आकाशवाणीत खडसेंच्या आवाजाचे नमुने संकलित 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

आकाशवाणीत खडसेंच्या आवाजाचे नमुने संकलित 

आकाशवाणीत खडसेंच्या आवाजाचे नमुने संकलित 

जळगाव : महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या आवाजातील बनावट ऑडिओ क्‍लिप व्हॉटस्‌ऍपद्वारे व्हायरल करण्यात आली होती. या प्रकरणी खडसेंकडून जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रारअर्ज दाखल करण्यात आला होता. आज या प्रकरणात खडसेंनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाच्या दृष्टीने खडसेंतर्फे संदिग्ध क्‍लिपिंग अनुरूप आवाजाचे नमुने आकाशवाणी स्टुडिओत संकलित करण्यात आले आहेत. संकलित नमुन्यांच्या अहवालानुसार क्‍लिप तयार करणारे व ती व्हायरल करणाऱ्यांचा शोध घेण्यात येणार आहे. 
जळगाव महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खडसेंना बदनाम करण्याच्या हेतूने त्यांच्या आवाजातील क्‍लिप तयार करून व्हॉटस्‌ऍपद्वारे ती व्हायरल करण्यात आली होती. क्‍लिपमध्ये खडसेंच्या आवाजात मतदारांना आवाहन करण्यात आले होते. संदिग्ध क्‍लिप प्रकरणाची खडसेंनी तत्काळ दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षकांना लेखी तक्रार करून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. 

अशी आहे फिर्याद 
आज खडसेंनी स्वत: रामानंदनगर पोलिस ठाण्यात जाऊन या बनावट क्‍लीपच्या संदर्भात फिर्याद दिली. त्यानुसार खडसेंच्या आवाजातील क्‍लिप प्रचाराच्या काळात (02938005872 व मोबाईल क्रमांक 9823044104) या दोन क्रमांकावरून ऐकवली गेली व व्हायरल झाल्याचा प्रकार समोर आला. प्रचारात आपण भाजप उमेदवारांसाठी सभा घेत होतो, प्रत्यक्ष सभेद्वारे मते मागत होतो. तरीही आपल्याला विश्‍वासात न घेता ही क्‍लिप तयार करण्यात आली व त्याद्वारे फसवणूक झाल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिस ठाण्यात 419, 417, 171 (फ,ग), 499, 500 व 34 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

संशयितांचा शोध सुरू 
दाखल गुन्ह्यात माजी मंत्री खडसे यांच्या खऱ्या आवाजाचे नमुने जळगाव आकाशवाणी केंद्रात संकलित करण्यात आले. व्हायरल क्‍लिप व खऱ्या आवाजातील शास्त्रोक्तपद्धतीने तफावत आणि क्‍लिप खरी की, खोटी याची शाश्‍वती होऊन क्‍लिप तयार करणाऱ्या संशयितांना शोधण्यात याचा फायदा होणार असून, त्या सोबतच खडसेंच्या आवाजातील ही संदिग्ध क्‍लिप व्हायरल करणाऱ्यांचाही शोध सुरू आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: नमुने