
Veer Savarkar Smarak : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासाठी शाहांकडून 20 लाखांचा निधी
Dhule News : शहरातील पांझरा नदीकाठावरील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाच्या दुरुस्तीसाठी शहराचे एमआयएमचे आमदार फारूक शाह यांनी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. आमदार शाह यांच्या या पुढाकाराबद्दल शिवसेने (उबाठा)ने त्यांचे आभार व्यक्त केले. (20 Lakhs from mla Shah for Independence Veer Savarkar Memorial dhule news)
धुळे शहरात पांझरा नदीवरील लहान पुलाजवळ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक आहे. १९८३-८४ च्या सुमारास हे स्मारक उभारले गेले. या स्मारकाची सध्या दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शिवसेना (उबाठा) पक्षाने येथे १७ मेस आंदोलन करून धुळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
भाजपच्या महापौर, उपमहापौरांच्या प्रभागात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाची दुरवस्था म्हणजे धुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे बेगडी हिंदुत्व असल्याची टीका शिवसेने (उबाठा)ने केली व स्मारकाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी केली होती. दरम्यान, सावरकरांचे स्मारक दुर्लक्षित राहणे ही बाब योग्य नाही, असे म्हणत आमदार शाह यांनी स्मारकाची पाहणी केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तसेच स्मारकाच्या परिसर सुशोभीकरणासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून २० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. आमदार शाह यांच्यासोबत शिवसेना (उबाठा) पक्षाचे महेश मिस्तरी, एमआयएमचे नासीर पठाण, नगरसेवक सईद बेग, आमिर पठाण, डॉ. दीपश्री नाईक, प्यारेलाल पिंजारी, इक्बाल शाह, सउद सरदार, इब्राहिम पठाण, जमील खाटीक, आसिफ शाह मुल्ला, डॉ. पवार, परवेज शाह, हलीम शमसुद्दीन, मुद्दसर शेख, फिरोज शाह, आसिफ पोपट शाह आदी उपस्थित होते.