संपामुळे मराठी शाळांना "सुट्टी' 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

संपामुळे मराठी शाळांना "सुट्टी' 

संपामुळे मराठी शाळांना "सुट्टी' 

जळगाव : राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आजपासून तीन दिवसीय संप पुकारला आहे. या संपात मराठी माध्यमाच्या शाळांमधील सुमारे दोनशेहून अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे शहरातील बहुतांश मराठी शाळा बंद होत्या तर इंग्रजी शाळा मात्र सुरू होत्या. संपामुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी "सुट्टी'चा आनंद लुटला. 
आजपासून तीन दिवस राज्यव्यापी संप असल्याने शहरातील शाळांतर्फे विद्यार्थ्यांना अगोदरच सूचना देण्यात आल्या होत्या. यात विद्यार्थ्यांना व पालकांना संप संपला, असे जोपर्यंत जाहीर होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज शाळेच्या परिसरात शुकशुकाट दिसून आला. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा यात सहभाग नसल्याने त्या सुरूच होत्या. तर शहरातील काही महाविद्यालयांमध्येही संप पाळण्यात आला तर काही महाविद्यालयात नियमित तासिका झाल्या. 

"नूतन मराठा'चा सहभाग 
महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार या राज्यव्यापी संपात शहरातील नूतन मराठा महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. यात त्यांना "एनमुक्‍टो' संघटना, कनिष्ठ महाराष्ट्र "ज्युक्‍टो' संघटना यांनी पाठिंबा दिला असल्याची माहिती महाविद्यालयातर्फे देण्यात आली आहे. 

शिक्षक संघातर्फे निवेदन 
तालुक्‍यातील महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्यावतीने गटशिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकारी यांना सातव्या वेतन आयोगाच्या तत्काळ अंमलबजावणीसह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सात ते नऊ ऑगस्ट या तीन दिवसांच्या राज्यव्यापी संपात जळगाव तालुक्‍यातील सर्व खासगी प्राथमिक शाळांचे शिक्षक कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण व प्रशासन अधिकारी डी. टी. ठाकूर यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी संपातील सहभागी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत जिल्हा सचिव देवेंद्र चौधरी, अध्यक्ष गोविंदा लोखंडे, उपाध्यक्ष सुनील पवार, सचिव अजित चौधरी यांनी चर्चा करून माहिती दिली. सातव्या वेतन आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी तत्काळ लागू करावी, शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदान धोरण रद्द करावे, यांसह विविध मागण्यांचा समावेश आहे. यावेळी गणेश लोडते, महेंद्र तायडे, संजय भोळे, नीलेश मोरे, सय्यद जाकिर, निखिल जोगी, सुनील नारखेडे आदींसह महासंघाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

Web Title: "सुट्टी'