देशातील लोकशाही धोक्‍यात  :  डॉ. फौजिया खान

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

देशातील लोकशाही धोक्‍यात  :  डॉ. फौजिया खान

देशातील लोकशाही धोक्‍यात  :  डॉ. फौजिया खान

जळगाव  :  देशातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजबांधव रस्त्यावर येत आहे. केंद्र व राज्य शासनाविरोधात सर्वसामान्यांमध्ये रोषाचे वातावरण आहे. मात्र कोणतीही निवडणूक असू देत, निवडणुकीत भाजपकडून पैशांचा पाऊस पाडून निवडणुकीतील संपूर्ण यंत्रणा खरेदी केली आहे. या यंत्रणेला बाहुली म्हणून आपल्या हातात ठेवत आहे. देशात होणाऱ्या निवडणुकांमध्ये इव्हीएम मशिनमध्ये घोळ होत असल्याने लोकशाही धोक्‍यात आली असल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. फौजिया खान यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 
राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे संविधान बचावासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, गेल्या काही वर्षापासून देशात अराजकतेचे वातावरण निर्माण होऊन आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. इव्हीएममुळे लोकशाहीला धोका निर्माण होऊन देशातील नैतिकता बिघडलेली असून गुन्हेगारीचे वातावरण सर्वत्र निर्माण झाले आहे. 

देशातील महिला असुरक्षित 
या सरकारच्या काळात देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, त्यांच्यासाठी असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. देशातील महिला असुरक्षित असल्याने सरकारकडून सुप्रिम कोर्टाच्या आदेशांची देखील हत्या केली जात असल्याने ही परिस्थिती देशासाठी घातक बनली आहे. 

"इव्हीएम' नकोच! 
देशात मनुवाद मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. इव्हीएम मशिनमध्ये होणाऱ्या घोळामुळे निवडणुकीनंतरचे निकाल वेगळेच लागत आहे. ज्या ज्या देशांमध्ये इव्हीएमचा वापर केला जात होता. त्या देशांनी निवडणुकांत इव्हीएम मशिन बंद करून मतपत्रिकाद्वारे मतदान घेत आहे. इव्हीएम मशिनला सर्व विरोधी पक्षांचा विरोध आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी आमदार विद्या चव्हाण, उषा दराडे, सुरेखा ठाकरे, कल्पना पाटील, तिलोत्तमा पाटील आदी उपस्थित होते. 

नाशिक येथे विभागीय कार्यक्रम 
राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे संविधान बचाओ देश बचाओ हा कार्यक्रम देशभरात सुरू केला आहे. दिंडीपासून या कार्यक्रमाला सुरवात झाली. त्याचा विभागीय कार्यक्रम हा नाशिक येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी आढावा बैठक ही आज येथे झाली. त्यानंतर नंदुरबार, धुळे याठिकाणी देखील बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

Web Title: खान