सप्तशृंगीदेवी गडासाठी दोनशे जादा बस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

जळगाव - राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे सप्तशृंगीदेवी, नांदुरी गड यात्रेसाठी चार ते बारा एप्रिलदरम्यान भरणाऱ्या यात्रेसाठी दोनशे जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या बस विभागातील सर्व आगारांतून सोडण्यात येणार असून, यात्रेच्या दिवशी मागणी झाल्यास त्यानुसार आणखी जादा बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

नांदुरी गड यात्रेचा मुख्य दिवस पौर्णिमा म्हणजे ११ एप्रिलचा असून, यावर्षी बस थेट गडावर जातील. जळगाव विभागातील सर्वच आगारांतून जादा बस सोडण्यात येणार असून, यात जळगाव, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा, पाचोरा व एरंडोल या आगारांतून प्रवासी भाविकांची गडावर जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने तेथून अधिक बस सोडण्यात येणार आहेत.

याशिवाय जामनेर, यावल, रावेर, मुक्‍ताईनगर व भुसावळ येथून प्रवासी वर्दळ लक्षात घेऊन बस सोडण्यात येणार आहेत. तसेच ५० प्रवाशांच्या गटप्रमुखाने मागणी केल्यास ते राहण्याच्या गावाहून थेट गडापर्यंत बस परतीच्या प्रवासासह उपलब्ध करून दिल्या जातील. या जादा वाहतुकीच्या व्यवस्थेसाठी नऊ पर्यवेक्षक व तीन प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

सुट्यांमध्येही जादा बस
जिल्ह्यातील सर्वच शाळांना १५ एप्रिलपासून सुट्या लागतात. यामुळे सुट्यांमध्ये गावाला फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ असल्याने राज्य परिवहन महामंडळाकडून जादा बसचे नियोजन करण्यात येत असते. त्यानुसार यंदादेखील तीन जादा बस सोडण्याचे प्राथमिक नियोजन आहे.

वाहतुकीवर राहणार लक्ष
प्रत्येक ठिकाणी संबंधित आगार व्यवस्थापकांना यात्राप्रमुख काम करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय, सप्तशृंगीदेवी नांदुरी गड येथे विभागीय वाहतूक अधिकारी व्ही. डी. धायडे हे यात्राप्रमुख म्हणून वाहतुकीचे नियोजन करतील. तसेच एस. एच. महाजन हे पाळ्यांमध्ये कार्यरत राहून विभागाच्या वाहतुकीवर लक्ष ठेवून सुरळीत व सुरक्षित वाहतुकीबाबत नियंत्रण ठेवतील.

Web Title: 200 extra bus on saptshrungidevigad