स्वाइन फ्लूने आणखी दोघांचा बळी

स्वाइन फ्लूने आणखी दोघांचा बळी

नाशिक - शहर-जिल्ह्यात स्वाइन फ्लूने दगावलेल्यांच्या संख्येत भरच पडत आहे. बुधवारी (ता. २६) पुन्हा सत्तरवर्षीय महिला स्वाइन फ्लूची, तर ४३ वर्षीय व्यक्ती स्वाइन फ्लूसदृश तापाची बळी ठरली. जिल्हा रुग्णालयात २० रुग्ण दाखल आहेत. त्यातील एकजण पॉझिटिव्ह, तर उर्वरित रुग्णांचे वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. रुग्णांत सात पुरुष व १३ महिला रुग्ण आहेत.

मंजुळाबाई मुकुंदा मंडलिक (वय ७०, रा. निंबोरा, ता. संगमनेर, जि. नगर) यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात गेल्या २२ तारखेला दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर स्वाइन फ्लू विशेष कक्षात उपचार सुरू होते. त्यांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह होता. उपचार सुरू असताना त्यांचा बुधवारी (ता. २६) सकाळी सव्वादहाला मृत्यू झाला. जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा चार झाला, तर स्वाइन फ्लूने दगावलेल्यांची संख्या तीसवर पोचली आहे. रमेश भोये (वय ४३, रा. भीमवाडी, गंजमाळ, नाशिक) बुधवारी (ता. २६) दुपारी स्वाइन फ्लूसदृश तापाने दगावले. त्यांना मंगळवारी (ता. २५) सायंकाळी खासगी रुग्णालयातून अत्यवस्थ स्थितीत जिल्हा रुग्णालयाच्या स्वाइन फ्लू विशेष कक्षात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा बुधवारी दुपारी दीडला मृत्यू झाला. त्यांचा वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

आरोग्य विभाग घेणार आढावा
नाशिक विभागात स्वाइन फ्लूचा सर्वाधिक धोका नाशिक शहर-जिल्ह्यात बळावलेला आहे. स्वाइन फ्लूने दगावलेल्या रुग्णांचे प्रमाण हे खासगी रुग्णालयातील उशिराच्या उपचारात असल्याचे प्राथमिक स्वरूपात समोर आले आहे. त्यामुळे अशा खासगी रुग्णालयांतील डॉक्‍टर व त्यांच्या स्टाफची आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत विशेष कार्यशाळा घेतली जात आहे. तसेच, शहर-जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनाही स्वाइन फ्लूवर रामबाण उपाय असलेली टॅमीफ्लूच्या गोळ्या विक्रीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे. या विक्रेत्यांकडून गोळ्यांचा आढावा घेण्यात येणार असून, त्यावरून कोणत्या विभागात लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, हे स्पष्ट होणार आहे. 

शहरी भागात वॉर्डनिहाय आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण केले जाणार असून, त्यासाठी लोकप्रतिनिधी, नगरसेवकांना यात सहभागी करून घेतले जाईल.
- डॉ. रत्ना रावखंडे, आरोग्य उपसंचालक, नाशिक विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com