150 वर विद्यार्थ्यांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांना 'बायबाय'

संतोष विंचू
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

“ब्रिटिश कौन्सिल, टाटा, व शासन यांच्या संयुक्त विद्यमाने इंग्रजी विषयाचे टॅग कार्यशाळेच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा इंग्रजी विषयात पुढे येत आहे.”

- प्रशांत शिंदे, टॅग समन्वयक

येवला : डिजिटल क्लासरूम,अध्ययन-अध्यापनातील नाविन्यपूर्णता,शिक्षकांच्या धडपडीतून वाढलेली शाळांची लोकप्रियता आणि गुणवत्ता..यामुळे गावोगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळांना पालक व विध्यार्थ्यानी डोक्यावर घेतले आहे. याच बदलामुळे तालुक्यातील १५० वर विद्यार्थ्यानी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना बायबाय करत विविध जिल्हा परिषदेच्या शाळांत प्रवेश घेतला आहे.

दोन तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे गुणवत्तेचे तीनतेरा वाजल्याची स्थिती असल्याचे बोलले जात होते. मात्र प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रासह डिजिटल शाळा उपक्रमाने शाळांचा चेहरामोहरा बदललेला आहे. अध्यापनाचा दर्जा उंचावल्याने पालकांचा दृष्टिकोन बदलला असून, नव्या दमाच्या शिक्षकांना जुन्या शिक्षकांच्या अनुभवाची जोड मिळाल्याने परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत.

नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती, ज्ञानरचनावादाचा उपयोग, डिजिटल शाळा, आयएसओ दर्जा, प्रगत उपक्रमशीलतेमुळे खासगी शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजी माध्यमापेक्षाही दर्जेदार शिक्षण मिळू लागल्याने विद्यार्थी तिकडे आकर्षित होत आहेत. नव्या दमाच्या गुरुजींनी देखील आपले विद्यार्थी गुणवंत व्हायला हवे या हेतूने स्वतःमध्ये आमूलाग्र बदल केले आहे. यामुळे गावोगावी भांडवलदार शिक्षणसम्राटांच्या सुरू झालेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांदेखील गुरुजींच्या धडपडी पुढे फिक्या पडत आहे.

विशेष म्हणजे शासनाकडून अनुदान नसताना पालकांची संबंध दृढ करत शाळेला रंगरंगोटी,फलक,बाक इथेपासून तर डिजिटल साहित्य खरेदीपर्यंत लोकसहभाग मिळवला आहे. यामुळे तालुक्यात जिल्हा परिषद शाळांचे नवे पर्व सुरू झालेले दिसतेय.

यांनी उंचावली मान...

तालुक्यातील पुरणगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विध्यार्थ्यांच्या हातात टब आल्याने या शाळेने आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे.यंदा तर येथे १६ विद्यार्थी इंग्रजी माध्यमांकडून आले आहेत. मातुलठाणची शाळा तालुक्यातली पहिली वायफाय तर पांडववाडी,वडगाव बल्हे, मन्यारथडी, फुलेवाडी,पिंपळगाव लेप या शाळा आयएसओ झाल्या आहेत.

नेऊरगाव, सायगाव, अंगुलगाव, उंदीरवाडी, धामोडा, पांडववाडी, कोटमगाव या शाळांनी देखील तालुक्याच्या शैक्षणिक पटलावर वेगळी ओळख निर्माण करून इतरांनाही प्रेरणा दिली आहे. सुकी या छोटय़ा गावात तर यंदा सत्तावीस विद्यार्थी पहिलीच्या वर्गात प्रविष्ट झालेले आहेत,हेच जिल्हा परीषद शाळांचे यश म्हणावे लागेल.

जि.प.च्या शाळांचे प्रगतीचे आकडे
-एकूण शाळा - २३६
-डिजिटल झालेल्या शाळा -२३7
-सेमी इंग्रजीच्या शाळा - १३७
-इंग्रजी माध्यमातून आलेले एकूण विध्यार्थी - १५०
-इंग्रजी माध्यमाकडून सर्वाधिक विध्यार्थी आलेल्या शाळा - पूरनगाव १६,वडगाव बल्हे ८,सुकी ६,जळगाव नेऊर ५,सुकी ५, नेऊरगाव ३,पांजरवाडी ३

“तालुक्यात डिजीटल शाळा, तंत्रस्नेही कार्यशाळा, व शिक्षकांचा स्वतःहून पुढाकार या माध्यमातून शाळा नावारूपाला येत आहे. माझ्या शाळेत ३ वर्षात २९ विध्यार्थी इंग्रजी शाळेतून आले.”
नानासाहेब कुऱ्हाडे,उपक्रमशील शिक्षक,नेउरगाव  

“केल्याने होत आहे रे...या उक्तीने तालुक्यातील शिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन बदल घडवला.सेमी इंग्रजी व डिजीटल शाळा आणि अध्यापन-अध्ययनातील नाविन्यता यामुळे गुणवत्ता वाढून शाळा विध्यार्थीप्रिय होत आहेत.”

- प्रवीण गायकवाड,सदस्य,पंचायत समिती

Web Title: 150 students left english medium school