दोन वर्षांची निकिता झाली पोरकी...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

मेहुणबारे (चाळीसगाव) : मेहुणबारे गणातल्या पंचायत समिती सदस्या रूपाली साळुंखे यांना दोन वर्षाची निकिता नावाची गोंडस कन्या आहे. तिचा येत्या 18 जूनला वाढदिवस होता. मात्र, वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच आई रूपाली या तिला पोरके करुन निघून गेल्या. निकीताकडे पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते.

मेहुणबारे (चाळीसगाव) : मेहुणबारे गणातल्या पंचायत समिती सदस्या रूपाली साळुंखे यांना दोन वर्षाची निकिता नावाची गोंडस कन्या आहे. तिचा येत्या 18 जूनला वाढदिवस होता. मात्र, वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच आई रूपाली या तिला पोरके करुन निघून गेल्या. निकीताकडे पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते.

भारतीय जनता पक्षाच्या मेहुणबारे गणाच्या पंचायत समिती सदस्या रूपाली साळुंखे (वय 32) यांनी काल (ता. 4) पहाटे सहाच्या पूर्वी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काल (ता. 4) पहाटे रूपाली साळुंखे यांच्या पतीसह सासू सासरे उठल्यावर रूपालीच्या खोलीचा दरवाजा त्यांनी वाजवला. मात्र, आतून काही प्रतिसाद न आल्याने घरातील सर्व जण घाबरले. खोलीचा दरवाजा तोडला असता, रूपाली या घराच्या छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्या. ही घटना गावात समजताच घटनास्थळी सर्व गाव जमा होऊन सर्वजण सुन्न झाले. 

वडिलांची शेवटची भेट 
रूपाली साळुंखे यांचे माहेर टिटवी (ता. पारोळा) येथील आहे. त्या रविवारी (ता. 3) पती पियुष साळुंखे यांच्यासोबत धोंड्याचा महिना असल्याने माहेरी टिटवीला गेल्या होत्या. मात्र, माहेरी त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या असल्याने दोघांनी रात्री तेथे न थांबता, रात्रीच मेहुणबारेला परत आले. रूपाली यांची आपल्या आई- वडिलांची शेवटचीच भेट ठरली. दुसऱ्या दिवशी आपल्या मुलीने गळफास घेतल्याची बातमी कळताच त्यांनी एकच आक्रोश केला. सकाळी दहाला मेहुणबारे गाठले. मुलीचा मृतदेह पाहून वडिलांनी हंबरडाच फोडला. रूपाली यांच्या माहेरच्या मंडळींचा संताप अनावर झाला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपविभागीय अधिकारी अरविंद पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

रूपाली साळुंखे यांचा मृतदेह माहेरची मंडळी आल्यावर सकाळी अकराला खाली उतरविण्यात आला. त्यांच्या माहेरच्या लोकांना हा धक्काच असल्याने काही तरी विपरित घडले असावे, की ज्यामुळे रूपाली यांना आत्महत्या करावी लागली म्हणून माहेरची मंडळी संतप्त झाली. या दरम्यान, रूपाली यांचा मृतदेह चाळीसगावला शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. मात्र, नातेवाइकांनी धुळे येथे शवविच्छेदन करण्याची मागणी केली.

अखेर काहींनी मध्यस्थी केल्यानंतर चाळीसगावलाच शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी पाचला रूपाली साळुंखे यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचे पती पियुष साळुंखे हे पोलिस बंदोबस्तात स्मशानभूमीत आले. यावेळी त्यांनीही आक्रोश केला. माहेरच्या लोकांचा संताप पाहून पोलिस पियुष यांना तेथून तत्काळ घेऊन निघून गेले. याबाबत आप्पासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक हेमंत शिंदे हे करीत आहेत. दरम्यान, रूपाली साळुंखे या पंचायत समितीत त्यांच्या गणाचे नेतृत्व करीत होत्या. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. 

Web Title: 2 years old nikita s mother get suicide