जैताणेत वन्य श्वापदाच्या हल्ल्यात 13 मेंढ्या मृत्यूमुखी

भगवान जगदाळे
गुरुवार, 10 जानेवारी 2019

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील मेंढपाळ बलराज रमेश भलकारे यांच्या मालकीच्या सुमारे 23 पैकी 13 मेंढ्या मंगळवारी (ता. 8) मध्यरात्रीच्या सुमारास वन्य श्वापदाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यापैकी 10 मृत मेंढ्यांचा पंचनामा केला असून सुमारे एक लाख दहा हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जैताणेच्या पश्चिमेला वासखेडी रोडलगतच्या गट क्रमांक 119/1 मधील शांतीलाल भटा काटके यांच्या शेतात मेंढपाळ बलराज भलकारे यांच्या मेंढ्यांचा वाडा असून थंडीचे दिवस असल्याने जेवणानंतर मेंढपाळ मंगळवारी रात्री (ता.8) लवकर झोपले. रात्री सुमारे अकरा ते बाराच्या सुमारास संधी साधून वन्य श्वापदाने मेंढ्यांवर हल्ला चढवला व 13 मेंढ्या फस्त केल्या. सकाळी घडलेला प्रकार मेंढपाळांच्या लक्षात आला. त्यांनतर वनविभाग व पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधून संबंधितांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली.

बुधवारी (ता. 9) दुपारी चारच्या सुमारास कोंडाईबारी वनक्षेत्राचे वनपाल पी.एस. जगताप, वनरक्षक देसले यांनी घटनास्थळी 10 मृत मेंढ्यांचा पंचनामा करून तसा अहवाल पशुवैद्यकीय विभागाकडे पाठवला आहे. घटनास्थळी मेंढपाळ बलराज भलकारे यांच्यासह माजी उपसरपंच आबा भलकारे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गावित, गोकुळ सोनवणे, ज्ञानेश्वर काटके आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सुमारे एक लाख दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पीडित मेंढपाळास त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी उपसरपंच आबा भलकारे यांनी 'सकाळ'च्या माध्यमातून शासन-प्रशासनाकडे केली आहे.

Web Title: 13 sheep died in attack of wild animals