प्लॅस्टिकबंदीमुळे दहा कोटींपर्यंत फटका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नाशिक - शासनाने गुढीपाडव्यापासून राज्यात प्लॅस्टिक व थर्माकोल वापरावर बंदी आणल्याने महापालिकेने जागेवर पाच हजार रुपये दंडाची आकारणी सुरू केल्याने व्यावसायिकांनी प्लॅस्टिक, थर्माकोलची वेष्टणे असलेला माल विकणे बंद केल्याने त्याचा बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, वाहनांच्या सुट्या भागांचा शहरात तुटवडा निर्माण झाला असून, किराणा मालाच्या याद्या ग्राहकांकडून परत घेतल्या जात असल्याने विक्रीवर परिणाम झाला आहे. शहरात आठ ते दहा कोटींची बाजारपेठ ठप्प झाल्याचा अंदाज व्यक्त होत असून, अक्षयतृतीयेवर त्याचा परिणाम जाणवणार आहे.

राज्य शासनाने प्लॅस्टिकबंदी जाहीर केल्यानंतर महापालिकेतर्फे शहरात दुकानांवर धाडी टाकल्या जात आहेत. प्लॅस्टिक वापर आढळल्यास पाच हजार रुपये दंड आकारणी केली जात आहे. प्लॅस्टिकचा नायनाट करण्यासाठी २० एप्रिलपर्यंत मुदत दिली असताना महापालिकेने कारवाई सुरू केल्याने व्यावसायिक हतबल झाले आहेत. प्लॅस्टिक वापर फक्त पिशव्यांपुरता मर्यादित नाही. फ्रीज, टीव्ही, पंखे, एसी, कूलर अशा इलेक्‍ट्रॉनिक वस्तू प्लॅस्टिक व थर्माकोलच्या वेष्टणात गुंडाळून येत असल्याने त्यावरही कारवाई होत आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी अशा वस्तू विकणे बंद केले आहे. परिणामी बाजारात प्लॅस्टिक वेष्टण असलेल्या वस्तू विकणे बंद झाले आहे. प्लॅस्टिकबंदीचे स्वागत होत असले तरी आधी नोटाबंदी आणि नंतर जीएसटीमुळे फटका बसलेल्या बाजारपेठेवर प्लॅस्टिकबंदीचा विपरीत परिणाम होत आहे.

महापालिकेची कारवाई
आतापर्यंत महापालिकेने ८६ दुकानांवर कारवाई करून त्यांच्याकडून चार लाख ३९ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. प्लॅस्टिक वापर आढळल्यास जागेवर पाच हजार रुपये दंड आकारला जात आहे.

प्लॅस्टिक संकलन केंद्रे
पूर्व विभागात द्वारका गुदाम, पश्‍चिम विभागात कल्पनानगर, सातपूर क्‍लब हाउस, सिडको विभागीय कार्यालय, पंचवटी विभागीय कार्यालय, नाशिक रोड विभागीय कार्यालय त्याव्यतिरिक्त थेट कचरा डेपोमध्ये प्लॅस्टिक जमा करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

प्लॅस्टिकबंदीला विरोध नाही, परंतु शासनाने पर्यायही सुचविला पाहिजे. उत्पादक कंपनीला फक्त नाशिकसाठी स्वतंत्र पॅकिंग करा, असे सांगता येणार नाही. कारवाईच्या भीतीने मालाची विक्री बंद करण्यात आली आहे.
- इंदरपालसिंग चढ्ढा, उपाध्यक्ष, नाशिक मोटार मर्चंट्‌स असोसिएशन

प्लॅस्टिकबंदीच्या नावाखाली महापालिकेकडून छोट्या व्यापाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. मोठ्या मॉलमध्ये कारवाई झाल्याचे ऐकू आले नाही. किराणा दुकानात कागदी पिशव्या वापरल्यास त्यातून वस्तू सांडतात.
- प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, नाशिक धान्य किराणा असोसिएशन

Web Title: 10 crore loss by plastic ban