दीड हजार कोटींचा डाळिंबाला दणका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

गेल्यावर्षी देशातून डाळिंबाची ७५ हजार टनांपर्यंत निर्यात झाली होती. यंदाच्या उन्हाळ बहराची २० हजार टनापर्यंत निर्यात अपेक्षित होती. प्रत्यक्षात मात्र दहा हजार टन निर्यात होईल असे दिसते. भाव आणि निर्यातीतील घट पाहता, पन्नास कोटींची कमी निर्यात झाली.
- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, डाळिंब उत्पादक संघ

नाशिक - दुष्काळामुळे उन्हाळ्यात डाळिंबाच्या बागांचा बहर धरता आला नाही, तर आता अतिपावसाने दाणादाण उडवून दिली आहे. या चक्रात राज्यातील डाळिंब उत्पादकांना दीड हजार कोटींचा फटका बसल्याचा अंदाज आहे. सीमा कधी सुरू आणि कधी बंद होईल, याची शाश्‍वती नसल्याने बांगलादेशचे ग्राहक तुटल्यात जमा असून, आता डाळिंबासाठी आखाती देशांशिवाय पर्याय उरलेला नाही.

राज्यामध्ये १ लाख ४० हेक्‍टरवर डाळिंबाच्या बागा उभ्या आहेत, त्यापैकी ३० टक्के क्षेत्रावर सोलापूर, नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात उन्हाळ हंगाम बहर धरला जातो. प्रत्यक्षात मात्र पन्नास टक्के बागांमध्ये पाण्याच्याअभावी बहर धरणे उत्पादकांनी टाळले आहे. याखेरीज दहा टक्के क्षेत्रावरील बागा जळून गेल्या आहेत. दिवाळीपर्यंत चालणाऱ्या हंगामात आता देशांतर्गत किलोला पन्नास ते दीडशे, तर निर्यातीसाठी एकशे तीस रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. गेल्यावर्षी याच काळात स्थानिक ७० आणि ८० ते ९० रुपये किलो निर्यातीसाठी असा भाव मिळाला होता. 

पाण्याच्या उपलब्धतेनुसार जून ते पंधरा ऑगस्टदरम्यान एकूण क्षेत्राच्या ५५ टक्के बागा धरल्या आहेत. मात्र अजूनही बहर न धरलेल्या बागांचे प्रमाण पंधरा टक्‍क्‍यांपर्यंत आहे. या परिस्थितीत अजूनही डाळिंब उत्पादनात राज्यात नेमकी काय परिस्थिती राहील याचा ठोकताळा पावसाने चुकवला आहे. त्यातच सध्या आखाती देशांमध्ये आणि देशातंर्गत बाजारपेठेत डाळिंबाला चांगली मागणी असली, तरीही मागणीच्या तुलनेत डाळिंब उपलब्ध नाही अशी स्थिती तयार झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1500 crore loss Pomegranate production