उत्तर महाराष्ट्रातील 12 हजार विद्यार्थ्यांनी दिली 'नीट' परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

सीबीएसईतर्फे आयोजित या परीक्षेतील रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्‍नांनी विद्यार्थ्यांचा घाम फोडला. वीस केंद्रांवर झालेल्या या परीक्षेला उत्तर महाराष्ट्रातून 12 हजार 360 विद्यार्थी समोरे गेले. 
 

नाशिक - एमबीबीएस, बीडीएससह अन्य विविध वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी रविवारी (ता. 6) नॅशनल इलिजिब्लीटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षेचे आयोजन केले होते. सीबीएसईतर्फे आयोजित या परीक्षेतील रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्‍नांनी विद्यार्थ्यांचा घाम फोडला. वीस केंद्रांवर झालेल्या या परीक्षेला उत्तर महाराष्ट्रातून 12 हजार 360 विद्यार्थी समोरे गेले. 

नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा केंद्रांवर सकाळी 7:30 पासून प्रवेश देण्यास सुरवात झाली. 7:30 ते 9:30 या वेळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. या कालावधीत आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र तपासणी करत प्रवेशपत्रावर छायाचित्र चिटकवण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. प्रत्यक्ष परीक्षेला सकाळी 10पासून सुरवात झाली. तीन तास चाललेल्या या परीक्षेत काही प्रश्‍नांनी विद्यार्थ्यांना चांगलाच घाम फोडला. जीवशास्त्र (बायोलॉजी) विषयाचे प्रश्‍न फारसे अवघड वाटले नाही. परंतु भौतिकशास्त्र (फिजिक्‍स) व रसायनशास्त्र (केमिस्ट्री) या विषयाच्या प्रश्‍नांची काठीण्यपातळीमुळे गुणांवर परीणाम होऊ शकेल, अशी भिती विद्यार्थ्यांनी व्यक्‍त केली. 

दरम्यान परीक्षेला जातांना विद्यार्थ्यांना पेहरावाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात आले. सर्वच विद्यार्थी हाफ शर्ट किंवा टी-शर्टमध्ये उपस्थित झाले होते. तर काही विद्यार्थिनींच्या कानातील रिंग, हातातील बांगड्या, कमरेवरील बेल्ट, घड्याळ, गाडीची चावी आदी वस्तू परीक्षा केंद्रात नेण्यास मज्जाव करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना त्या बाहेर काढून ठेवाव्या लागल्या. उत्तर महाराष्ट्रातून आलेल्या 12 हजार 360 विद्यार्थ्यांनी नाशिकमधील वीस केंद्रांवर आजची नीट परीक्षा दिली. विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असतांना पालक परीक्षा केंद्राबाहेर ठाण मांडून होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: 12 thousand students of North Maharashtra gave NEET examination