'ती' रक्कम सुरेशदादांच्या खात्यात वळती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

धुळे - जळगाव येथील घरकुल योजनेसह "वाघूर‘च्या ठेक्‍यातील काही रक्कम जेएम कॉटन कंपनीकडे कशी वळती झाली, हे सांगत आणि त्यासंबंधी कागदपत्रे सरतपासणीत सिद्ध करून दाखवत जळगावचे तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक तथा तपासाधिकारी इशू सिंधू यांनी आज संशयित माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या अडचणीत भर टाकली आहे. 

धुळे - जळगाव येथील घरकुल योजनेसह "वाघूर‘च्या ठेक्‍यातील काही रक्कम जेएम कॉटन कंपनीकडे कशी वळती झाली, हे सांगत आणि त्यासंबंधी कागदपत्रे सरतपासणीत सिद्ध करून दाखवत जळगावचे तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक तथा तपासाधिकारी इशू सिंधू यांनी आज संशयित माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या अडचणीत भर टाकली आहे. 

जिल्हा विशेष न्यायालयात विशेष न्या. आर. आर. कदम यांच्यासमोर दिवसभर कामकाज झाले. गेल्या आठवड्यापासून विशेष सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी, प्रवीण चव्हाण यांनी सिंधू यांची सरतपासणी सुरू केली आहे. त्यात तपासाअंती घरकुल योजनेबाबत झालेले कटकारस्थान साक्षीतून सिंधू हे उलगडून दाखवीत आहेत.

निधी केला वळता
सिंधू म्हणाले, की घरकुल योजनेचे काम घेणाऱ्या खानदेश बिल्डर्सला 11 कोटी 56 लाखांची मोबेलायजेशन रक्कम अदा झाली. मात्र, खानदेश बिल्डर्सकडून घरकुलांच्या कामासाठी यंत्रसामग्री न घेता ती रक्कम अन्य खात्यात वर्ग करण्यात आल्याचे तपासातून समोर आले. अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेले माजी आमदार जैन यांच्या जेएम कॉटन कंपनीकडे सहा कोटी 90 लाखांचा निधी वळता झाला होता. जळगाव पालिकेने 3 मे 1999 ला 11 कोटी 83 लाखांच्या मोबेलायजेशन फंडातून कराची रक्कम वजा करून 11 कोटी 56 लाखांचा निधी खानदेश बिल्डर्सच्या खात्यात वर्ग केला होता. नंतर आठ धनादेशांद्वारे ही रक्कम खानदेश बिल्डर्सकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या खात्यावर वर्ग झाली. यासंबंधी बॅंकेच्या लेखापत्रकावरून खानदेश बिल्डर्सने केवळ तीन लाखांचा निधी यंत्रसामग्रीसाठी खर्च केला होता, असे दिसून आले. त्यात मोबाइल, संगणक आदींसाठी अधिक रक्कम खर्च झाल्याचे दर्शविण्यात आले. यात पुढील दोन वर्षे ही रक्कम यंत्रसाम्रग्रीसाठी वापरण्यात आली नव्हती.

निधी "जेएम कॉटन‘कडे
खानदेश बिल्डर्सने अशी अग्रीम रक्कम ही मुदत ठेवीसाठी वापरात आणून तीन वेगवेगळ्या कंपन्यांना पाठविली. त्या कंपन्यांचे जैन, राजेंद्र मयूर, जगन्नाथ वाणी संचालक होते. बॅंक पासबुकातील नोंदींवरून खानदेश बिल्डर्सने संबंधित कंपन्यांमध्ये ही रक्कम वर्ग केली. त्यात कृषिधन कंपनीने एक कोटी पाच लाख आणि शेठ भिकनचंद जैन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 60 लाख रुपये जेएम कॉटनमध्ये वर्ग केले होते. त्यामुळे दोन दिवसांत जेएम कॉटन कंपनीत सहा कोटी रुपये वर्ग झाले होते.

"वाघूर‘चा ठेका
जळगाव पालिकेने "वाघूर‘चा ठेका तापी प्री स्टेट कंपनीला दिला होता. त्यात 3 मे 1999 ला या कंपनीला दहा कोटी 75 लाखांचा ऍडव्हान्स दिला गेला होता. मात्र, काही अडचणींमुळे धनादेश वटला नाही. त्यामुळे 4 मे 1999 ला लगेच नऊ कोटींचा धनादेश दिला गेला. त्यापैकी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असलेले जैन यांच्या जेएम कॉटन कंपनीच्या खात्यात अडीच कोटी, नंतर एक कोटी 24 लाखांचा निधी वळता झाला होता, असे सिंधू यांनी सांगितले. "वाघूर‘च्या ठेक्‍याबाबतही विविध कागदपत्रांच्या आधारे दिलेली माहिती त्यांनी सिद्ध करून दाखविली. यात बॅंकेसंबंधी खाते उतारा आणि इतर नोंदणीची माहिती सिंधू यांनी न्यायालयाला दिली. पुढील कामकाज सोमवारी (ता. 25) होईल. घरकुल घोटाळा प्रकरणी 60 लाखांची रक्कम ही रमेश जैन यांच्याकडे वळती झाल्याचा उल्लेख आल्याने त्यांच्यासह खानदेश बिल्डर्स, ईसीपी कंपनी व तिच्या संचालकांना आरोपी करण्याविषयीच्या सरकारपक्षाच्या मागणी अर्जावर न्यायालयाने अद्याप निकाल राखून ठेवला आहे.

Web Title: ī 'She' suresadadam the amount deducted from the account