहत असून सायंकाळी उशिरापर्यंत या तरुणाची ओळख पटली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

वाचवण्यासाठी नदीपात्रात उडया मारल्या पण..

वडांगळी गावात आठवडे बाजार निमित्त सदर तरुण नदीपात्रातील पूल ओलांडून येत होता. पुलावरून वाहत असलेल्या पाण्याचा वेग अधिक असल्याने तो नदीपात्रात ओढला गेला. मदतीसाठी त्याने आरडाओरड केल्यावर आवाज ऐकून बाजारातील अनेकजण नदीपात्राकडे धावले. पोहता येणाऱ्यांनी त्याला वाचवण्यासाठी नदीपात्रात उडया मारल्या. तर काहीजण प्रवाहाच्या दिशेने धावले. पाण्याचा वेग अधिक असल्याने बुडणारा तरुण वाहून गेला. पुरात दम लागल्याने वाचवणारे देखील नदीतून बाहेर पडले. वाहून गेलेल्या तरुणाची कोणालाही ओळख न पटल्याने परिसरात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पायी नदी ओलांडणारा हा तरुण स्थानिक असावा किंवा सोंगणीच्या कामासाठी पेठ परिसरातून आलेल्या मजुरांपैकी असावा अशी चर्चा सुरू होती. पूलाच्या खालच्या बाजूला देवना बंधारा असून त्याचे खोलीकरण करण्यात आले आहे. शिवाय अवैध वाळू उपसा करण्यात आल्यामुळे नदीपात्रात खोलवर खड्डे आहेत. त्यामुळे त्या परिसरात कोणीही जायला धजावले नाही.

हेही वाचा > गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना 

जीवरक्षक पथकास पाचारण

दरम्यान, या प्रकाराबद्दल स्थानिकांनी तहसीलदार राहुल कोताडे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक रहाटे यांना माहिती दिली. तातडीने पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाच्या शोधासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या चांदोरी येथील जीवरक्षक पथकास पाचारण करण्यात आले. मात्र, अंधार पडू लागल्याने हे पथक पोहोचू शकले नाही. त्यामुळे उद्या दि.24 सकाळी या पथकाकडून शोध मोहीम राबविण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा > "अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

 

संपादन - रोहित कणसे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young man was carried away in devnadi flood nashik marathi news