National Lok Adalat : दाखलपूर्व 14 हजारांवर प्रकरणे निकाली! जिल्हाभरात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीतून निपटारा | 14 thousand cases settled before filing Settlement through National Lok Adalat held across district dhule news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

national People Court

National Lok Adalat : दाखलपूर्व 14 हजारांवर प्रकरणे निकाली! जिल्हाभरात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीतून निपटारा

National Lok Adalat : राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल १४ हजारांवर दाखलपूर्व, तर ३७८ प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणांतून १७ कोटी ९८ लाख रुपये नुकसानभरपाई वसूल करून देण्यात आली. (14 thousand cases settled before filing Settlement through National Lok Adalat held across district dhule news)

न्यायालयांमध्ये असंख्य प्रकरणे प्रलंबित राहतात. अनेक प्रकरणांमध्ये वर्षानुवर्षे खटले चालतात. त्यामुळे न्यायासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे विविध कारणांनी वादाची प्रकरणे न्यायालयात दाखल होण्यापूर्वीच सामोपचाराने ती मिटावीत यासाठी प्रयत्नांची गरज व्यक्त होते.

लोकअदालतीच्या माध्यमातून असा प्रयत्न होतो. या लोकअदालतींमधून अनेक प्रकरणे निकाली काढण्यात येतात. त्यातून संबंधितांनाही दिलासा मिळतो. पैसा आणि वेळेचीही यामुळे बचत होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या आदेशाने ३० एप्रिलला धुळे जिल्हा व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत झाली.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एच. मोहम्मद यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत पार पडली. लोकअदालतीच्या माध्यमातूनही विविध वादाच्या प्रकरणांचा निपटारा झाल्याचे पाहायला मिळाले.

लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. न्यायालयात प्रलंबित सहा हजार ६३७ प्रकरणे ज्यामध्ये धनादेश न वठल्याबाबतच्या केसेस, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे ठेवण्यात आली होती.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्याचप्रमाणे वादपूर्व ७१ हजार ८२ प्रकरणे ज्यामध्ये ग्रामपंचायत पाणीपट्टी व घरपट्टी प्रकरणे, वीज थकबाकी प्रकरणे, बॅंकेची थकबाकी प्रकरणे, फायनान्स कंपनीचे थकबाकी प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे इत्यादी ठेवण्यात आली होती.

या प्रकरणांमध्ये प्रलंबित ३७८ व दाखलपूर्व १४ हजार ६४० अशी एकूण १५ हजार १८ प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली.

अठरा कोटींची वसुली

या लोकअदालतीमध्ये एकूण १७ कोटी ९८ लाख ११ हजार ७८६ रुपयांची नुकसानभरपाई वसुली झाली.

या लोकअदालतीसाठी धुळे जिल्हा वकील संघ, तालुका वकील संघ, पक्षकार, पोलिस, सर्व बँका, सर्व ग्रामपंचायत, महावितरण कंपनी आदींचे सहकार्य मिळाले. त्याबद्दल धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मोहम्मद व सचिव संदीप वि. स्वामी यांनी आभार व्यक्‍त केले.

टॅग्स :DhuleCourtlok adalat