साक्रीला पाणी देण्यास १६ गावांचा तीव्र विरोध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

मालनगाव धरणावरून जलवाहिनीचा प्रस्ताव; संघर्ष समिती स्थापनेसह आंदोलन सुरू

धुळे - टंचाईच्या कालावधीत मालनगाव (ता. साक्री) येथील धरणावरून पूर्वी धुळ्याला आणि आता साक्री शहराला प्रस्तावित जलवाहिनीव्दारे पाणी देण्यास मालनगावसह पंचक्रोशीतील १६ गावांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

मालनगाव धरणावरून जलवाहिनीचा प्रस्ताव; संघर्ष समिती स्थापनेसह आंदोलन सुरू

धुळे - टंचाईच्या कालावधीत मालनगाव (ता. साक्री) येथील धरणावरून पूर्वी धुळ्याला आणि आता साक्री शहराला प्रस्तावित जलवाहिनीव्दारे पाणी देण्यास मालनगावसह पंचक्रोशीतील १६ गावांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

त्यांनी मालनगाव धरण बचाव संघर्ष समितीची स्थापना करत आज धरणालगतच ठिय्या देत आंदोलन सुरू केले. पाण्यावरून निर्माण झालेल्या या संघर्षावरून नेते, अधिकारी काय बोध घेतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल. 
अपुरा पाऊस, खालावणारी भूजलपातळी, शाश्‍वत जलस्त्रोतांच्या प्रश्‍नामुळे साक्री शहराला पाणीटंचाईची झळ हा प्रश्‍न नवीन नाही. उन्हाळ्यात विविध ठिकाणाहून पाणी उपलब्धतेसाठी साक्रीतील संबंधित नेते, पूर्वीची ग्रामपालिका आणि आता नगरपरिषद प्रयत्नशील राहात असते. यात मालनगाव धरणापर्यंत जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव साक्रीतील स्थानिक नेत्यांनी तयार केल्याचे समजताच त्यास विरोधासाठी मालनगावसह पंचक्रोशीतील १६ गावे संघटित झाली. 

जलवाहिनीद्वारे पाण्यास विरोध
कुठल्याही स्थितीत साक्री शहरासाठी मालनगाव धरणातून जलवाहिनी टाकू द्यायची नाही. तसे झाल्यास भविष्यात धरणाच्या लाभ क्षेत्रासह १६ गावांना पिण्याचे पाणी, शेतीसाठी सिंचनाचा प्रश्‍न निर्माण होईल. हा भाग कोरडवाहू होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. साक्री शहरासाठी या धरणातून दुसरे आवर्तन सोडले गेले आहे. पाणी कान नदीने साक्रीला जाते. पाणी चोरी टाळण्यासाठी १२७ शेतकऱ्यांचे वीज कनेक्‍शनही खंडित करण्यात आले. साक्री शहराला असे पाणी देण्यास १६ गावांनी विरोध केलेला नाही. मात्र, जलवाहिनीव्दारे पाणी देण्यास विरोध आहे. यासंदर्भात पूर्वी निवेदन देऊनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले, अशी भूमिका घेत या क्षेत्रातील बहुसंख्य शेतकरी, पाटबागायतदार, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांची काही ज्येष्ठ राजकीय मंडळी बुधवारी (ता. १२) संघटित झाले. त्यांनी मालनगाव धरणाजवळ आज सकाळी नऊला बैठक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वसंतराव बच्छाव, दत्तात्रेय पाटील, प्रभाकर पाटील, हिम्मतराव पाटील, दिगंबर पाटील, राजेंद्र पाटील, साहेबराव पाटील, हिम्मतराव देवरे, भानुदास गांगुर्डे, गोविंदा देवरे, मुकुंदा पवार, टिकाराम बहिरम, साहेबराव चौधरी, सुकाम ठाकरे, शांताराम देवरे, सुरेश बोरसे, जगन्नाथ पाटील, एकनाथ गुरव, चुनीलाल देशमुख यांच्यासह अन्य मान्यवरांची बैठक झाली. 

आंदोलकांच्या मागण्या
मालनगाव प्रकल्पातून साक्री शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्य जलवाहिनी टाकण्यास विरोध करणे, मालनगाव धरणाशीनिगडीत कालवा नूतनीकरणासाठी निधीची मागणी व पाटचाऱ्यांचे नूतनीकरण करण्यासाठी पाठपुरावा करणे, पाणीवाटप संस्थांची निर्मिती करणे, अशा प्रश्‍नांवर नियंत्रणासाठी संघर्ष समिती स्थापन करणे, धरणातील गाळ काढण्यासाठी नियोजन करणे यासह विविध विषयांवर चर्चा झाली. हे विषय सर्वानुमते मंजूर झाले आणि लढ्यासाठी मालनगाव धरण बचाव संघर्ष समितीची स्थापनाही झाली. बैठकीनंतर धरणालगतच आंदोलन सुरू केले. 

विरोधाबाबत ग्रामसभेत एकमत 
साक्री शहराला पाणी देण्यास विरोधासाठी मालनगावसह धरणाच्या लाभ क्षेत्रातील १६ गावे नुसती एकत्रच आली नाहीत तर त्यात ११ ग्रामसभा झाल्या. त्यात एकमताने धरणातील पाणी साक्रीला देण्यास विरोधासंबंधी ठराव मंजूर झाला. खरडबारी, मालनगाव, बोडकीखडी, सातरपाडा, दहिवेल, काळदर, बोधगाव, भोनगाव, किरवाडे, घोडदे, सुरपान येथील ठराव संघर्ष समितीला प्राप्त झाले आहेत.

Web Title: 16 village oppose for sakri water