सटाण्यात दंगल,सातजण गंभीर,सहा किरकोळ जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

सटाणा : शहरात मुस्लीम समाजाच्या दोन गटांत पूर्ववैमनस्यातून आज (ता. 16) जामा मशिदीसमोर भरदुपारी दंगल उसळली. दोन्ही गटांनी सर्रासपणे लाठ्या-काठ्यांचा केलेला वापर व दगडफेकीमुळे सात जण गंभीर जखमी, तर अन्य सहा जण किरकोळ जखमी झाले. 

सटाणा : शहरात मुस्लीम समाजाच्या दोन गटांत पूर्ववैमनस्यातून आज (ता. 16) जामा मशिदीसमोर भरदुपारी दंगल उसळली. दोन्ही गटांनी सर्रासपणे लाठ्या-काठ्यांचा केलेला वापर व दगडफेकीमुळे सात जण गंभीर जखमी, तर अन्य सहा जण किरकोळ जखमी झाले. 

गंभीर जखमींना मालेगाव येथे हलविण्यात आले असून, सटाणा पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीसांनी दंगा नियंत्रण पथक व राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी घटनास्थळी तैनात केली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयिताना ताब्यात घेतले आहे. 
येथील शेख व मुल्ला या दोन गटांत वर्चस्वासाठी पूर्वीपासूनच तणावाचे वातावरण आहे.

आज दुपारी नमाज पठणानंतर जामा मशिदीसमोर शेख व मुल्ला गटातील युवकांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन भीषण हाणामारीत झाले. पूर्वनियोजित कटाप्रमाणे दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करीत लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण सुरु केली. या प्रकारामुळे नमाजासाठी आलेल्या मुस्लीम बांधवांची धावपळ उडाली. कुणी पळत होते तर कुणी गर्दीत चेंगरले जात होते. मशिदीसमोरील टिळक रोडवर दगडविटांचा व चपलांचा खच पडला होता. अचानक उसळलेली ही सिनेस्टाईल हाणामारी पाहून मशिदीसमोरील सर्वच व्यापारी व व्यावसायिकांनी दुकाने बंद केली. रस्त्याच्या दुतर्फा बसलेल्या विक्रेत्यांची या घटनेमुळे मोठी तारांबळ उडाली. 

घटनेचे वृत्त पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांना समजताच ते फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याने दंगलखोरांनी आजूबाजूच्या गल्लीबोळात पळ काढला. त्यामुळे जामा मशिदीसमोर अघोषित संचारबंदीसारखी परिस्थिती होती. जखमींमध्ये युनुस मुल्ला (वय 36), आसिफ मुल्ला (वय 35), अनिस मुल्ला, आसिफ शहा, दानिश मुल्ला, इरफान शेख, यासिर शेख, सद्दाम शेख, अशपाक शेख, वसीम खाटिक, तामिर शेख, रफिक मुल्ला, यासीन शेख, शादाब शेख यांचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज शिवदे, डॉ. शशिकांत कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी जखमींवर उपचार सुरु केले. 

दरम्यान, काही युवकांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. जखमींना पाहून दोन्ही गटांच्या समर्थकांत ग्रामीण रुग्णालयातच पुन्हा हाणामारी झाली. मात्र, तेथे हजर असलेले वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांच्या समयसूचकतेमुळे दंगलखोरांना काही मिनिटांतच ग्रामीण रुग्णालयातून पळवून लावण्यात आले. यामुळे पुढील अनर्थ टळला. युनुस मुल्ला, अनिस मुल्ला, आसिफ शहा, दानिश मुल्ला, इरफान शेख, यासिर शेख, सद्दाम शेख हे गंभीर जखमी असून, त्यांना मालेगाव येथे हलविले आहे. मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन सूचना दिल्या. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कळवण, देवळा, जायखेडा, वडनेर खाकुर्डी या पोलीस ठाण्यांचे अधिकारी व 50 कर्मचाऱ्यांसह दंगा नियंत्रण पथक व राज्य राखीव दलाची एक तुकडी शहरात दाखल झाली आहे. 

कारवाई केल्याचा राग 
काल (ता. 15) नईम मोहम्मद शेख (वय 57, रा. अमरधाम रोड, सटाणा) आपल्या नातवासह रस्त्याने जात असताना मुस्लीम समाजाच्या काही युवकांनी कारण नसताना शेख यांची टिंगल केली. या कारणावरून नईम शेख यांनी आदिल मुल्ला, दानिश मुल्ला, मकसूद मुल्ला, सलमान पठाण (सर्व रा. मुल्लावाडा) यांच्याविरुद्ध सटाणा पोलीस तक्रार दिली होती. सटाणा पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई केल्याने आजची दंगल उसळल्याची चर्चा शहरात होती.