तृषार्थ हरणांची तहान भागवण्यासाठी जंगलात २० वॉटर होल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

येवला- वाढत्या उन्हामुळे डोंगर तप्त होत असल्याने राजापूर-ममदापूरच्या वनहद्दीतील हजारोंच्या संख्येने असलेल्या हरणांचा जीव कासावीस होत आहे. कोरड्याठाक पडलेल्या जंगलात वनविभागाने या हरणांसह वन्यजीवाची तहान भागवण्यासाठी २० ठिकाणी वॉटर होलची व्यवस्था केली असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्याच्या पूर्व भागात विस्तीर्ण असं वनक्षेत्र अन त्यातील वन्यजीव हा निसर्गाचा मोठा अमुल्य ठेवाच लाभला आहे. तालुक्यातील जवळपास ९ हजार ६०० हेक्टर इतकं क्षेत्र वनविभागाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या अखत्यारीत येते.

येवला- वाढत्या उन्हामुळे डोंगर तप्त होत असल्याने राजापूर-ममदापूरच्या वनहद्दीतील हजारोंच्या संख्येने असलेल्या हरणांचा जीव कासावीस होत आहे. कोरड्याठाक पडलेल्या जंगलात वनविभागाने या हरणांसह वन्यजीवाची तहान भागवण्यासाठी २० ठिकाणी वॉटर होलची व्यवस्था केली असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्याच्या पूर्व भागात विस्तीर्ण असं वनक्षेत्र अन त्यातील वन्यजीव हा निसर्गाचा मोठा अमुल्य ठेवाच लाभला आहे. तालुक्यातील जवळपास ९ हजार ६०० हेक्टर इतकं क्षेत्र वनविभागाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या अखत्यारीत येते. त्यातील भुलेगाव, रहाडी, रेंडाळे, देवदरी, खरवंडी, ममदापूर, राजापुर, कोळगाव, सोमठाण जोश, पिंपळखुटे तिसरे, पिंपळखुटे बुद्रुक, तळवाडे, आहेरवाडी, जायदरे, कुसमाडी, नायगव्हाण, गोरखनगर, विसापुर, कातरणी, सावरगांव, ठाणगाव या पूर्वोत्तर भागातील वनक्षेत्रात हरिण व काळवीटांची संख्या जवळपास पाच हजारांच्या वर आहेत. त्यातही या संख्येत दरवर्षी साधारणतः १० टक्के इतकी वाढ होत आहे. हा भाग अवर्षणप्रवण असल्याने प्रत्येक उन्हाळ्यात वन्यजीवांची अन्न पाण्याची हाल ठरलेली असते.

या वर्षी पावसाने दगा दिल्याने डिसेंम्बर पासूनच या भागात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. जंगलातील पाणीसाठे आटल्याने वनविभागाच्या वतीने वनक्षेत्रात विविध ठिकाणी ९ हजार लिटर्स क्षमतेचे एकूण २० ‘वॉटर होल’ अर्थातच कृत्रिम पाणवठे तयार केलेले असुन, हे पाणवठे हरीण, काळवीट आदी वन्यजीवांची तहान भागवत आहेत.

वनविभागाच्या वतीने या कृत्रिम पाणवठ्यात टॅंकरद्वारे पाणी सोडले जात आहे. पाणी संपले की गरजेनुसार हे पाणवठे पुन्हा भरले जातात. सौर उर्जेवर चालणारा पहिला पंप तालुक्यातील राजापुर येथे कार्यान्वित करताना हा पंप वन्यजीवांसाठी संजीवनी ठरला आहे. अन्न पाण्याची दिलासादायक स्थिती असली तरी वाढती उष्णता, तप्त होणारे डोंगर व सावलीचा अभाव या नैसर्गिक कारणानी मात्र वन्यजीवांच्या जीवाची काहिली काहिली होत असल्याचे चित्र आहे.

वडपाटी ठरला पाणीदार!
वन्यजीवच नाही तर अर्ध्या गावातील शेतीला आधार देणारा या भागातील वडपाटी पाझर तलाव पावसामुळे १९८०च्या सुमारास फुटलेल्या वनहद्दीतील एकमेव पर्याय आटला होता. मात्र शेतीला पाणी मिळावे यासाठी मागील वर्षी लोकवर्गणीतुन व जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या प्रयत्नातून हा तलाव नव्याने उभा राहिला आहे. मात्र यातील पाणी शेतीसाठी काहीही फायद्याचे ठरत नसल्याचे दुरुस्तीनंतर दिसून आले आहे. मात्र हे हक्काचे पाणी आता भर उन्हाळ्यातही हरणांसह वन्यजीवांची तहान भागवत आहे.

चराई बंदीने मिळतोय चारा
डोंगर दऱ्याच्या या जंगलात अन्न-पाणी समस्या मोठी असल्याने हरणे नागरी वस्तीत तसेच मराठवाड्यात देखील स्थलांतरित होतात. मात्र राखीव वनसंवर्धन क्षेत्र करून विविध विकासकामे वनविभाग राबवत असल्याने आता हरणांना हे जंगल आपले वाटू लागले आहे. मागील वर्षी चराईबंदी करून राखीव कुरण ठेवल्याने आजही जंगलात हिरवे नाही पण वाळलेले गवत आहे. यावर हरणांची गरज भागली जात असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एन. भंडारी, वनपाल अशोक काळे यांनी सांगितले.

Web Title: 20 water holes in the forest to thirst for deers