चलन तुटवड्याने 20 हजार टन द्राक्षे बागांवरच

grapes
grapes

नाशिक - नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना देण्यासाठी चलन उपलब्ध नसल्याने व्यापाऱ्यांनी द्राक्षांसह डाळिंब खरेदीकडील हात आखडता घेतला आहे. त्यामुळे एकीकडे भावात घसरण झालेली असतानाच बागलाण, कळवण, मालेगाव पट्ट्यातील 20 हजार टन द्राक्षे बागांवर आहेत. सद्यस्थितीत चांगल्या वातावरणाची साथ मिळत असली, तरीही व्यापाऱ्यांची प्रतीक्षा करण्याखेरीज शेतकऱ्यांपुढे पर्याय उरलेला नाही. सांगोला, नाशिक, इंदापूर, नगरसह राज्यात हंगाम सुरू होताच डाळिंबाच्या भावात 30 टक्‍क्‍यांनी घसरण झाली.

चलनाच्या तुटवड्याचा प्रश्‍न तयार होण्याअगोदर बांगलादेशसाठी 90 ते 95, रशियासाठी 105, युरोपसाठी 115 रुपये किलो भावाने व्यापारी "कसमादे' पट्ट्यातून "अर्ली' छाटणीची द्राक्षे खरेदी करीत होते. आता बांगलादेशसाठी 60 ते 75, रशियासाठी 65 ते 85, युरोपसाठी 85 ते 105 रुपये किलो भावाने द्राक्षे शेतकऱ्यांना विकावी लागत आहेत. बांगलादेशसाठी जादा शुल्क द्यावे लागत असल्याने व्यापाऱ्यांनी भावात 20 टक्‍क्‍यांनी कपात केली. शरद सिडलेस, तासगाव गणेश, थॉमसन, सोनाक्का या वाणाच्या पाच हजार एकरवर शेतकऱ्यांनी "अर्ली' छाटणी केली आहे. 25 ऑक्‍टोबरपासून द्राक्षे विक्रीसाठी उपलब्ध होऊ लागली आहेत. ही द्राक्षे पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत विकली जातील. पण, रोख पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या जवळपास निम्मा बागांवर द्राक्षे उरली आहेत.

व्यापारीही चलनासाठी थांबले
डाळिंबाचे मुख्यतः व्यवहार रोख चलनात होतात. पंधरा दिवसांपासून लेट मृग बहाराच्या काढणीला सुरवात झाली असली, तरीही चलनाअभावी 30 टक्के व्यापाऱ्यांनी अद्याप खरेदीला सुरवात केलेली नाही. हंगामाला सुरवात होताच गणेशला 60, आरक्ताला 90 आणि भगवाला 120 रुपये किलो असा भाव शेतकऱ्यांना अपेक्षित होता. पण, गणेश 25 ते 30, आरक्ता 50 ते 60, भगवा 70 ते 90 रुपये किलो भावाने शेतकऱ्यांना विकावा लागत आहे. सर्वसाधारणपणे एक जानेवारीपासून सुरू होणारी निर्यात फेब्रुवारीअखेरपर्यंत चालते. चलन तुटवड्याचा आताचा गोंधळ कायम राहिल्यास मग मात्र डाळिंबाच्या निर्यातीवर परिणाम होऊन भावातील घसरणीचे संकट कोसळते काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना भेडसावू लागला आहे. सद्यस्थितीत दुबईत इराण-इराकमधील डाळिंब विकले जात आहेत. गेल्या वर्षी 15 ते 18 हजार टन डाळिंबाची दुबईत निर्यात झाली होती. यंदा शेतकऱ्यांना 20 ते 25 हजार टनापर्यंत दुबईमधील निर्यात अपेक्षित आहे. युरोपमध्ये 150 ते 200 कंटेनरमधून चार हजार टन डाळिंबाची निर्यात व्हावी, असेही शेतकऱ्यांना वाटते आहे.

शेतकऱ्यांमध्ये धाकधूक
व्यापाऱ्यांकडून अजूनही पाचशे-हजाराच्या नोटा दिल्या जाताहेत; पण या नोटा बॅंकेत भरायच्या आणि नव्या सरकारी फतव्याला उत्तरे देत बसायची, या कारणास्तव शेतकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. द्राक्ष उत्पादक जुन्या नोटांसह धनादेश बॅंकांमध्ये भरण्यास घाबरू लागले आहेत. डाळिंबाची खरेदी करायला सुरवात केलेल्या व्यापाऱ्यांनी धनादेश देण्यास सुरवात केली आहे. धनादेश नको म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना पंधरा दिवस थांबा पैसे देतो, असे व्यापारी सांगताहेत. व्यापाऱ्यांचा मागील अनुभव फारसा चांगला नसल्याने विकत घेतलेल्या मालाचे पैसे न मिळाल्यास पुढे काय करायचे, याही प्रश्‍नाने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.

""दिल्लीतील आझादपूर बाजारपेठ गेला आठवडाभर बंद होती. या आठवड्यात तीन दिवस बंद राहिली आहे. त्यामुळे बागांमधील द्राक्षांची छाटणी थांबली आहे. यंदा निसर्गाने चांगली साथ दिल्याने चार पैसे शेतकऱ्यांच्या हातात येतील, असे वाटत असताना नोटाबंदीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले.''
- खंडूअण्णा शेवाळे (संचालक, द्राक्षबागायतदार संघ)

""गेल्या वर्षी लेट मृगबहाराचे डाळिंब उत्पादन 15 लाखांपर्यंत पोचले होते. यंदा झाडे वाढली; पण फळे अपेक्षित मिळाली नाहीत. तसेच, तेलकट डागामुळे हस्तबहाराकडे अनेक शेतकरी वळाले आहेत. त्यामुळे राज्यात 12 ते 13 लाख टनापर्यंत डाळिंबाचे उत्पादन अपेक्षित आहे. पंधरा दिवसांनंतर काढणीला येणाऱ्या वेगाच्या पार्श्‍वभूमीवर निर्यातवृद्धीकडे लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी सरकारला आर्थिक परिस्थिती सुस्थितीत आणावी लागणार आहे.''
- प्रभाकर चांदणे (माजी अध्यक्ष, डाळिंब उत्पादक संघ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com