राज्यात कुठेही वाहतूक नियम मोडल्यास कारवाई 

अमोल कासार : सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 17 जुलै 2019

राज्यात कुठेही वाहतूक नियम मोडल्यास कारवाई 

राज्यात कुठेही वाहतूक नियम मोडल्यास कारवाई 

जळगाव : वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर वाहनचालक त्याठिकाणाहून पळ काढतात. वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यासाठी त्यांचा पाठलाग केला जातो. परंतु, आता अशा नियम मोडून पळ काढणाऱ्या बहाद्दरांवर जागच्या जागी चाप बसविणे "वन स्ट्राईक वन मेमो' या प्रणालीद्वारे पोलिसांना शक्‍य झाले आहे. 
राज्यात कोणत्याही ठिकाणी नियम मोडणाऱ्याला आता या नवीन प्रणालीद्वारे दंडाचा मेसेज त्याच्या मोबाईलवर मिळणार मिळेल. आतापर्यंत त्याने कितीवेळा दंडाची रक्कम थकवली आहे, हे देखील दिसून येईल. ही प्रणाली नुकतीच कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर आता वचक राहणार आहे. 

शहरातील वाहतूक ज्याप्रमाणे झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे नियम मोडणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. नियम मोडणाऱ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाई मोहीम, तसेच अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जानेवारी महिन्यात शहर वाहतूक शाखेतर्फे ई-चलन प्रणाली सुरू करण्यात आली होती. या प्रणालीद्वारे नियम मोडणाऱ्याला त्याच्या घरी थेट पोस्टाद्वारे ई-चलन येत असते. ही प्रणाली राबवत असताना आता शहर वाहतूक शाखेकडून "वन स्ट्राईक वन चलन' ही प्रणाली राबविली जात आहे. 

मेसेजद्वारे कळणार दंड 
वाहनचालकांकडून अनेकदा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते; परंतु नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास दंड ठोठावला असता अनेकदा त्याच्याकडून दंडाची रक्कम देण्यास टाळाटाळ केली जाते. परंतु आता राज्यात कोणत्याही ठिकाणी वाहतुकीच्या नियम मोडणाऱ्याला ठोठावण्यात आलेल्या दंडाचा मेसेज त्याच्या मोबाईलवर येणार आहे. तसेच आतापर्यंत त्याने किती दंडाची रक्कम भरलेली नाही, याबाबतची माहिती देखील त्याला आता ऑनलाइन पद्धतीने "वन स्ट्राईक वन चलन' यावर दिसणार आहे. 

सहा महिन्यांत साडेसहा लाख वसूल 
वाहतूक शाखेतर्फे गेल्या सहा महिन्यांपासून नियम मोडणाऱ्यांना ई-चलन द्वारे दंड ठोठावला जात आहे; परंतु आता यामध्ये अपडेट करून तसेच ऑनलाइन पद्धतीने "वन स्ट्राईक वन चलन'द्वारे दंड केला जात आहे. ही प्रणाली गेल्या महिन्यापासून कार्यान्वित करण्यात आली असून, ई-चलन व "वन स्ट्राईक वन चलनाद्वारे आतापर्यंत 2 हजार 283 जणांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून 6 लाख 34 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

जानेवारी महिन्यापासून ई-चलन प्रणालीद्वारे नियम मोडणाऱ्यांना दंड ठोठावण्यात येत आहे; परंतु आता राज्यात कोणत्याही ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडल्यास त्या वाहन चालकाला दंडाची रक्कम मेसेजद्वारे कळविण्यात येणार असून, त्याला "वन स्ट्राईक वन चलन'द्वारे ऑनलाइन पद्धतीने कोणत्याही दंडाची रक्कम भरता येणार असल्याने यामुळे वाहतुकीच्या नियम मोडणाऱ्यांवर वचक राहणार आहे. 
- देविदास कुनगर 
पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा