नेट परीक्षाही होणार आता "ऑनलाइन' 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

नेट परीक्षाही होणार आता "ऑनलाइन' 

नेट परीक्षाही होणार आता "ऑनलाइन' 

जळगाव, ता. 8 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून (सीबीएसई) सहाय्यक प्राध्यापकपदासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी नेट) आता ऑनलाइन घेण्यात येणार आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार डिसेंबर महिन्यात घेण्यात येणारी नेट परीक्षा ही ऑफलाइन ऐवजी ऑनलाइन घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ऑनलाइन परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडविणे सोईस्कर होईल. 
"सीबीएसई'तर्फे दरवर्षी सहायक प्राध्यापकपदासाठी "नेट' परीक्षा घेण्यात येत असते. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच नेट परीक्षेत "सीबीएसई'कडून काही मूलभूत बदल करण्यात आले होते. यात सदर परीक्षेत तीनऐवजी तीनशे गुणांचे दोनच पेपर घेतले गेले. नवीन नियमानुसार पहिला पेपर पन्नास प्रश्न व दुसरा पेपर शंभर प्रश्न प्रत्येकी दोन गुण अशा एकूण तीनशे गुणांची परीक्षा झाली. शंभर गुणांच्या (50 प्रश्न) पहिल्या पेपरसाठी एक तासाचा अवधी देण्यात आला होता तर तर दुसऱ्या दोनशे गुणांच्या (100 प्रश्न) पेपरसाठी दोन तास वेळ देण्यात आला. सदर परीक्षा ही सकाळी साडेनऊ ते दुपारी एक यावेळेत घेण्यात आली होती. दरम्यान, या परीक्षेत पुन्हा एकदा बदल करण्यात आला असून, डिसेंबर महिन्यात होणारी परीक्षा ही ऑफलाइनऐवजी ऑनलाइन घेण्यात येणार आहे. सोबतच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीही वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या असून, आपल्या सोईनुसार तारीख निवडता येणार आहे. या बदलांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देणे सोईस्कर झाले आहे. 

अभ्यासक्रमात बदल नाही 
नेट परीक्षेच्या नवीन नियमानुसार अभ्यासक्रम, पेपरची वेळ, यांसह इतर बाबी तशाच आहे. फक्त ऑफलाइचे रूपांतर ऑनलाइनमध्ये करण्यात आले आहे. यात पूर्वीप्रमाणेच पहिला पेपरला सामान्य ज्ञान विषयाचा असेल तर दुसरा पेपरा आपल्या विषयाशी निगडित होईल. 

विद्यार्थी संख्येत वाढ 
गेल्या काही महिन्यांपूर्वी आलेल्या नियमानुसार ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठीची वयाची अट दोन वर्षांनी शिथिल करण्यात आली आहे. यासोबतच खुल्या गटासाठी 30 वर्षांपर्यंत, तर मागास प्रवर्गासाठी 35 वर्षे वयापर्यंत फेलोशिपसाठी अर्ज करता येणार असल्याने परीक्षार्थींची संख्या अधिक दिसून आली होती. 

असे आहे वेळापत्रक 
नवीन नियमानुसार येत्या डिसेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता भरता येणार आहे. यानंतर ऑक्‍टोंबर महिन्यात काही बदल असल्यास ते नोंदविली जातील. नोव्हेंबर महिन्यात प्रवेशपत्र मिळेल. तर 2 ते 16 डिसेंबर दरम्यान प्रत्येक शनिवार व रविवार परीक्षा होईल. 
 

Web Title: "ऑनलाइन'