गोराणेत मतदानावर १०० टक्के बहिष्कार

nashik
nashik

अंबासन (नाशिक) - गोराणे (ता.बागलाण) येथील ग्रामस्थांनी हरणबारी उजवा कालव्यासाठी हरणबारी धरणातून पाणी आरक्षित करावे या मागणीसाठी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार शंभर टक्के यशस्वी केला. सकाळी दहा वाजेच्या सुमारास मोठ्या पोलिस बंदोबस्तात मतदानाचे बुथ लावण्यात आले होते. मात्र ग्रामस्थांनी मतदानाचा हक्क बजावला नसल्याने शुन्य टक्के मतदान झाले. तसेच पाण्याच्या टाकीवर चढलेले तिन्ही शेतकरी लघुसिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता सागर शिंदे यांनी दोन महिन्यांच्या कालावधीत विषय मार्गी लावण्यासाठी स्वतःच पुढाकार घेण्याचे आश्वासन दिल्याने तब्बल अठरा तासांनी शेतकरी चिंतामण देसले, सुरेश देसले व अशोक देसले खाली उतरले.

गोराणेत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला होता. तसेच बुथही लाऊ देणार असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेताच प्रशासन खडबडून जागे झाले. गोराणेत प्रांताधिकारी प्रवीण महाजन, विभागीय पोलिस आधिकारी शशिकांत शिंदे, तहसीलदार जितेंद्र कुवर व जायखेडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गावित यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन बुथ लावून प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होऊ नये याबाबत सुचना दिल्या होत्या मात्र ग्रामस्थांनी एकमताने ठाम असल्यामुळे रात्री माघारी फिरावे लागले होते. सर्व ग्रामस्थांनी रात्र जिल्हा परिषदेच्या शाळेतील आवारात बसून काढली होती. सकाळी पुन्हा ग्रामस्थांनी एकत्र येऊन एक पाऊल मागे घेण्याचा विचार केला होता. जायखेडा पोलिस ठाण्यामार्फत चार दंगा नियंत्रक पथक पाचारण करण्यात आले होते. सकाळी प्रांताधिकारी श्री. महाजन, विभागीय पोलिस आधिकारी शशिकांत शिंदे, तहसीलदार जितेंद्र कुवर आणि जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गावित व कर्मचारी दाखल झाले होते. ग्रामस्थांशी चर्चा करून दहा वाजेच्या सुमारास बुथ लावण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. मात्र एकही ग्रामस्थांनी बुथकडे फिरकले नाहीत. दुपारी नाशिक येथून लघुसिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता सागर शिंदे यांनी ग्रामस्थांची भेट घेतली व उपस्थित ग्रामस्थांना आश्वासन देऊन पत्र दिले. आणि तब्बल अठरा तास टाकीवर बसून असलेले शेतकरी चिंतामण देसले, सुरेश देसले आणि अशोक देसले खाली उतरले. यावेळी देवळ्याचे तहसीलदार कैलास पवार, मालेगावचे अप्पर जिल्हा आधिकारी लक्ष्मण राऊत यांनी भेटी दिल्या सायंकाळी निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी बुथवर भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. गोराणेत यावेेळी पोलिसांनी कडा पहारा दिला होता.

हरणबारी प्रकल्पाचा उजवा कालवा २४ ते ४८ किमी पारनेर ते सातमानेपर्यत वाढविण्याची मागणी ही माजी आमदार संजय चव्हाण यांनी २००५ मध्ये शासन दरबारी केली आहे आजही पाठपुरावा सुरूच आहे. मात्र शासनाने जलनियोजन पाण्याची तरतूद नसल्याने सदर मागणी पुर्ण करता येत नसल्याची घेतलेली भूमिका मोठी अडसर ठरत असल्याचे आमदार दिपिकाताई चव्हाण यांनी पत्रकात नमूद केली आहे. माजी आमदार संजय चव्हाण यांनी वाढीव कालव्यासाठी ११० द.ल.घ.फू. पाण्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्वेक्षण देखिल करण्यात आले होते. परंतु स्थानिक जनतेने सर्वेक्षणात अडथळा निर्माण करून गोंधळ घातल्याने प्रश्न चिघळ्याचे त्यांनी सांगितले. यानंतर १०ऑगस्ट २०१५ मध्ये हरणबारी उजवा वाढीव कालवा २५ किमी पुढे सर्वेक्षण करण्यासाठी शासन दरबारी पत्रव्यवहार केला असता या कामासाठी धनंजय धामणकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. यासाठी पोलिस संरक्षणात सर्वेक्षणाच्या कामास प्रारंभ होऊन देखील बिजोटे येथील ग्रामस्थांनी सर्वेसाठी आलेल्या आधिका-यांचे साहित्य फेकून देत विरोध दर्शवला होता. यानंतर देखिल साल्हेर १व२ तसेच वाघंबा पाणी योजना मंजूर घेत साल्हेर वळण योजना क्र.१ मधून १४.३६ दलघफू पाणी वळण योजना क्र.२ मधून २१.९१ दलघफू पाणी तर वाघंबा पाणी योजना १६.७५ दलघफू हरणबारी व वळण दोनचे पाणी हरणबारी धरणात पडणार आहे. मात्र वाघंबा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मोसम व आरम नदीवर पाच दलघफू साठवण क्षेमतेपर्यत बंधा-याच्या कामांबाबत तात्कालिन खा. प्रतापदादा सोनवणे व मा. आमदार ए.टी.पवार आग्रही होते. मात्र सदरहू योजना मापदंडात बसत नाहीत शासन मान्यता देत नाही यामुळे तीनही वळण योजनेद्वारे उपलब्ध होणा-या ५३.०२ दलघफू पाण्याचा वापर वरील प्रस्तावित ८ को.प. बंधा-याऐवजी अस्तित्वातील केळझर व हरणबारी प्रकल्पाच्या वाढीव पुरचा-यासाठी मागणी माजी आमदार संजय चव्हाण यांनी शासनाकडे केली आहे. मात्र पाणी नियोजनाची बाब ही धोरणात्मक असल्यामुळे शासन स्तरावर प्रश्न प्रलंबित असल्याचेही आमदार दिपिकाताई चव्हाण यांनी पत्रकात म्हटले आहे. या योजनांसाठी आपण शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला असून विधानसभेत यासाठी औचित्याचा मुद्दा लक्षवेधी करून शासनाचे लक्ष वेधले आहे. तसेच उपोषणाच्या देखिल हत्यार उपसले असल्याचे आमदार दिपिकाताई चव्हाण यांनी पत्रकात नमुद केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com