फसवणूकप्रकरणी तोतया नाटककार गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

नाशिक : गंगापूर रोड परिसरातील मुलांना नाटकाच्या नावाखाली भुलवून त्यांचे नाटक दुबईत सादर करण्याचे पालकांना सांगत, त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या तोतया नाटककाराला गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे. प्रशांत दामोदर वाघ (29, रा. खरबंदा पार्क, द्वारका, नाशिक) असे तोतया नाटककाराचे नाव असून त्याने 2 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. 

नाशिक : गंगापूर रोड परिसरातील मुलांना नाटकाच्या नावाखाली भुलवून त्यांचे नाटक दुबईत सादर करण्याचे पालकांना सांगत, त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या तोतया नाटककाराला गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे. प्रशांत दामोदर वाघ (29, रा. खरबंदा पार्क, द्वारका, नाशिक) असे तोतया नाटककाराचे नाव असून त्याने 2 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. 

पृथ्वीराज दगा विसपुते (रा. विसपुते ऍव्हेन्यू, पाटील लॉन्सजवळ, सोमेश्‍वर) यांच्या फिर्यादीनुसार, तोतया नाटककार प्रशांत वाघ याच्याविरोधात गंगापूर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटकही केली आहे. तोतया वाघ याने स्वत:ची ओळख नाटककार असल्याची करून देत, गंगापूर रोड व परिसरातील काही मुलांच्या पालकांना त्यांच्या मुला-मुलींना नाटक शिकविण्याचे आमिष दाखविले.

पालकांचाही त्याच्यावर विश्‍वास बसल्याने 16 नोव्हेंबर 2016 ते 15 ऑगस्ट 2018 या दरम्यान, तोतया नाटककारांना मुला-मुलींच्या नाटकांचे प्रशिक्षण कधी सायखेडकर तर कधी कालिदास कला मंदिर येथे घेतले होते. 
दरम्यान, त्याने नाटकाच्या प्रशिक्षणात येणाऱ्या मुलांचे नाटक दुबईमध्ये केले जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याने त्यासाठी प्रशिक्षणासाठी येणाऱ्या मुलांच्या पालकांनाही तसे सांगत त्यांच्याकडून त्यासाठी सुमारे 2 लाख 1 हजार रुपयांची रक्कम उकळली. यामध्ये पृथ्वीराज विसपुते यांच्याकडून 50 हजार रुपये, गौरी कुलकर्णी यांच्याकडून 12 हजार रुपये, तृप्ती पंडित तांबे यांच्याकडून 54 हजार रुपये, समीर चिंतामण जोशी यांच्याकडून 12 हजार रुपये, महेश राजाराम देशपांडे यांच्याकडून 12 हजार रुपये, गीतांजली श्रीनंदन भालेराव यांच्याकडून 12 हजार रुपये, उन्मेष रामदास कुमठेकर यांच्याकडून 37 हजार रुपये, शीतल सुधीर शिंदे यांच्याकडून 12 हजार रुपये असे 2 लाख 1 हजार रुपये त्याने घेतले.

   पैसे घेतल्यानंतरही तो मुलांना दुबई येथे नाटकासाठी घेऊन न गेल्याने एकप्रकारे त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, या पालकांनी गंगापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. त्यावेळी पोलिसांनी तोतया नाटककार वाघ यालाही पोलिसात हजर होण्याचे सांगितले असता, त्याने नकार देत टाळाटाळ केली. त्यामुळे पोलिसांनी मंगळवारी (ता.21) रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास अटक केली. सदरील गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक समीर वाघ हे करीत आहेत.