
Dhule Crime News : धुळ्यात लुटीसह पोलिसांवर हल्ला; दोघे अटकेत
धुळे : शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीवर उत्तर प्रदेशातील एका ट्रकचालकास मारहाण करीत लुटीसह पोलिसांवर हल्ला करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना चाळीसगाव रोड पोलिसांनी बारा तासांत अटक केली.
त्यांच्याकडून मोबाईसह रोकड हस्तगत केली. (2 criminals who assaulted truck driver in Uttar Pradesh and attacked police with loot arrested dhule crime news)
वाहनचालक मोहम्मद अरशद मोहम्मद अस्लम सलमानी (वय ३०, रा. पुरेमर्दान पोस्ट निगोह, ता. तिलोही, जि. अमेठी, उत्तर प्रदेश) ६ मार्चला रात्री दहा ते साडेदहादरम्यान चाळीसगाव रोड चौफुलीवर इंदूर येथे जाण्यासाठी वाहनांना हात देऊन थांबवीत होता.
तेव्हा त्यास अज्ञात तीन जणांनी मारहाण करून त्याच्या डाव्या कानाजवळ दुखापत केली. त्याच्याकडील आठ हजारांचा मोबाईल व आठशे रुपये हिसकावून नेले. याबाबत मोहम्मद सलमानी याने दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
फिर्यादीने दिलेल्या संशयितांच्या वर्णनावरून त्यास रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे छायाचित्र दाखविण्यात आले. गुन्हे शोधपथकाचे कर्मचारी अंबिकानगर, शब्बीरनगर भागात पेट्रोलिंग करीत होते. तेव्हा परिसरातील दोन संशयितांकडे विचारपूस केली असता वसीम ऊर्फ वड्या सलीम रंगरेज (४२, रा. शब्बीरनगर, धुळे), इमरान ऊर्फ बाचक्या शेख खालीद (२५, रा. अंबिकानगर) व त्याच्या घरातील व्यक्तींनी पोलिसांशी हुज्जत घालीत शासकीय कामात अडथळा आणला.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
तसेच पोलिस शिपाई इंद्रजित वैराट व स्वप्नील सोनवणे यांच्याशी झटापट व दमदाटी केली. यात श्री. वैराट यांच्या खांद्याला दुखापत झाली. वसीम ऊर्फ वड्या सलीम याने श्री. सोनवणे यांच्या डाव्या मांडीला चावा घेतला. त्यामुळे या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी श्री. वैराट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल झाला.
दरम्यान, दोघांनी कसून चौकशी केली असता त्यांनी लुटीच्या गुन्ह्याची कबुली दिली. दोघांकडून गुन्ह्यातील मुद्देमालापैकी मोबाईल व चारशे रुपये रोख हस्तगत करण्यात आले. पोलिस निरीक्षक धीरज महाजन तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महाजन, व्ही. टी. पवार, हवालदार पंकज चव्हाण, बी. आय. पाटील, ठाकूर, चेतन झोळेकर, स्वप्नील सोनवणे, इंद्रजित वैराट, तायडे, शिंदे, पवार यांनी केली.
दोघांवर तब्बल २० गुन्हे
गुन्ह्यातील आरोपींवर विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे तब्बल २० गुन्हे दाखल आहेत. त्यात चाळीसगाव रोड पोलिस ठाणे ७, मोहाडी १, आझादनगर ३, देवपूर १, पश्चिम देवपूर ३, धुळे तालुका १ व धुळे शहर पोलिस ठाण्यात ५ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे दोघांवर वरिष्ठांच्या आदेशाने प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे.