#Lockdown : "आम्हाला घरी जायचयं साहेब...हवं तर गोळी मारा" काळजाला घर पडणाऱ्या 'त्यांच्या' प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 31 March 2020

निराधार आणि अस्वस्थ झालेल्या कष्टकऱ्यांना आपणाला किती दिवस ठेवले जाणार? कुणावर किती विश्‍वास ठेवायचा? असे प्रश्‍न तयार झाल्याने अनेकजण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मग काही अधिकाऱ्यांनी, "आपके मुख्यमंत्रीजीने महाराष्ट्र में सब ठीक हैं, अच्छा काम हो रहा है, बिनधास्त रहो', असे म्हटल्याचे माहिती कष्टकऱ्यांना दिली. त्यातूनही कष्टकरी ऐकत नाहीत म्हटल्यावर कायदा तोडू नका, अशी तंबी देत सरकारची परवानगी घेऊन तुम्हाला घरी पोचविण्याची व्यवस्था करू, असे सांगितले

नाशिक : "लॉकडाउन' झालंय, खायला अन्न नाही, राहायला जागा नाही; मग मुंबईत राहून जगायचं कसं? असं काळजाला घर पडणाऱ्या प्रतिक्रिया नोंदविणाऱ्या कष्टकऱ्यांमधील तरुणांना घराची ओढ लागली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरून थेट नाशिकच्या सीमेपर्यंत स्थलांतरितांचे जथे धडकताहेत. सोमवारी (ता. 30) ठाण्याहून वाहनांमधून आलेले कष्टकरी, "हमे घर जाना हैं', असे म्हणत अनेकजण थांबायला तयार नव्हते. त्यातूनही थांबावे लागेल म्हटल्यावर "चाहिए तो गोली मारो...', असे म्हणत तरुणांनी घराकडे जाण्याबद्दलची अगतिका मांडली. 

Image may contain: 2 people, people sitting and outdoor

नाशिकच्या सीमेवर अडवलेल्या उत्तर प्रदेश, बिहारच्या कष्टकऱ्यांची अगतिका 

विल्होळी शिवारातील बजरंगवाडीमधील सुकदेव आश्रमशाळेत तीनशे जणांची निवास, भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच समाजकल्याणच्या नासर्डी पूल भागातील वसतिगृहाकडे साडेतीनशेहून अधिक जण रवाना करण्यात आलेत. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेशमधील आपल्या घरी वाहनांमधून परतणाऱ्यांना अडविण्यात आले. प्रशासनातर्फे या वेळी, "काळजी करू नका, आम्ही आपणाला सहकार्य करू. निवास- भोजन- पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊ', अशी विनवणी केली जात होती. पण निराधार आणि अस्वस्थ झालेल्या कष्टकऱ्यांना आपणाला किती दिवस ठेवले जाणार? कुणावर किती विश्‍वास ठेवायचा? असे प्रश्‍न तयार झाल्याने अनेकजण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मग काही अधिकाऱ्यांनी, "आपके मुख्यमंत्रीजीने महाराष्ट्र में सब ठीक हैं, अच्छा काम हो रहा है, बिनधास्त रहो', असे म्हटल्याचे माहिती कष्टकऱ्यांना दिली. त्यातूनही कष्टकरी ऐकत नाहीत म्हटल्यावर कायदा तोडू नका, अशी तंबी देत सरकारची परवानगी घेऊन तुम्हाला घरी पोचविण्याची व्यवस्था करू, असे सांगितले. त्यावर कष्टकरी कसेतरी राजी झाले आणि भला मोठा जथा दोन भागात विभागण्यात आला. सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, तहसीलदार अनिल दौडे, गटविकास अधिकारी डॉ. सारिका बारी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. प्रदीप जायभावे आणि पोलिस अधिकारी कष्टकऱ्यांशी संवाद साधत होते. 

हेही वाचा > #Lockdown : ...अन् अडकलेल्या 'त्या' गर्भवतीच्या मदतीला 'ते' देवदूतासारखे धावून आले!

Image may contain: one or more people and outdoor

चलो, म्हणत निघाले महामार्गाने 
निवास, भोजनाची व्यवस्था केलेल्यांपैकी दुपारच्या भोजनाची पाकिटे घेतली. पोटभर खाल्ल्यावर "चलो', असे म्हणत दोन ते चार जण महामार्गाने पुढे निघाले. पण मुळातच एक प्रश्‍न तयार होतो तो म्हणजे, थेट मुंबईतून निघालेले कष्टकऱ्यांचे जथे नाशिकच्या सीमेवर कसे धडकताहेत? त्याचप्रमाणे जीवनावश्‍यक माल मुंबईत उतरल्यावर स्थलांतरितांना वाहने नाशिककडे घेऊन येताहेत, असे निरीक्षण पुढे आले आहे. त्यामुळे मुंबईतून बाहेर पडणाऱ्या मार्गावर काळजी घेतली नाही, तर नाशिककडे येणारे लोंढे कमी होण्याची शक्‍यता दृष्टिक्षेपात नसल्याचे दिसते.  

हेही वाचा > ह्रदयद्रावक! 'ते' दोघं मज्जाक - मस्ती करत घराकडे निघाले...मात्र, वाटेत काळाने अडवलं

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youths labor wants to go for a home due to lockdown Nashik marathi news