येत्या एक एप्रिलपासून मुद्रांक विभागात ऑनलाईन  विवाह नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

 
नाशिक : भाडेपट्टी नोंदी ते खरेदी-विक्री व्यवहारासाठीची प्रक्रिया जनतेला घरबसल्या करता यावी, यासाठी सर्व प्रक्रीया सुलभतेने ऑनलाईन केली जात आहे. त्यांचअंतर्गत येत्या 1 एप्रिलपासून मुद्रांक नोंदणी विभागाकडे होणारी विवाह नोंदणीची प्रक्रियाही ऑनलाईन होत आहे. त्यानुसार नोंदणी करण्याचे बंधन असेल,असे राज्याचे मुद्रांक महानिरीक्षक अनिल कवडे यांनी दिली

 
नाशिक : भाडेपट्टी नोंदी ते खरेदी-विक्री व्यवहारासाठीची प्रक्रिया जनतेला घरबसल्या करता यावी, यासाठी सर्व प्रक्रीया सुलभतेने ऑनलाईन केली जात आहे. त्यांचअंतर्गत येत्या 1 एप्रिलपासून मुद्रांक नोंदणी विभागाकडे होणारी विवाह नोंदणीची प्रक्रियाही ऑनलाईन होत आहे. त्यानुसार नोंदणी करण्याचे बंधन असेल,असे राज्याचे मुद्रांक महानिरीक्षक अनिल कवडे यांनी दिली

श्री.कवडे यांनी नाशिक विभागातील मुद्रांक नोंदीची माहिती घेतली .त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुंबई विभागाचे अपर मुद्रांक नियंत्रक सुरेश जाधव, नाशिक विभागाच्या मुद्रांक उपमहानिरीक्षक सरिता नरके, मुख्यालय नोंदणी उपमहानिरीक्षक चिंतामण भुरकुंडे, नाशिकचे सहनिबंधक मनोज वावीकर उपस्थित होते. श्री. कवडे यांनी, नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे केल्या जाणाऱ्या दस्तऐवज नोंदींची माहिती दिली. 2002पासूनच्या दस्तांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाली आहे. या नोंदी 100 टक्के पूर्ण होतील, तेव्हा जमिनीची वा मालमत्तेची दस्तऐवज नोंदणी करतांना त्या मालमत्तेच्या वादाची, बोजाची माहिती तात्काळ मिळू शकेल. पॅनकार्ड पडताळणी केली जात असून लवकरच आधारकार्डही लिंक करून त्याद्वारे ओळख पटवणे शक्‍य होणार आहे. त्याचप्रमाणे ई-नोंदणीद्वारे भाडेकरार, सदनिका, म्हाडाची वाटपपत्रे ऑनलाईन केली आहे. येत्या काळात पक्षकारांना पासपोर्टच्या धर्तीवर नोंदणीसाठीची वेळ आरक्षित करता येणे लवकरच शक्‍य होणार आहे. 
 

ई-पेमेंटबाबत करार प्रक्रीया अंतिम टप्प्यात 
ई-पेमेंटद्वारे आत्तापर्यंत 5हजार रुपयांवरील व्यवहार करता येत होते. लवकरच 100रुपयांपासूनचे शुल्कही ई-पेमेंटद्वारे करता येणार आहे असे सांगून ते म्हणाले, या प्रक्रीयेसाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाशी कराराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. इ-व्हॅल्युएशनच्या माध्यमातून मिळकतीची माहिती मिळते. रेडिरेकनरनुसार दर कळत नाहीत. ही सुविधाही लवकरच विकसित होत असून लागू शकणारी स्टॅम्प ड्युटीही कळू शकेल. ई-रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना घरबसल्या वा कार्यालयातून भाडेपट्टी करार करणे सुलभ होणार आहे. अविवाह नोंदणीसाठी येत्या एप्रिलपासून नोंदणी कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही. ऑनलाईन विवाह नोंदणीमुळे संबंधितांना आपली माहिती ऑनलाईन नोंदणी विभागाकडे कोणाच्याही मदतीशिवाय पाठविता येणे शक्‍य होणार आहे. केवळ 30 दिवसांनंतर ठरल्यावेळी नोंदणी कायालयात विवाहसाठी यावे लागणार असून ही प्रक्रिया येत्या 1 एप्रिलपासून ऑनलाईन पद्धतीनेच केली जाणार असल्याचेही श्री. कवडे यांनी सांगितले. 

नोटरीचा भाडेकरार ग्राह्य नाही 
बरेच घरमालक हे नोटरी करून भाडेकरुंची करार करतात. पण तो कायदेशीररित्या ग्राह्य नाही. मुद्रांक नोंदणी करूनच भाडेकरार करणे अपेक्षित आहे. यासाठी पोलीस महासंचालकांकडे बैठक होऊन नोंदणी विभागाकडे असलेली माहिती पोलिसांना कशी मिळू शकेल, याबाबत संयुक्तीक प्रणाली विकसित केली जाणार आहे. ज्यामुळे घरमालक व भाडेकरूंकडून पोलिसांची होणारी दिशाभूल टाळणे शक्‍य होणार आहे.