स्पेस टेक्‍नॉलॉजी टूलद्वारे रेल्वेगाड्यांची बिनचूक माहिती 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

इगतपुरी : रेल्वे प्रवासादरम्यान मार्गावरील रेल्वेगाडी नेमक्‍या कोणत्या ठिकाणी आहे, अमुक एका स्थानकावर एखादी गाडी केव्हा पोचेल, विशिष्ट प्रवासी कोणत्या डब्यात बसला आहे यासह विविध प्रकारची बिनचूक माहिती प्रवाशांना आता सहज उपलब्ध होऊ शकणार आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो)कडून यासाठीची प्रणाली विकसित करण्यात येत असून, लवकरच ती रेल्वेच्या सेवेत दाखल होणार आहे. 

काही वेळेला गाडी नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत असल्यास प्रवाशांना आणि नातेवाइकांना प्रतीक्षा करावी लागते. संबंधित प्रवाशाचा मोबाईल बंद असल्यास त्यांना माहिती मिळण्यात अडचणी येतात. रेल्वेस्थानकावर गाडीच्या प्रतीक्षेतील प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडे चौकशीवेळी अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. प्रवाशांना सहज माहिती मिळत नाही. 

रेल्वेमार्गाची सुरक्षितता आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी माहिती प्रसारण सेवा सुरू करण्यासाठी "स्पेस टेक्‍नॉलॉजी टूल'चा वापर करता यावा यासाठी रेल्वे प्रशासन आणि "इस्रो' यांच्यात करार झाला होता. दाट धुके असताना विशेषतः उत्तर भारतात रेल्वेच्या सुरक्षित व सुलभ वाहतुकीसाठी अभ्यास याद्वारे करण्याचे ठरले आहे. तसेच रिमोट सेन्सिंग आणि भौगोलिक माहिती प्रणाली विकसित करण्याचेही ठरले होते. या प्रणालीद्वारे रेल्वेमार्गावरील पुढील स्थानक, रिअल टाइम ट्रेन ट्रॅकिंगसह रेल्वेत प्रवासी माहिती प्रणाली विकसित केली जात आहे. या प्रणालीमुळे रेल्वे प्रवाशांना इत्थंभूत माहिती सहज उपलब्ध होणार आहे. येत्या काही महिन्यांतच ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिली.