Dhule News : धुळे जिल्ह्यात 15 कोटींची उलाढाल; अक्षयतृतीयेसह रमजान ईदमुळे बाजारपेठेला चालना | 15 crore turnover in district due to akshaya tritiya and ramadan eid dhule news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

15 crore turnover in district due to akshaya tritiya and ramadan eid

Dhule News : धुळे जिल्ह्यात 15 कोटींची उलाढाल; अक्षयतृतीयेसह रमजान ईदमुळे बाजारपेठेला चालना

Dhule News : अक्षय तृतीयेमुळे शहरासह जिल्ह्यात सरासरी पाच कोटी रुपयांची, तर रमजान सणाच्या कालावधीत सरासरी दहा कोटींची, अशी एकूण पंधरा कोटींची उलाढाल झाली. या दोन सणांमुळे बाजारपेठेला चालना मिळत सोने आणि कपड्यांचे मार्केट तेजीत राहिले. (15 crore turnover in district due to akshaya tritiya and ramadan eid dhule news)

ही समाधानाची बाब असल्याचे धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.शहरासह जिल्ह्यात अक्षयतृतीयेनिमित्त शनिवारी (ता. २२) घरोघरी घागर भरून, आगारी पेटवून पूर्वजांचे स्मरण झाले. घागर, आंबे, खापराची पूरणपोळी आणि पूरक साहित्य खरेदी-विक्रीतून बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल झाली. सोने खरेदीतून दिवसभरात दीड कोटीची उलाढाल झाल्याचा अंदाज सराफ व्यावसायिक अजय नाशिककर यांनी वर्तविला.

धुळ्यातील सराफ बाजारात गर्दी

अक्षयतृतीयेला सोने खरेदीची परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर सोने खरेदीला उधाण आले. शनिवारी २४ कॅरेट सोन्याचा दर सरासरी ६० हजार ६०० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ५७ हजार ५०० रुपये होता. तसेच चांदीचा दर सरासरी ७६ हजार रुपये किलो होता. सोने खरेदीसाठी महिलांनी सकाळपासून येथील आग्रा रोडवरील सराफ बाजारात गर्दी केली.

दागिन्यांबरोबरच सोन्याच्या वेढणीचीही मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. सतत वाढलेल्या सोन्याच्या दरामुळे अक्षय तृतीयेला मागणीवर परिणाम दिसला. तरुण वर्गाकडून हिऱ्याच्या दागिन्यांना पसंती होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत ऑनलाइन सोने खरेदीचे प्रमाण वाढले आहे. यात प्रामुख्याने सोन्याची नाणी व वळीचा समावेश होता, अशी माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आमरस, पुरणपोळीला पसंती

अक्षयतृतीयेला पूजेसाठी लागणारी घागर व आंब्यांनाही मोठी मागणी राहिली. घागरी सरासरी ८० ते १०० रुपयांपासून पुढे विक्रीस होत्या. आंबे सरासरी १०० ते १४० रुपये प्रतिकिलो दराने विक्रीस होते. खापराच्या तयार पूरणपोळीची सरासरी ६० ते ७० रुपये नगाने विक्री झाली. नागरिकांनी खरेदीसाठी शहरातील आग्रारोडवरील बाजारपेठेत प्रचंड गर्दी केली होती.

अक्षयतृतीयेनिमित्त शहरातील मंदिरांमध्येही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. काही भाविकांनी नैवेद्य दाखविला. या वेळी आंब्यांचा आरास, मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.

वाहन खरेदी, घरांचे बुकिंग

नवीन घराचे बुकिंग, गाडी खरेदी, तर काहींनी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करून धुळेकरांनी साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षयतृतीयेचा मुहूर्त गाठला. कार, दुचाकी गाड्यांच्या शोरूममध्येही रेलचेल होती.

आठवडा, महिनाभरापूर्वीच नोंदणी केलेली वाहने नागरिकांनी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी केली. टीव्हीसह इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाईल, लॅपटॉपची खरेदी केली. आकर्षक ड्रेस मटेरिअल, रेडीमेड कपडे मुबलक दरात घरपोच मिळत असल्याने नागरिकांचा ऑनलाइन खरेदीकडे कल वाढता दिसत आहे.

रमजानमुळेही उलाढालीस चालना

धुळे शहरासह जिल्ह्यात मुस्लीमबांधवांचा रमजान व ईद सण शांततेत पार पडला. या सणाच्या कालावधीत कपडे, विविध वस्तू, खाद्यपदार्थांच्या खरेदीवर अधिक भर देण्यात आला. त्यामुळे बाजारपेठेत या सणाच्या कालावधीत वर्दळ राहिली.

या कालावधीत सरासरी दहा कोटींची उलाढाल झाल्याचा अनुमान श्री. बंग यांनी व्यक्त केला. दरम्यान, अक्षयतृतीया व ईदच्या दिवशी शनिवारी दुपारपासून पावसाळी वातावरण, नंतर त्याचे पावसाच्या आगमनाने बाजारपेठेतील उलाढालीवर परिणाम झाला