धुळे: जामदे फायरिंग प्रकरणातील 2 आरोपी गजाआड

भगवान जगदाळे
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जामदे (ता.साक्री) परिसरात 21 जुलैला दुपारी बाराच्या सुमारास भंगार खरेदी-विक्री व पैशांवरून मध्यप्रदेशातील चार व्यापारी व सात स्थानिक रहिवास्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत गोळीबार अर्थात फायरिंग झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यात व्यापाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात जामदे येथील दोन जण जखमी झाले होते. त्यापैकी एक गंभीर जखमी असून तो औरंगाबाद येथे उपचार घेत आहे.

भंगार खरेदी-विक्रीच्या बहाण्याने व्यापाऱ्यांकडील एक लाख रुपये ठेवलेली पिशवी हिसकावून दमदाटी केल्याच्या कारणावरून हा प्रकार घडला होता. तक्रार देण्यास कोणीही पुढे येत नसल्याने सखोल चौकशी करून अखेरीस बिट अंमलदार रामलाल कोकणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 24 जुलैला रात्री बाराच्या सुमारास 11 संशयितांविरुद्ध निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

त्यातील दोन आरोपींना निजामपूर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने सोमवारी (ता.30) रात्री उशिरा आठ लाखाच्या एमपी-09 सीएक्स-9737 क्रमांकाच्या स्कोडा कारसह अत्यंत शिताफीने इंदौर (मध्यप्रदेश) येथून ताब्यात घेतले. मंगळवारी (ता.31) दुपारी दोन-अडीचच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. उर्वरित नऊ आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. अटक केलेल्या आरोपींची नावे बंटी उर्फ युवराज संतोष तायडे (वय-22) व अजय गुरव सुरवाडे (वय-19) रा.इंदौर (मध्यप्रदेश) अशी असून ते दोन्ही आरोपी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत. स्कोडा कारचा मूळ मालक वेगळाच असून फिरायला जाण्याच्या बहाण्याने आरोपींनी सदर कारचा दुरुपयोग केल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले आहे. अशी माहिती निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप खेडकर यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार व अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, साक्रीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, तपास अधिकारी दिलीप खेडकर, उपनिरीक्षक अनिल पाटील, कौतिक सुरवाडे व निजामपूर पोलीस ठाण्याच्या विशेष पोलीस पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली.

Web Title: 2 arrested in firing case at Dhule