
Dhule News: सोनगीरच्या तरुणाकडून चोरीच्या 10 दुचाकी जप्त, अल्पवयीनही ताब्यात
शिरपूर : शिरपूरसह परिसरात दुचाकी चोऱ्यांच्या गुन्ह्यात शहर पोलिसांनी समाधान श्यामराव बाविस्कर (वय २२, रा. सोनगीर ता.धुळे) याच्यासह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. संशयितांनी दिलेल्या माहितीवरून सोनगीर येथे जाऊन पोलिसांनी तब्बल १० दुचाकी जप्त केल्या. त्यांची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये आहे.
वाघाडी (ता. शिरपूर) येथून १७ मार्चला सचिन रवींद्र माळी यांच्या मालकीची (एमएच १८, एएस ४२४५) चोरीस गेली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना निरीक्षक अन्साराम आगरकर व शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी करवंद नाका परिसरात वाहनांची कसून तपासणी सुरु केली.
त्यात संशयित दुचाकीस्वार समाधान बाविस्कर व एक अल्पवयीन मुलगा यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांची चौकशी केली असता दभाशी (ता. शिंदखेडा) येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
दोघांना शहर पोलिस ठाण्यात आणून चौकशी केल्यानंतर वाघाडी, शिरपूर शहर, नरडाणा व सोनगीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरल्याची कबुली दोघांनी दिली. सोनगीर येथे जाऊन शहर पोलिसांनी आठ दुचाकी हस्तगत केल्या. अल्पवयीन मुलाच्या ताब्यातूनही एक चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली.
हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच
चार गुन्हे उघडकीस
पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून शहर पोलिस ठाण्यांतर्गत दोन, नरडाणा व सोनगीर येथील प्रत्येकी एक असे दुचाकी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणले. संशयितांकडून आणखी काही गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
त्यांना २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे, निरीक्षक अन्साराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ललित पाटील, लादूराम चौधरी, पोलिस नाईक मनोज पाटील, विनोद आखडमल, प्रशांत पवार, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, प्रवीण गोसावी, मुकेश पावरा, मनोज दाभाडे, सचिन वाघ, भटू साळुंखे, मिथुन पवार, चेतन भावसार, शरद पारधी आदींनी ही कारवाई केली.