बारा लघुप्रकल्पांमध्ये ठणठणाट! 

dam
dam

मेहुणबारे (जळगाव) : गेल्या वर्षापेक्षा यावर्षी पावसाची चांगली सुरवात असली, तरी तालुक्‍यात अद्याप पाहिजे तसा दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे खडकीसीम व कृष्णापुरी हे दोन प्रकल्प वगळता इतर बारा लघु प्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे, अशी माहिती लघु पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, बहुतांश लघु प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर गळती असल्याने त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. 

जुलै महिना अर्धा होऊनही अद्याप तालुक्‍यात पाहिजे तसा दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक गावांना आजही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर्षी पिकांची परिस्थिती चांगली आहे. तालुक्‍यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे खडकीसीम धरणात 40 टक्के जलसाठा झाला असून, कृष्णापुरी धरणात आठ टक्के जलसाठा झाला आहे. कृष्णापुरी धरणातील साठा हा गिरणा धरणातील आहे. अजूनही हे पाणी त्यात शिल्लक आहे. इतर बारा प्रकल्पांमध्ये कुठलीच वाढ झालेली नाही. असे असले तरी शासनाच्या "जलयुक्त शिवार' योजनेंतर्गत झालेल्या कामांमुळे काही गावांत पाण्याची उपलब्धता झाली आहे. 

पाणीचोरी रोखण्यात अपयश 
तालुक्‍यासाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणातील जलसाठ्यात अद्याप वाढ झालेली नाही. सद्यःस्थितीत गिरणा धरणात दहा टक्के साठा आहे. मागील वर्षी झालेल्या पावसामुळे छोट्या चौदा लघु प्रकल्पांमध्ये चांगला जलसाठा झाला होता. मध्यंतरीच्या काळात बऱ्याच प्रकल्पांतून पाण्याची चोरी झाली होती. या पाण्याच्या चोरीकडे पाटबंधारे विभागाचे जाणूनबुजून दुर्लक्ष केले होते. त्यामुळेच बहुतांश प्रकल्प उन्हाळ्यातच खाली झाले. 

खडकीसीम, कृष्णापुरीला गळती 
मेहुणबारेजवळील खडकीसीम बंधाऱ्याच्या सांडव्याची यापूर्वी दुरुस्ती करणे गरजेचे असताना ती झाली नाही. वरखेडे गावापासून दोन किलोमीटरवरील कृष्णापुरी धरणाचेदेखील असेच रडगाऱ्हाणे आहे. या प्रकल्पाच्या दरवाजाजवळ मोठ्या प्रमाणावर गळती सुरू होती. हा दरवाजाच पाटबंधारे विभागाने बंद केला. काही ठिकाणी प्रकल्प भरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत असते. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन प्रकल्पांमधील पाणीचोरीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी होत आहे. 

तक्रारींकडे दुर्लक्ष 
बोरखेडा येथील तलावाला दोन दरवाजे असून, त्यांची पत्रे सडली आहेत. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होते. शिवाय, पाण्याची चोरी केली जाते ती वेगळी. पाणीचोरीसंदर्भात लघुपाटबंधारे विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्याची दखलच घेतली जात नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांना आला आहे. 

पाण्याचा ठणठणाट असलेले प्रकल्प! 
चाळीसगाव तालुक्‍यात लघुपाटबंधारे विभागाचे चौदा छोट्या तलावांपैकी हातगाव- 1, पिंप्री उबंरहोळ, वाघळी- 1, ब्राह्मणशेवगे, पिंपरखेड, कुंझर- 2, वाघळी- 2, बोरखेडा, वलठाण, राजदेहरे, देवळी- भोरस, पथराड हे प्रकल्प सद्यःस्थितीत कोरडेठाक आहेत. जुलै महिन्यात ही स्थिती असल्याने टंचाई उद्‌भवू नये म्हणून दमदार पावसाची प्रतीक्षा होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com