
Dhule Crime News : रस्तालूट, घरफोडीतील दोघे अटकेत; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
धुळे : रस्ता लूट आणि घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) शुक्रवारी अटक केली. संशयितांकडून दुचाकी आणि लाखाचा ऐवज हस्तगत झाला. (2 arrested in robbery burglary by Local Crime Investigation Branch dhule crime news)
जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की दीपक शिवलाल अहिरे (वय ३३, रा. बिलाडी, ता. धुळे) हा ९ मार्चला सायंकाळी साडेसातला बारापत्थर चौकातील एका गॅरेजवर होता.
त्या वेळी अकबर जलेला (रा. पूर्व हुडको, चाळीसगाव रोड, धुळे) व त्याच्या साथीदाराने अहिरे याला शिवीगाळ केली व कोयत्याचा धाक दाखवत त्याच्या खिशातील दहा हजार रोख, चांदीचे ब्रेसलेट, मोबाईल हिसकावून नेला.
याबाबत अहिरे याने धुळे शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्यातील संशयित अकबर जलेला व साथीदार धुळे-सुरत महामार्गावर कुसुंबाजवळ हॉटेल कलकत्ता पंजाब येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
एलसीबी पथकातील सहाय्यक निरीक्षक प्रकाश पाटील, हवालदार अशोक पाटील, संदीप सरग, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रविकिरण राठोड, विशाल पाटील, महेश मराठे यांनी अकबर जलेला ऊर्फ अकबर अली केसर अली शाह (वय ३०, रा. शब्बीरनगर, चाळीसगाव रोड) व नईम इसाक पिंजारी (वय ३५, रा. अलहेरा हायस्कूल, जामचा मळा) याला अटक केली.
त्याच्याकडून ५० हजारांची दुचाकी, सात हजार ८३० रुपयांची रोकड, पंधरा हजारांचे तीन मोबाईल, पंधरा हजारांचा साडेतीन ग्रॅमचा नेकलेस, १८ ग्रॅमची सहा हजारांची धातूची रिंग, सहा हजार ४०० रुपयांचे ९९ ग्रॅमचे ब्रेसलेट, लोखंडी जॅक, चार फुटांची टॉमी असा एक लाख रुपयांवर मुद्देमाल जप्त केला.
संशयितांनी आणखी दोन गुन्हे केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात अकबर जलेलाविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात चार, साक्रीत दोन व आझादनगर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.